गावांमध्ये बोली लावून फोडण्यात आल्या गावकीच्या हंडी

‘स्मार्ट सिटी'मध्ये ‘बोली हंडी'ची परंपरा कायम

वाशी : स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला आलेल्या नवी मुंबईत शहरात आजही येथील ग्रामस्थांनी आपली सणांची परंपरा कायम ठेवली आहे. आजही येथील गावागावात गावकीच्या ‘एक गांव एक अशी बोली दहीहंडी'ची परंपरा जोपासली जात आहे. गावांमधील दहीहंडी फोडण्यासाठी एक हजारापासून ते एक लाखापर्यंत बोली लावली जाते. याशिवाय गावकीची मानाची बोली असलेली हंडी फोडल्यानंतरच इतर हंड्या फोडल्या जातात.

महाराष्ट्राला सणांची मोठी परंपरा आहे. विभागवार सण आपापल्या रितीरिवाजाने साजरे केले जातात. मात्र, कोकणातील सणांचा माहोल काही वेगळाच असतो. नवी मुंबई शहर कोकण विभागात मोडते. मात्र, नवी मुंबई शहर येथील भूमीपुत्रांच्या १०० % जमिनीवर वसले असीम आज स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला आले आहे. आज शहराचे रुपडे जरी बदलेले असले तरी येथील ग्रामस्थांनी आपल्या सणांच्या परंपरा अबाधित ठेवत ती परंपरा अनेक वर्षांपासून शहरात जोपासली जात आहे. त्यातीलच एक म्हणजे दहीहंडी उत्सव आहे. काळ बदलतो, तसे शहर बदलते; मात्र गावकीचा मान असलेल्या ‘बोली हंडी'ची परंपरा अजुनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

आगरी आणि कोळी समाजाचे विशेष आकर्षण असलेली गावकीची बोली दहीहंडी गावातील गांवदेवी, मारुती किंवा गणपती, विठोबा-रखुमाईच्या मंदिरात बांधली जाते. या बोली दहीहंडीत अख्खे गावच सहभागी होते. गावातून आधी ढोल-ताशांच्या गजरात हंडी घेऊन पालखी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पालखी ज्या वेळी गावातील मंदिरात पोहोचते, त्यानंतर बोली सुरु केली जाते. ‘बोली हंडी'ची परंपरा तुर्भे गांव, कोपरखैरणे, सानपाडा, कोपरी गांव, घणसोली, गोठीवली, ऐरोली गांव, दिवा गांव, शिरवणे, नेरुळ अशा २९ गावांमधून अनेक गावांनी आजही जोपासली आहे. ‘बोली हंडी'मधून मिळणारी जी काही रक्कम असते, ती गावातील आध्यात्मिक कार्यासाठी वापरली जाते.

घणसोली, कोपरखैरणे गावात दहीहंडीला वारकरी संप्रदायाची जोड...

स्वातंत्र्य सैनिकांचे गांव म्हणून ओळख असलेल्या घणसोली मधील ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवाची १२१ वर्षांची परंपरा जपली आहे. गावात दहीहंडी निमित्त ‘अखंड हरिनाम सप्ताह'चे आयोजन केले जाते. घणसोली गावातील सात आळ्यांपैकी दरवर्षी प्रत्येक आळीला त्या त्या सणाचा मान दिला जातो. त्यानुसार यंदा घणसोली गावातील नवघर आळीला तो मान मिळाला आहे. घणसोली पाठोपाठ कोपरखैरणे गावात देखील १९६० पासून ‘अखंड हरिनाम सप्ताह'चे आयोजन करत दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. तर आग्रोळी गावात देखील १९६१ पासून ‘एक गाव एक हंडी'ची परंपरा कायम आहे.

या व्यतिरिक्त शिरवणे गावात पिढ्यान्‌ पिढ्या उंच उडी मारुन डोक्याने हंडी फोडण्याची परंपरा सुरु आहे. पावणे गावात डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी फोडली जाते. सानपाडा गावात श्री गोकुळअष्टमीच्या दिवशी रात्री श्री कृष्ण जन्मावेळी दर्शनासाठी येथील श्री दत्त मंदिर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची आणि ग्रामस्थांची गर्दी असते. यानंतर दुसऱ्या दिवशी सानपाडा गावातही भजन मंडळींच्या साथीने गावात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी उभारलेल्या दहीहंडी बोली लावून फोडण्यात येतात.

कोपरी गावातील हंडीला ३३ हजारांची बोली
कोपरी गावात श्री कृष्णाजन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. रात्री श्रीकृष्ण अध्याय वाचनाचा  कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गीत गाऊन आणि आरती करुन जन्माष्टमी साजरी करण्यात येते. तसेच सकाळी  गावातील गांवदेवी मंदिरात बोली दहीहंडी बांधण्याची परंपरा आहे. ती हंडी फोडण्यासाठी  गावातील ग्रामस्थांकडून बोली (वार पध्दत) लावली जाते. यावेळी जो सर्वाधिक बोली लावेल, त्याला हंडी फोडण्याचा बहुमान मिळतो. त्यानुसार यावर्षी गावातील समाजसेवक विकास पाटील यांनी ३३ हजार रुपयांची बोली लावून हंडी फोडण्याचा बहुमान पटकावला.

तुर्भे गावात दहीहंडीची ५९ वर्षांची परंपरा कायम
५९ वर्षाची परंपरा राखत तुर्भे गावामध्ये श्रीकृष्ण जन्मानिमित्त दहीहंडी बोली पध्दतीने फोडण्यात आली. गावातील मंदिर ट्रस्टम सदस्य चंद्रकांत रामदास पाटील, विवेक पाटील  आणि ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली बोली लावून तसेच त्याचे जास्त बोली लावून धरली. यानंतर तुर्भे  गावातील ग्रामस्थ गजानन पाटील यांचे नातू मीत रुपेश पाटील यांनी ४० हजार रुपये बोलून  दहीहंडी फोडली. संध्याकाळी हनुमान मंदिरतून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये गावातील सर्व कुटुंबातील सदस्यांना पालखीचा भोई होण्याचा मान देण्यात आला.

दरम्यान, दहीहंडी बोलीतून जमा झालेले पैसे मंदिर ट्रस्ट मंदिराच्या देखरेखीसाठी वापरते. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण शंकर पाटील आणि सदस्य यांनी मेहनत घेतात. गावातील सर्व कुटुंबीयांपैकी प्रत्येक ग्रामस्थांना दर दिवशी मंदिरात पहारेकरी आणि सेवेकरी याचाही मान देण्यात येतो.

‘काल्याच्या दहीहंडी'ला २.१५ लाखाची बोली
ग्राम विकास ग्रामस्थ मंडळ, कोपरखैरणे गाव आयोजित गुरुवर्य ह.भ.प. वै. अदितवार महाराज म्हात्रे यांच्या प्रेरणेने श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने ‘अखंड हरिनाम सप्ताह'च्या ५९ व्या वर्षी साजरा करण्यात आला. शेवटच्या दिवशी ‘काल्याच्या दहीहंडी'चा लिलाव (बोली) करण्यात आला. त्यामध्ये सलग ६ व्या वर्षी २ लाख १५ हजार रुपयांची बोली लावली गेली. दरवर्षी कोपरखैरणे गावातील श्री राधाकृष्ण मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर पालखी मिरवणूक हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेल्या हनुमान मंदिरात पोहोचते तेव्हा ‘दहीहंडी'च्या लिलावाला (बोली) सुरुवात केली जाते. या लिलावाच्या माध्यमातून जमलेल्या निधीतील अर्धी रक्कम श्री राधाकृष्ण मंदिराव्दारे आयोजित केलेल्या भंडारा साठी वापरात आणली जाते. तर उर्वरित अर्धी रक्कम ‘ग्राम विकास मंडळ'कडे सुपूर्द केली जाते, अशी माहिती येथील ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छ वायू सर्वेक्षण' स्पर्धेत ठाणे शहराचा देशात तिसरा क्रमांक