श्री मूर्तींवर अखेरचा हात !

गणेशचतुर्थीपूर्वी श्री मूर्ती तयार करण्यात कारागीर व्यस्त

वाशी : लाडक्या बाप्पाच्या  आगमनाला अवघा एक आठवडा राहिला असून नवी मुंबईतील गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मुर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मुर्तीचे डोळे, दागिने यासह रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरु असून त्यासाठी १२ ते १८ तास रंगकाम करणाऱ्या कामगारांना झटावे लागत आहे.

विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा एक आठवड्यावर आला असून त्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये मुर्तींचे बुकींग करुन ठेवले आहे. तर काही सार्वजनिक मंडळांचे श्री गणेश मंडपामध्ये विराजमान झाले आहेत. नवी मुंबई सारख्या शहरात बाहेरुन जरी तयार मूर्ती येत असल्या तरी येथील स्थानिक मुर्तीकारांकडे आपल्या मुर्ती कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे आज जरी नवी मुंबईत हाताच्या बोटावर मोजण्या इतके गणपती कारखाने शिल्लक असले तरी आपल्या जुन्या ग्राहकांसाठी मुर्तीकारांनी आपली कला जिवंत ठेवत कारखाने चालवत आहेत.

नवी मुंबईमध्ये दारावे, घणसोली, तुर्भे, बोनकोडे, कोपरखैरणे, ऐरोली, आदि ठिकाणी आजही असे कारखाने तग धरून आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच घरगुती गणपतीची बुकींग केलेल्या मुर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्याच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार १२ ते १८ तास कारखान्यांमध्ये काम करताना दिसत आहेत. गणपतीच्या मुर्तीवर शेवटचा हात फिरवणे, मूर्ती वर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे, आदी कामे कामगार करीत आहेत.

दरम्यान, यंदाच्या वर्षी रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस, अशा कच्चा मालाच्या किंमतींमध्ये  तसेच वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मुर्तींच्या किंमतीमध्ये जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती ‘नवी मुंबई मूर्तीकार संघटना'चे अध्यक्ष संतोष चौलकर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 लहान मुलांनी घडवल्या शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती