दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली बीजगणेश
इटीसी केंद्रात इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याची कार्यशाळा संपन्न
नवी मुंबई : १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होणारा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील रितीने साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांना केले आहे. त्यादृष्टीने देशात प्रसिध्द असलेल्या नवी मुंबई महापालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्राच्या वतीने इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिनव उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमाद्वारे बालगणेशाबद्दल मुलांच्या मनात असलेले आकर्षण लक्षात घेऊन त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि मुलांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्यासाठी बीजगणेश निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ईटीसी केंद्र संचालक तथा सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी दिली.
या इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या उपक्रमात श्रीमूर्ती बनविताना मातीत तुळशीची बीजे अर्थात मंजुळा मिसळून मूर्ती बनविण्यात आल्या. या श्रीगणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर त्यामध्ये तुळशीची बीजे मिसळलेली असल्याने त्या मातीतून उमलणाऱ्या तुळशी स्वरुपातील श्रीगणेशाचे अस्तित्व कायम घरी असणार आहे.
सदर अभिनव उपक्रमातून दिव्यांग मुलांना कलात्मक निर्मितीचा अनुभव घेता आला आणि त्यासोबतच श्री गणेशमूर्ती बनविलेल्या मातीमध्ये तुळशीच्या मंजुळा मिसळल्याने पर्यावरणाचे महत्त्वही नकळतपणे त्यांच्या मनावर रुजवले गेले याचा आनंद मुलांसमवेत उपक्रमात सहभागी होत त्यांच्या पालकांनीही मोठ्या प्रमाणावर घेतला.