पनवेल रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांची गैरसोय
बेशिस्त वाहन चालक, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी
नवीन पनवेल : नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर रहदारीच्या मार्गात दुचाकी पार्कींग केल्या जातात. तसेच याच रस्त्यावर रिक्षांच्या देखील बेकायदेशीरपणे दोन रांगा लागत असल्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात अडचणी निर्माण होते. या रस्त्यावर लावण्यात आलेली दुचाकी वाहने आणि बेकायदेशीर रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
नवीन पनवेल भागातून पनवेल रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांची दररोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. तसेच येथील रेल्वेच्या पार्कींगचा ठेका संपलेला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यावरुन रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गात मोठ्या संख्येने दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात
आहेत. त्यामुळे येथील ये-जा करण्याचा मार्ग अरुंद झाला आहे. परिणामी, पनवेल स्थानक परिसरातून बाहेर पडताना प्रवाशांच्या नाकी नऊ येतात. सदर परिसर अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड आणि फेरीवाल्यांनी व्यापल्याने स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा प्रवाशांच्या पायावरुनही रिक्षांचे चाक जाते. त्यातून लहान-मोठे वाद नित्याचेच झाले आहेत.
पनवेल रेल्वे स्थानकापासून दिडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांवर न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणातही रेल्वे स्थानकाचा परिसर मुक्त ठेवण्याच्या स्पष्ट तरतुदी आहेत. तरीही नवीन पनवेल बाजुकडून पनवेल रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा विळखा आहे. स्थानकाबाहेर रिक्षांसाठी जागा निश्चित असल्या तरी त्यांची घुसखोरी कायम आहे. पोलीस, महापालिका आणि रेल्वे प्रशासन या परिसरात दिसत सुध्दा नाहीत. दुसरीकडे अपुरी प्रकाश व्यवस्था, कचऱ्यांचे डोंगर, अरुंद रस्ते, प्रगतीपथावर असलेली कामे यांचेही प्रवेशद्वारांवर अडथळे आहेत. एकंदरीतच प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या या रस्त्यावर संबंधित यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. यामुळे चाकरमानी त्रस्त झाले आहेत.