‘स्वच्छ वायू सर्वेक्षण' स्पर्धेत ठाणे शहराचा देशात तिसरा क्रमांक

भोपाळ येथील कार्यक्रमात आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वीकारला पुरस्कार

ठाणे : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण भारतात आयोजित केलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण' स्पर्धेत ठाणे शहराने देशपातळीवर ३ रा क्रमांक पटकावला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निवडण्यात आलेल्या १३१ शहरांमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतून ठाणे शहराने देशात ३ रा क्रमांक पटकावला. भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात ‘मध्य प्रदेश'चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. रोख रक्क्म ५० लाख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभाग अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १३१ शहरांची निवड करण्यात आली होती. स्वच्छ वायू सर्वेक्षण, MOEF&CC चा एक नवीन उपक्रम, हवेच्या गुणवत्तेवर आणि १३१ शहरांमध्ये शहर कृती आराखड्यांतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारावर शहरांची क्रमवारी लावण्यात आली. या क्रमवारीसाठी देशभरातून निवडलेल्या एकूण १३१ शहरांपैकी १० लाखांहून अधिक रहिवासी असलेल्या श्रेणी १ अंतर्गत ४७ शहरे, ३ लाख ते १० लाख लोकसंख्येची श्रेणी २ अंतर्गत असलेली ४४ शहरे आणि ३ लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली श्रेणी ३ अंतर्गत ४० शहरे आहेत. ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण'मध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये जागरुकता पसरवणे, स्वच्छ हवेच्या आरोग्यावरील फलदायी परिणामांबद्दल नागरिकांना माहिती देणे, वेगवेगळ्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तुलना करणे आणि सर्वांसाठी स्वच्छ हवेचे ध्येय साध्य करणे, अशी उद्दिष्टे आहेत.

शहरांतील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते बांधणी, ई-बस सुविधा, बांधकाम आणि विनाशक कचरा व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण, शहरांतील पीयुसी सुविधा-पीयुसी तपासणी, रस्त्यांच्या कडेला आणि दुभाजकांवर वृक्ष लागवड, ई-वाहन चार्जिंग सुविधा, शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांचे प्रमाण, सीएनजी आणि पेट्रोल पंपांची संख्या, जनजागृतीचे उपक्रम, इत्यादी घटकांच्या कसोटीवर स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत मुल्यांकन करण्यात आले.

स्वयं-मुल्यांकन आणि तृतीय पक्ष मुल्यांकनाच्या आधारे, स्पर्धात्मक संघवादाच्या भावनेने प्रत्येक गटातील ३ सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. शहराची क्रमवारी वेगवेगळ्या डोमेनमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मुल्यांकन करुन करण्यात आली. यात एकूण २०० गुणांपैकी १८५.२ गुण मिळवून ठाणे शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मध्य प्रदेशातील इंदोर शहराने १८७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराने १८६ गुण प्राप्त करुन दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.

चालू वर्षामध्ये शहरामध्ये  मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करण्यावर भर देण्यात आला. तसेच यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई, एकूण रस्त्यांपैकी काँक्रीट आणि मास्टिक रस्त्यांच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ त्यामुळे धुळीचे प्रदुषण कमी होण्यासाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थितती, शहरामध्ये मोठ्या संख्येने येत असणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीचा कालबध्द आणि गुणवत्तापूर्ण विनियोग या बाबींमुळे ठाणे शहराला सदरचा बहुमान प्राप्त झाला. या माध्यमातून भविष्यामध्ये शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये गॅस आधारित शवदाहिनी निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. तसेच पी.एम.ई. बससेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे परिवहन उपक्रमाकडील इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. अशा प्रकारे ठाणेकरांसाठी अधिक आरोग्यदायी वातावरण निर्मितीमध्ये नक्की हातभार लागेल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

मिशन लाईफ फॉर एन्व्हायर्नमेंट...
पंतप्रधान नरेंद्र यांनी पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत मिशन लाईफ उद्दिष्ट निश्चित करुन दिले. ‘लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायर्नमेंट' असे त्याचे घोषवाक्य असून पर्यावरण जागरुक जीवनशैलीबाबत चळवळ आहे. पर्यावरणाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे, असे या मोहिमेचे उद्दिष्ट असून मिशन लाईफ म्हणजे पर्यावरणाचे रक्षण-संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक कृतीला चालना देण्यासाठी भारताच्या नेतृत्वाखाली जागतिक जनचळवळ आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माजी सैनिकांना मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सूट