उद्यान उघडण्याची-बंद करण्याची वेळ वाढवण्याची ‘काँग्रेस'तर्फे मागणी

 जुईनगर मधील शाहीर कृष्णा पाटील उद्यानाच्या वेळेमुळे रहिवाशांची गैरसोय

नवी मुंबई : जुईनगर, सेक्टर-२३ मधील महापालिकेचे शाहीर कृष्णा पाटील उद्यान स्थानिक रहिवाशांकरिता अन्य उद्यानाप्रमाणेच अधिकाधिक वेळ उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर आणि ‘काँग्रेस'चे जुईनगर विभाग अध्यक्ष महानंद रामराजे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

जुईनगर, सेक्टर-२३ मध्ये महापालिकेचे शाहीर कृष्णा पाटील उद्यान आहे. या उद्यानात सभोवतालच्या जुईनगर नोड मधील, जुईपाडा गावातील तसेच साडेबारा टक्के भूखंडावरील इमारतीमधील रहिवाशी येत असतात. या उद्यानात व्यायामासाठी (ओपन जीम) साहित्यही उपलब्ध आहे. या उद्यानाचा स्थानिक रहिवाशी चालण्यासाठी आणि व्यायामासाठी उपयोग करतात. दुसरीकडे नवी मुंबई शहरातील महापालिकेची अन्य उद्याने सकाळी लवकर सुरु होतात आणि रात्री उशिरापर्यत सुरु असतात. जेणेकरुन रहिवाशांना सकाळी व्यायामासाठी तर बागडण्यासाठी उद्यानाचा वापर व्हावा, असा हेतू असतो.

मात्र, जुईनगर मधील शाहीर कृष्णा पाटील उद्यान दुपारी १२ वाजता स्थानिक रहिवाशांसाठी उघडले जाते आणि ते सांयकाळी ६ ते ७ वाजता पुन्हा बंद केले जाते. सदर काय प्रकार आहे? उद्यानाची अशी वेळ कोणी निश्चित केली आहे? यामुळे स्थानिक रहिवाशांना ना सकाळी आणि ना संध्याकाळी उद्यानाचा चालण्यासाठी अथवा व्यायामासाठी वापर करता येत नसल्याचे विद्या भांडेकर आणि महानंद रामराजे यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शाहीर कृष्णा पाटील उद्यानाच्या अशा वेळेमुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अन्य उद्यानांप्रमाणेच शाहीर कृष्णा पाटील उद्यान सकाळी लवकर किमान ६ वाजता उघडण्यात यावे आणि रात्री ११ वाजता बंद करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी विद्या भांडेकर आणि महानंद रामराजे यांनी केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या तज्ञ शिक्षकांची कार्यशाळा संपन्न