वाहतूक कोंडीची समस्या!
महापालिका तर्फे आदई सर्कल चौक, स्वर्णगंगा चौक येथे सिग्नलची उभारणी
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीमध्ये वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिवत आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सूचनेनुसार आदई सर्कल आणि स्वर्णगंगा चौकामध्ये याठिकाणी महापालिकेने सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. या सिग्नल व्यवस्थेमुळे स्वर्णगंगा चौक आणि आदई सर्कल चौकामध्ये नित्य नेमाने होणारी वाहतुकीची कोंडी सुटली आहे.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन ठिकाणी सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामध्ये प्रथमतः आदई चौकामध्ये सिग्नल बसविण्यात आला आहे. पनवेल-माथेरान रस्त्यावरील आदई चौकातून पनवेल शहराकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु असते. सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी विविध कंपन्यांच्या बसेस तसेच चाकरमान्यांच्या गाड्या यामुळे वाहनांची वर्दळ वाढून या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. तसेच या भागामध्ये वाढत्या लोकसंख्यामुळे वाहनांची ये-जाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या चौकामधून भरधाव वेगाने वाहनांची ये-जा सुरु असते.
दरम्यान, सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे महापालिकेने वाहतूक कोडीची समस्या दूर करण्यासाठी विद्युत विभागाच्या माध्यमातून नुकतीच आदई चौकामध्ये सिग्नल जंक्शनची उभारणी केली आहे. या सिग्नल उभारणीमुळे येथील वाहतूक कोंडी कमी झाली असून वाहतूक व्यवस्थित होऊ लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याचबरोबर खारघर, सेक्टर-१ येथील स्वर्णगंगा चौक कोपरा गावाकडे जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गास जोडण्यात आला आहे. या चौकामधून मोठ्या प्रमाणात खारघर शहराकडे वाहनांची ये-जा सुरु असते. या चौकामध्ये वाहनांची संख्या वाढली असल्याकारणाने तेथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. या चौकामधून सायन-पनवेल महामार्गाकडे जाताना भरधाव वेगाने वाहनांची ये-जा सुरु असते. नागरिकांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने आणि वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महापालिका विद्युत विभागाच्या माध्यमातून सिग्नल जंक्शन स्थापित करण्यात आले आहे.
विद्युत विभागाच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रात सध्या विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. सिडको हस्तांतरीत भागातील जुने पारंपारिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. यासह काही महत्वांच्या चौकांमधील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सिग्नल जंक्शन उभारण्यात आले आहे. या सिग्नल जंक्शनमुळे वाहतुकीला शिस्त लागणार आहे. -प्रितम पाटील, विभागप्रमुख-विद्युत विभाग, पनवेल महापालिका.