‘भाजपा'चे रविनाथ पाटील यांचे परिवहन व्यवस्थापकांना पत्र

कळंबोली ते पनवेल रेल्वे स्थानक एनएमएमटी सुरु करण्याची मागणी

नवीन पनवेल :  ‘भाजपा'चे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील आणि भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी कळंबोली पोलीस मुख्यालय ते पनवेल रेल्वे स्थानक ‘एनएमएमटी'ची बस सुरु करावी, अशी मागणी परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कळंबोली येथून पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी कोणतीही बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे रिक्षावाले भरमसाठ भाडे आकारतात. कळंबोली मध्ये माथाडी कामगार तसेच नोकरी आणि कामधंद्यासाठी जाणारा वर्ग, विद्यार्थी यांच्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी एकही बस सेवा, रेल्वे सेवा किंवा दुसरा शासकीय वाहतूक सेवेचा आधार नाही. पर्यायाने रहिवाशांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठा आर्थिक भार त्यांच्या खिशावर पडतो.

त्यामुळे कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथून सेक्टर-१४, डी-मार्ट, बिमा कॉम्प्लेक्स, कळंबोली सर्कल, खांदा कॉलनी या मार्गे पनवेल रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी बस सुरु करावी, अशी मागणी ‘भाजपा'चे कळंबोली शहराध्यक्ष  रविनाथ पाटील यांनी परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी पाटील यांच्या समवेत ‘भाजपा भटके विमुक्त आघाडी'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली शहर सरचिटणीस दिलीप बीस्ट, ‘उत्तर भारतीय मोर्चा'चे मंडळ संयोजक केशव यादव उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज