‘अध्यापनातले दीपस्तंभ' या विषयावर प्रा. दवणे यांचा शिक्षकांशी दिलखुलास संवाद

नव्या पिढीत सांस्कृतिक आरोग्य पेरण्याचे काम शिक्षकांनी करावे - प्रा. प्रवीण दवणे

नवी मुंबई : विविध प्रसार माध्यमांच्या विळख्यातून नव्या पिढीला स्वच्छ वाटेवर नेण्याचे आव्हान आजच्या शिक्षकांसमोर असून प्रकाश दाखवणाऱ्या दीपज्योतीसारख्या असलेल्या वाचनाची गोडी लावून सांस्कृतिक आरोग्य पेरण्याचे काम शिक्षकांनी करावे, असा संदेश सुप्रसिध्द साहित्यिक, वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी दिला.

‘शिक्षक दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी ‘अध्यापनातले दीपस्तंभ' या विषयावर प्रा. प्रवीण दवणे यांनी उपस्थित शिक्षकांशी दिलखुलास संवाद साधला.

दीपस्तंभ दिसणे काळोख दूर होण्याची सुरुवात असते असे सांगत प्रा. प्रवीण दवणे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी कथन करीत आज तुम्ही-आम्ही जे काही आहोत, ते त्या काळातील शिक्षकांमुळे असे सांगितले.

अखंड विद्यार्थीपण ज्याला जपता येते त्याचाच शिक्षकपणाचा विस्तार होतो. शिक्षकाची नोकरी कागदावर असते. पण, व्रत काळजावर जपावे लागते असे मत व्यक्त करीत प्रा. दवणे यांनी मनाचा टीपकागद सतत जागा ठेवा आणि नवनवीन माहिती, ज्ञान घेऊन अद्ययावत रहा, असा संदेश दिला. ज्याला आपले वय आणि मनस्थिती पुसता येते तो आदर्श शिक्षक होय. स्वतःचा मूड बाहेर ठेवून हसतमुखाने वर्गावर जा, मग बघा, ते विद्यार्थी तुम्हाला जन्मभर पुरणारा आनंद देतील, असा मंत्रही त्यांनी यावेळी दिला.

पुस्तक वाचनाने सर्वांगीण विकास होतो त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे सांगतानाच मुलांना वाचणारे शिक्षक, आई-बाबा दिसले पाहिजेत तर त्यांना वाचनाचे महत्त्व जाणवेल. समर्पणाचे, निष्ठेचे कोचिंग क्लासेस नसतात त्यासाठी आपणच आपल्याला तपासायचे असते. सध्या स्वामी विवेकानंदांचे ‘मनुष्यत्वाचा विकास म्हणजे शिक्षण' असे प्रेरणादायी विचार नव्या पिढीच्या मनात रुजवणारा ‘तेजाकडून तेजाकडे' कार्यक्रम सामाजिक जाणीवेच्या उद्देशाने करत आहे. कागदावर पर्मनंट झालो म्हणजे शिक्षक झालो असे नाही तर मुलांच्या काळजावर पर्मनंट व्हा, अशा शब्दात प्रा. प्रवीण दवणे यांनी शिक्षकांना प्रोत्साहित केले.

शिक्षक विद्यार्थ्यांमुळे पूर्ण होतो. त्यामुळे शिक्षक दिनी विद्यार्थ्याचा गौरव करणे महत्वाचे वाटते. माझे शिक्षकपण पूर्ण करणारा विद्यार्थी म्हणून प्रा. प्रविण दवणे यांनी यावेळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांना स्वतःचा ‘मौनदाह' काव्यसंग्रह देऊन सन्मानित केले.

प्रारंभी प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती तथा शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी पुष्पमालिका अर्पण करुन प्रतिमापुजन करण्यात आले. शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट यांच्या हस्ते प्रा प्रवीण दवणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव उपस्थित होते. महापालिका शाळा क्र.४२, घणसोलीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करुन कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली.

दरम्यान, सदर कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सव काळात संपूर्ण परिसर, रस्ते सुस्थितीत व नीटनेटके ठेवण्याचे आयुक्त बांगर यांचे निर्देश