गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज
सजावट साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी
तुर्भे : श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील एपीएमसी, तुर्भे परिसरातील जनता मार्केट सह इतरही ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये सजावट साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे.
बाप्पाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गणेशोत्सवात सजावटीच्या साहित्याला प्रचंड मागणी असून साहित्यामध्ये नावीन्यपूर्ण प्रकार पाहायला मिळत आहेत. येत्या १९ सप्टेंबर रोजी लाडवया गणपती बाप्पाच्या आगमनाचे भाविकांना वेध लागले आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सजावटीच्या साहित्याला दरवर्षी वाढत्या महागाईचा फटका बसत असला तरी भाविकांचा उत्साह मात्र जराही कमी झालेला नाही. आपला गणपती बाप्पा चांगल्या मखरामध्ये स्थानापन्न व्हावा, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडे भाविकांचा कल दिसत आहे.
गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटलेल्या ठिकाणी देखील सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले जात आहे. आरास सजावट नेमकी काय करायची? त्यासाठी नव्या वस्तुंचा किंवा तयार साहित्याचा वापर करायचा? याचे नियोजन भाविकांनी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात ‘थर्माकोल'ला पर्याय म्हणून फोम शीटला मागणी वाढली आहे. फोम शीट महाग असल्याने ग्राहकांकडून कार्डशीट, गोल्डन पेपर, वेलवेट पेपरची मागणी होत आहे. ‘फोम'च्या कमानी आरास बनवण्यासाठी विक्री होत आहे. त्यासह गोल मण्यांची माळ, मोत्यांची माळ, चंदन हार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा, लटकण यासह लाईटस्चे मोदक यांची मांडणी दुकानदारांनी केली आहे. इतर सजावट साहित्यामध्येही कागद, कापडाला प्राधान्य देण्यात आले आहे. कापडी पाने, फुलांच्या वेली, तोरणे आदि साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. आकर्षक पडदे, सजावटीसाठी झालरचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मखराभोवती सुशोभिकरणासाठी लावण्यात येणाऱ्या पानाफुलांच्या माळा, कमानी, बुके, विद्युत माळा उपलब्ध आहेत. कागदी क्रेप, मण्यांच्या, काचेच्या नळ्या किंवा शंख शिंपल्यांचा, कुंदन, खडे वापरुन तयार केलेल्या माळा बाजारात विक्रीला आल्या आहेत. खड्यांच्या कंठी, मुकुट तसेच प्लास्टिकच्या जास्वंदीच्या फुलांचा हार यांना चांगली मागणी आहे. मखर मोठ्या प्रमाणात विक्रीस आहेत.
बाजारात सजावट साहित्याचे दरः
चंदन माळ- ५० ते १२०० रुपये, कापडी माळ-८० ते १५०० रुपये, गोंड्याची माळ- १५० ते १२०० रुपये,
मोत्यांचे हार- २०० ते १५०० रुपय, लटकण- २५० ते १००० रुपये, रुद्राक्ष माळ- ५० ते १०० रुपये,
वस्त्र ५० रुपयांपासून पुढे.