नवी मुंबईत ‘स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस' उत्साहात साजरा

नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात

नवी मुंबई : ‘संयुक्त राष्ट्रसंघ'मार्फत ७ सप्टेंबरचा दिवस ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. याबाबतच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ७ सप्टेंबर रोजीच्या ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन'निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहर अभियंता  संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली, अतिरिक्त शहर अभियंता तथा या उपक्रमाचे नोडल अधिकारी शिरीष आरदवाड यांच्या नियोजनातून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिमा आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग कार्यालयांप्रमाणेच पर्यावरण प्रयोगशाळा, अग्निशमन केंद्रे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळ अशा विविध ठिकाणी निळ्या आकाशासाठी वायू प्रदुषण टाळण्याची तसेच पर्यावरण संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छताकर्मी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांनीही उत्साही सहभाग घेतला.

यानिमित्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दर्शनी जागी जनजागृतीपर फलक लावण्यात आले असून त्यावर प्रवास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. वाहन खरेदी करताना आणि प्रवास करताना इलेक्ट्रिकल अथवा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यावे. आपल्या वाहनाची नियमितपणे पीयुसी तपासणी करावी. नवी मुंबई महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या युलू जन सायकल तसेच ई-बाईक सहभाग प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा. बांधकामाचा राडारोडा इतरत्र न टाकता महापालिकेच्या सी ॲन्ड डी वेस्ट प्रकल्पाला हस्तांतरीत करावा. घर आणि हॉटेलमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर करावा. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासना करावी. नुतनीकरणयोग्य ऊर्जांचा वापर करावा असे विविध जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले आहेत.

नवी मुंबई महापालिका स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत शहराची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवित असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन ठेवून या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘भाजपा'चे रविनाथ पाटील यांचे परिवहन व्यवस्थापकांना पत्र