‘डाकघर'साठी जागा देता का?
तळोजा वसाहतवासियांची हाक; तळोजासाठी स्वंतत्र टपाल कार्यालयाची मागणी
खारघर : तळोजा वसाहतीत डाकघर सुरु करण्यासाठी डाक विभागाने तळोजामध्ये जागेची पाहणी करुन जागेची निवड केली. तसेच ‘सिडको'कडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ‘सिडको'कडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि अधिकारी उडवा-उडवीचे उत्तर देत असल्यामुळे ‘डाकघर'साठी जागा देता का? जागा अशी वेळ डाक विभागावर आली आहे.
तळोजा वसाहतीची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. मात्र, येथे डाकघर नाही. त्यामुळे नागरिकांना १०० ते १५० रुपये रिक्षाभाडे खर्च करुन चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहत मधील डाकघर कार्यालय गाठावे लागतात. दुसरीकडे तळोजा वसाहतीत वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांच्या पत्र व्यवहारात भर पडत असल्यामुळे औद्योगिक वसाहत आणि नावडे टपाल कार्यालयाकडून तळोजा वसाहत फेज-१, २ साठी प्रत्येकी एक पोस्टमन सेवा बजावत आहे. नागरिकांच्या टपाल विभागावर अधिक विश्वास असल्यामुळे पोस्ट ऑफिस बचत खाते, पोस्ट ऑफिसआवर्ती ठेव खाते, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृध्दी योजना आदि योजना आणि पत्र व्यवहारासाठी तळोजा वसाहत मधील रहिवाशांना रिक्षा भाडे करुन टपाल कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे तळोजा वसाहतीकरिता स्वतंत्र टपाल कार्यालय असावे, अशी मागणी तळोजावासियांची होती.
तळोजावासियांची सदर मागणी लक्षात घेवून नवी मुंबई उप-विभागीय डाकघर कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मे महिन्यात तळोजा, सेक्टर-२, ११ आणि १४ तसेच तळोजा फेज-२ मध्ये पाहणी केली.
दरम्यान, तळोजा फेज-२ मध्ये ‘सिडको'च्या जागा निश्चित करुन तसा पत्रव्यवहार ‘सिडको'कडे करण्यात आला. डाकघर कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार ‘सिडको'कडे पत्रव्यवहार, मुख्य अभियंता किसन गोडबोले यांची भेट घेवून तळोजा वसाहतीसाठी डाकघर आणि जागेविषयी चर्चा केली. यावेळी गोडबोले यांनी वसाहत अधिकाऱ्यांची भेट घ्यावी, असे सांगितले. त्यानुसार ‘सिडको'च्या वसाहत विभागाचे काम पाहणारे अधिकारी खान, शिंदे आणि जोगी यांची भेट घेतली, असता तिघ्ोही एकमेकांकडे बोट दाखवीत असल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांना भेटून जागेचा प्रश्न सुटणार? असा प्रश्न डाकघर अधिकाऱ्यांना पडला आहे. या विषयी जनरल पोस्ट ऑफिस कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अमिताभ सिंग यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.
दरम्यान, यासंदर्भात तळोजा आणि नावडे डाकघर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, तळोजा टपाल कार्यालयात आलेल्या टपालाची छाननी करुन नंतर वितरण करण्यासाठी जावे लागत आहे. तळोजा वसाहतसाठी आठ पोस्टमनची आवश्यकता आहे. सध्यस्थितीत सदरची कामे २ पोस्टमनला करावी लागत आहे. जनरल पोस्ट ऑफिस कार्यालयाने तळोजा वसाहतीत स्वतंत्र टपाल कार्यालय सुरु करुन पुरेसे कर्मचारी उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नुकताच पदभार स्विकारला आहे. टपाल कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहार विषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येईल. - राजेंद्र धायटकर, मुख्य अभियंता - सिडको.
रक्षाबंधनला भावाला गावी राखी पाठविण्यासाठी खारघर टपाल कार्यालयात महिलांची खूप धावपळ दिसत होती. - मेघनाथ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता.