माजी सैनिकांना मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सूट

पनवेल महानगरपालिका  तर्फे माजी सैनिकांना मालमत्ता कराच्या सामान्य करात १००% सुट

पनवेल : "माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजने" अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना व त्यांच्या विधवा पत्नींना सामान्य करातून शंभर टक्के सुट देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी सुधारित आदेश काढून घेतला आहे.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय अन्वये पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वास्तव्य करणा-या सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला "मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला कर माफी योजना" या योजने अंतर्गत एका मालमत्तेचा मालमत्ता कराच्या सामान्य करात १००% सुट देण्यात येणार आहे. ही सवलत दिनांक ०१ एप्रिल२०२३ पासून लागू करण्यात आली आहे.

यापूर्वी माजी सैनिकाना सामान्य करामध्ये 8% सवलत होती. माजी सैनिकाना 1 एप्रिल 2023 पासून सामान्य कर पूर्ण माफ करण्यात येत आहे.ज्या माजी सैनिकांनी दिनांक १ एप्रिल २०२३ ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान मालमत्ता कर भरणा केला आहे, त्याची सामान्य करात भरणा केलेली रक्कम पुढील वर्षाच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये समायोजित करण्यात येईल.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रभाग 'अ' खारघर येथे दिनांक ११ सप्टेंबर, प्रभाग ब कळंबोली येथे १२ सप्टेंबर, प्रभाग क कामोठे येथे १३ सप्टेंबर, प्रभाग ड पनवेल येथे १४ सप्टेंबर रोजी ११:००ते २:०० या वेळेत माजी सैनिकांनी आपले अर्ज दाखल करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.

सदर योजनेचे लाभार्थी होण्यासाठी खालील अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१) सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्ष सलग रहिवासी असावा. त्याकरिता त्यांने सक्षम प्राधिका-याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२) कर माफीस पात्र ठरणा-या व्यक्तीने संबंधित जिल्हाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

३) कर माफीस पात्र व्यक्ती राज्यातील एकाच मालमत्तेकरिता कर माफीस पात्र राहतील. तसे घोषणापत्र त्यांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांना सादर करणे आवश्यक राहील.

४) सदर योजनेचा लाभ संबंधित माजी सैनिक आणि सैनिक पत्नी / विधवा हयात असे पर्यंतच देय राहील.तसेच, अविवाहीत शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आई वडील हयात असेपर्यंत हे लाभ देय राहतील.

५) सदर योजनेसाठी माजी सैनिक याचा अर्थ माजी सैनिक (केंद्रीय नागरी सेवा व पदांवर पुर्ननियुक्ती) सुधारणा नियम २०१२मध्ये विहीत केलेल्याप्रमाणे राहिल.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्हा विकास आराखडा संदर्भातील कार्यकारी समितीची बैठक संपन्न