राजकारणात शिवराळपणा वाढून सुसंस्कृतपणाचा स्तर खाली

डिजीटल माध्यमांमध्ये ब्रेकींग न्यूज साठी सेकंदाची लढाई -पराग करंदीकर

नवी मुंबई : पत्रकार समाज बदलू शकत नाही, तर समाजाला प्रेरणा देऊ शकतो. समाजाला काय हवे यासोबत समाजाला काय द्यावे असा विचार माध्यमांनी करणे गरजेचे आहे. तपशिलाच्या अचूकतेमधून विश्वासार्हता येते. तरुणाईला वाचनाकडे वळविणे मोठे आव्हान असून आपण वाचतो तेव्हाचा विचार करतो असे सांगत समाजमाध्यमांमुळे विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य मिळते. सध्या राजकारणात उथळपणा, शिवराळपणा वाढला असून सुसंस्कृतपणाचा स्तर खाली आला असल्याचे परखड विचार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संपादक विजय कुवळेकर यांनी वाशी येथे व्यक्त केले.  

ज्येष्ठ पत्रकार कै. अशोक जालनावाला यांच्या जयंती निमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह आयोजित ‘पत्रकारिताः आजची आणि उद्याची' या विषयावरील ‘परिसंवाद'मध्ये अध्यक्षीय भाषण करताना विजय कुवळेकर बोलत होते. यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स'चे  संपादक पराग करंदीकर, पत्रकार-लेखक-राजकीय विश्लेषक राजू परुळेकर प्रमुख वक्ते म्हणून परिसंवादात सहभागी झाले होते. तर आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

आज जगात ज्ञानाची क्षेत्रे विस्तारली आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायाची मुल्ये असतात. उथळपणा, शिवराळपणाला विविध माध्यमातून अवाजवी प्रसिध्दी मिळते. लोकशाही टिकवण्यासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. उत्तम हुकूमशाहीपेक्षा वाईट लोकशाही कधीही चांगली असते, असे प्रतिपादन विजय कुवळेकर यांनी यावेळी केले.  

पत्रकारिता आजची आणि उद्याची खरेतर वाद-विवाद स्पर्धेचा विषय असू शकतो. नेत्यांच्या गाडीतून फिरणारे पत्रकार काल होते, त्यावरुन त्यांची ओळख निर्माण होती. आज पत्रकार नेत्यांच्या गाडीतून फिरले तर ते लाचार वाटतील. प्रत्येक माध्यमाच्या गरजा वेगळ्या असतात. डिजीटल माध्यमांमध्ये ब्रेकींग न्यूज साठी सेकंदाची लढाई सुरु असते. महाराष्ट्रात दर तीन दिवसात एका पत्रकारावर हल्ला होतो. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. समाजातला सोशिकपणा संपत चालला आहे. सगळ्याच बाबतीत समाजाला पत्रकारांकडून अपेक्षा असतात. सध्या पत्रकारांसाठी आव्हानांचा काळ असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक पराग करंदीकर परिसंवादात आपले मत मांडताना म्हणाले.  प्रिंट मिडीयाचे स्वतःचे स्थान आहे, सामर्थ्य आहे. टीव्हीचे देखील वेगळे महत्त्व आहे. काळानुसार लोकांना आवडते ते देण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला पाहिजे. समाजाने पत्रकारांकडून असाधारण अपेक्षा करु नयेत. समाजाची मुल्य व्यवस्था पत्रकार बदलू शकत नाहीत. पत्रकाराचे काम प्रश्न मांडणे आहे, सोडविणे नाही. तटस्थ पत्रकार काल्पनिक गोष्ट असून भविष्यात तंत्रज्ञान बदलामुळे पत्रकार कालबाह्य होत जातील. त्यामुळे पत्रकारिता तंत्रज्ञान-विज्ञान आणि समाज कसा प्रतिसाद देतो या गोष्टींवर अवलंबून असल्याचे परखड मत राजू परुळेकर यांनी व्यक्त केले.

पत्रकारांनी बातमीच्या मुळाशी जाण्याची सवय लावून घ्यावी...
हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे. त्यामुळे पत्रकारांनी ब्रेकींग न्यूजच्या मागे न धावता बातमीच्या मुळाशी जाण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी यावेळी केले. दिवंगत अशोक जालनावाला यांची पत्रकारिता समाजभिमुख होती. समाजाला दिशा दाखविण्याचे काम त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही नाईक यांनी दिला.  


तर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी स्व.अशोक जालनावाला यांच्या पत्रकारितेचे कौतुक करताना त्यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना न्याय दिल्याचे आणि अनेकांची राजकीय कारकिर्द घडविल्याचे सांगितले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कै. अशोक जालनावाला यांनी पत्रकारिता केली, असे गौरवोद्‌गार त्यांनी यावेळी काढले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गावांमध्ये बोली लावून फोडण्यात आल्या गावकीच्या हंडी