‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'तर्फे लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
‘मुंबई जिल्हा बँक'च्या अर्थसहाय्यातून ५००० लाभार्थी घडविण्याचे लक्ष - आ. प्रविण दरेकर
वाशी : ‘मुंबई जिल्हा बँक'च्या अर्थसहाय्यातून किमान ५००० लाभार्थी घडविण्याचे आणि किमान ५०० कोटींचे कर्ज वितरण करण्याचे आश्वासन ‘बँक'चे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे.
‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या वतीने १० सप्टेंबर रोजी एपीएमसी मधील माथाडी भवन येथे लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. दरेकर बोलत होते.
‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी अध्यक्ष तथा माथाडी नेते नरेंद्र पाटील प्रयत्नशील आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई, पनवेल परिसरातील किमान ५००० लाभार्थी घडविण्याचा संकल्प नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्या पार्शवभूमीवर माथाडी भवन येथे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे मार्गदर्शन केंद्र सुरू केले असून या केंद्राच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल परिसरातील मराठा बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी नरेंद्र पाटील यांनी मेळाव्यात केले.
सदर मेळाव्यास ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे उप महाव्यवस्थापक आकाश मोरे, ‘माथाडी संघटना'चे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, ‘अखिल भारतीय मराठा महासंघ'चे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष बर्गे, अंकुश लांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.