गणेशोत्सव काळात संपूर्ण परिसर, रस्ते सुस्थितीत व नीटनेटके ठेवण्याचे आयुक्त बांगर यांचे निर्देश

गणेशोत्सव काळात संपूर्ण परिसर, रस्ते सुस्थितीत व नीटनेटके राहतील या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्ते व विभाग कचरा, डेब्रीज, खड्डेमुक्त व फेरीवाला मुक्त राहतील या दृष्टीने सर्व सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांनी प्रभागसमिती निहाय प्रत्यक्ष पाहणी करुन संपूर्ण उत्सव काळात सतर्क रहावे असे निर्देश महापालिका आयुक्त यांनी अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर स्वच्छ व नीटनेटके राहील या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही करावी असेही त्यांनी नमूद केले.

 गणेशोत्सव दहा दिवसांवर आलेला आहे. संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त, कचरामुक्त, डेब्रीजमुक्त व फेरीवाला मुक्त असतील याची विशेष दक्षता घ्यावी. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुक मार्ग सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांची आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथील रस्तेदुरूस्तीची कामे ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करुन घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत उत्सव काळात गणेशभक्तांना व नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी. यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात  प्रमुख मार्गापासून ते अंतर्गत रस्त्यांना भेटी देवून आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच रस्त्यावर सार्वजनिक उत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्याचे नुकसान होणार नाही या दृष्टीने सर्वानी खबरदारी घ्यावी. गणेश आगमन व विसर्जन मार्ग व अंतर्गत रस्ते पूर्णत: डेब्रीमुक्त राहतील ही जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची राहील यासाठी प्रभागसमितीनिहाय पथके गठीत करण्यात यावीत व सदर पथकांच्या माध्यमातून उत्सवपूर्व व उत्सवकालावधीत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पडलेले डेब्रीज उचलण्याची कार्यवाही सतत चालू ठेवावी. गणेश आगमन व विसर्जन मार्गावर  फेरीवाल्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधेचा सामना करावा लागतो याबाबत गणेश मंडळांनीही त्यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. तरी कोणत्याही परिस्थितीत गणेश आगमन व विसर्जन मार्गावर फेरीवाले राहणार नाहीत याची जबाबदारी परिमंडळ उपायुक्तांची राहील असेही आयुक्तांनी नमूद केले.

तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावर सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व या सर्व कामांवर नगरअभियंता यांनी नियंत्रण ठेवावे असेही आयुक्त श्री. बांगर यांनी बैठकीत नमूद केले. उत्सव काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात, सर्वत्र आनंदाचे वातावरण असते, परंतु कोणाच्या कामकाजातील हलगर्जीपणामुळे उत्सवास गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, यासाठी सर्वांनी संयुक्तरित्या काम करावे अशा सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.

साफसफाईबाबत स्वच्छता निरीक्षकांनी  सजग रहावे

संपूर्ण गणेशोत्सव काळात शहर स्वच्छ राहिल या दृष्टीकोनातून संबंधितांनी खबरदारी घ्यावी. सहाय्यक आयुक्त यांनी हजेरी शेडवर भेटी देवून साफसफाईच्या कामाचा आढावा घ्यावा. ज्या हजेरी शेड वर नियुक्त कर्मचाऱ्यांपेक्षा संख्या कमी असेल त्या कंत्राटदारावर कारवाई प्रस्तावित करावी. यांत्रिकी पध्दतीने रस्त्याची सफाई होईल याकडे लक्ष द्यावे. उत्सव कालावधीमध्ये यांत्रिकी पध्दतीने साफसफाई अधिक काळ करावी तसेच यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यासाठीच्या रस्त्यांची निवड विचारपूर्वक केली जावी असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.  

गणेश आगमन मार्ग व विसर्जन मार्ग यावर कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी घरगुती कचरा पडलेला दिसणार नाही याबाबत यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छता निरीक्षकाच्या माध्यमातून प्रमुख रस्त्यांवरील कचरा पडणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी कचरा पडू नये यासाठी घरगुती कचरा संकलन बळकट करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी तसेच त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी.

विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी

महापालिका कार्यक्षेत्रात मूर्ती विसर्जनासाठी  कृत्रिम तलाव प्रत्येक विभागात उपलब्ध केले जात असले तरी कृत्रिम तलावांची संख्या अत्यंत कमी आहे. यापुढील कृत्रिम तलाव हे खड्डा न खणता तयार करावेत, जेणेकरुन जागेचे नुकसान होणार नाही व संभाव्य अपघातही टाळू शकतो. नैसर्गिक स्त्रोत असलेल्य ठिकाणी गणेश विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन होणे हे प्राधान्याने अपेक्षित असते. शहरभर टप्प्याटप्प्याने कृत्रिम तलावांची संख्या वाढविल्यास नागरिकांना गणेश विसर्जनासाठी फार दूर जाण्याची गरज पडणार नाही. तसेच पर्यावरणपूरक गणेशउत्सवासाठी मो्ठया प्रमाणावर हातभार लागतो. मूर्ती विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशानेही कृत्रिम तलावांचे जाळे वाढवावे या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. गणेशमूर्तीचे पहिले विसर्जन दीड दिवसांनी केले जात असल्यामुळे गणेशचतुर्थीच्या दिवशीच सर्व कृत्रिम तलाव कार्यरत असतील याची खात्री करुन घ्यावी असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले. तसेच कृत्रिम तलावांचे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णवेळ कृत्रिम तलावात पाण्याचा साठा असल्यामुळे पाण्यात कोणी पडून दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक नेमावेत.

झाडांच्या फांद्याची छाटणी करावी

ज्या मार्गावरुन गणेशमूर्तीची ने-आण केली जाणार आहे अशा ठिकाणी झाडांच्या फांद्यामुळे अडथळा निर्माण होत असेल त्या ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात यावी. काही ठिकाणी विद्युत ओव्हरहेड केबल्स लोंबकळत असल्याचे दिसून याबाबत महापालिका विद्युत विभाग व एमएसईबी विभागाने संयुक्तरित्या पाहणी करुन सदर ओव्हरहेड वायरबाबत उपाययोजना कराव्यात.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘महावितरण'च्या डीपी लगत पडलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी