शाडूच्या गणेशमुर्तीची कला जिवंत ठेवणारे ‘चिरनेर'चे कलानगर

शासनाने मूर्ती कारागिरांना आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी

उरण : यावर्षी अधिक मास महिन्यामुळे श्री गणेश चतुर्थी उत्सव १९ सप्टेंबर रोजी सुरु होत असल्याने आणि या उत्सवासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी राहिल्याने चिरनेर कलानगर मधील मुर्तीकारांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तीना रंग काम करण्यास सुरुवात केल्याचे चित्र कलानगरीत पहावयास मिळत आहे.

पेणच्या गणेशमूर्ती कलेला तोडीस तोड देणारे चिरनेर कलानगरातील २२ कुंभार समाजाचे कुटुंब सुमारे ६५ वर्षापासून माती बरोबर शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. कुंभार समाजाला शेती नसल्याने आपल्या कलेच्या पाठबळावर उन्हाळ्यात मातीची भांडी आणि गणेशमूर्ती, नवरात्रोत्सवात दुर्गामातेच्या मुर्ती घडवून कुंभार समाज बांधव आपआपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

सध्या चिरनेर कलानगर मधील गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, रमेश म्हशीलकर, दामु आण्णा चौलकर, प्रकाश चिरनेरकर, नारायण चौलकर, भालचंद्र हातनोलकर, उरण तालुका कुंभार समाज अध्यक्ष विष्णू चौलकर, विलास हातनोलकर, रंगनाथ चौलकर, भाई चौलकर, दिपक गोरे, नरेश हातनोलकर, नारायण हातनोलकर या कलाकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न घडविता इको फ्रेंडली शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याच्या कामांना प्राधान्य दिल्याचे चित्र कलानगरात पहावयास मिळत आहे.

चिरनेर कलानगर मधील मूर्ती कलेला जागेचा अभाव आणि आर्थिक पाठबळाचा अभाव यामुळे मर्यादा पडल्या आहेत. तसेच शाडूच्या मातीत आणि रंगाच्या किंमतीत होणारी वाढ यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात सातत्याने खंडीत होणारा विद्युत पुरवठा यामुळेही त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील आज प्रत्येक कारखान्यात मूर्ती कारागीर शाडू मातीच्या ७५ ते २५० लहान-मोठ्या मूर्ती घडविण्याचे काम करत आहेत.

चिरनेर कलानगर मध्ये घडविण्यात येणाऱ्या गणेशाच्या मूर्ती या उरण, पनवेल बरोबर नवी मुंबई, ठाणे, मुंबई सारख्या शहरात गणेशभक्त घेऊन जात आहेत. गावातील खड्डे युक्त रस्त्यांचा त्रास गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, शासनाने मूर्ती कारागिरांना आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली तर कुंभार समाज पुढेही मूर्ती कला जिवंत ठेवणार आणि या कलेच्या पाठबळावर समाजाची उन्नती होईल. -प्रसाद चौलकर, मूर्तीकार- चिरनेर. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्ह्यात २७ तास अखंड वीज पुरवठ्यासाठी ४,५०० कोटींचा आराखडा