जिल्हा विकास आराखडा संदर्भातील कार्यकारी समितीची बैठक संपन्न

जिल्हा विकास आराखड्यासाठी विविध क्षेत्राचे विश्लेषण - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होण्यासाठी जिल्ह्यांचे योगदान त्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या क्षेत्राची बलस्थाने, कमतरता, संधी यांचे विश्लेषण करुन माहिती पाठवावी. जेणेकरुन जिल्हा विकास आराखड्यात त्यांचा समावेश करुन एक परिपूर्ण आराखडा शासनाला सादर करता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

जिल्हा विकास आराखडा संदर्भातील कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीप्रसंगी ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सहसंचालक अमोल खंदारे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वि. मु. सिरसाट, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक संगिता मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी फरोद खान, मुंबई अर्थशास्त्र संस्थेचे प्रा. सुरेश मैद यांच्यासह कार्यकारी समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्याची अर्थव्यवस्था सन २०२७-२८ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यातील बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात कोणत्या क्षेत्राच्या वाढीसाठी संभाव्य संधी उपलब्ध आहेत, ते ओळखणे आवश्यक आहेत. जिल्हा विकास आराखड्यात समाविष्ट करावयाच्या बाबीसाठी सर्व प्रथम सर्व विभागांनी आपल्या विभाग, क्षेत्रनिहाय तथ्य आणि सांख्यिकी माहिती गोळा करावी. त्यानंतर त्या क्षेत्राची बलस्थान, कमतरता, त्या क्षेत्रातील संधी आणि धोके यांचे विश्लेषण करुन अहवाल सादर करावा. जेणेकरुन जिल्ह्याची अर्थव्यवस्था वाढीसाठी जिल्हा विकास आराखड्यात सूचना करता येतील. तसेच जिल्ह्यातील अर्थव्यवस्था वाढीसाठी कोणकोणते क्षेत्र उपयोगी ठरतील यावर तसेच आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करावे. लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांवर यामध्ये भर देण्यात यावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी दिल्या.

जिल्हा विकास आराखड्यात ग्रामीण भागाचे योगदानही महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ‘जिल्हा परिषद'च्या वतीने सामाजिक क्षेत्राच्या वाढीवर भर देण्यात येत असून महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येत असल्याचे जिंदल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहसंचालक अमोल खंदारे यांनी जिल्हा विकास आराखडा कसा तयार होणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत, याची सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन