‘एनएमएमटी'च्या बसेस वारंवार नादुरुस्त; प्रवासी त्रस्त
प्रत्यक्षात दररोज ४२५ ऐवजी केवळ ३४० ते ३५० बसेस प्रवासांच्या सेवेत
तुर्भे : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसमुळे नवी मुंबई सह अन्य शहरातील प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबई वगळता अन्य शहारातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे त्या ठिकाणी सेवा देणाऱ्या ‘एनएमएमटी'च्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी, वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो, अशी प्रतिक्रिया दिली.
२३ जानेवारी १९९६ पासून सुरु झालेल्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांमध्ये आजमितीस ४२५ हुन अधिक बसेस दैनंदिन प्रवाशांच्या सेवेत आहेत. या बसच्या माध्यमातून ८० हून अधिक मार्गांवर अंदाजे ३ लाखाहुन अधिक प्रवाशांना सेवा दिली जात आहे. नवी मुंबई शहरासह कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, उरण, पनवेल, खोपोली या मार्गांवर तसेच मुंबईमध्ये दादर, बोरीवली, वांद्रेे, मंत्रालय, ताडदेव, मुलुंड, आदि मार्गांवर ‘एनएमएमटी'च्या बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये आहेत. या बस संचलनातून प्रतिदिन सुमारे ४० लाख रुपये उत्पन्न परिवहन उपक्रमाच्या तिजोरीमध्ये जमा होते.
दरम्यान, कल्याण, डोंबिवली, पनवेल, तळोजा, खारघर, उरण या शहरांमधील रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथील रस्ते नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. जुलै महिन्यात पुष्कळ पाऊस असल्याने घणसोली, तुर्भे आणि आसुडगांव या तिन्ही आगारांमधील ५० ते ६० बसेस नादुरुस्त होत होत्या. आता १५ ऑगस्ट नंतर पावसाने उघडीप घेतल्याने बस नादुरुस्तीचे हेच प्रमाण सुमारे ४० पर्यंत आहे. सदर शहरातील मार्गावरुन ‘एनएमएमटी'च्या ज्या बसेस धावतात त्या बसचे टायर फुटणे, पाटे तुटणे, बॉडी खराब होणे आदि प्रकारांमुळे बसेस अधिक प्रमाणात नादुरुस्त होत आहेत. रस्ते दुरुस्तीच्या संदर्भात संबंधित महापालिकांच्या शहर अभियंता विभागांना ‘एनएमएमटी' प्रशासनाने पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून कार्यवाहीची आश्वासनेही उलट टपाली प्रशासनाला कळवण्यात आली आहेत; परंतु ही कार्यवाही अतिशय धिम्या गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपक्रमाच्या अभियांत्रिकी विभागाकडून दररोज ४२५ बसेस उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. परंतु, दुरुस्तीच्या नावाखाली केवळ ३८० बसेस संचलनाकरिता (प्रवाशांच्या सेवेसाठी) उपलब्ध होतात. त्यातही मार्गावर बस काढल्यानंतर बसचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण सुमारे दिवसाला सरासरी ३० ते ४० इतके आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ४२५ बस दररोज प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणे अपेक्षित असताना केवळ ३४० ते ३५० बस प्रवासांच्या सेवेत असतात. परिणामी, दररोजच्या बससेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे. बस दुरुस्ती करणारे कंत्राटदार सक्षम नसल्याने आणि प्रशासनाचा म्हणावा तसा वचक त्यांच्यावर नसल्याने वेळेत बसेस दुरुस्ती होऊन मिळत नसल्याची चर्चा आहे.
विशेषतः घणसोली आगारातील बस दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराकडील बस नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नियोजित वेळापत्रकाप्रमाणे बससेवा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची ओरड आहे. मार्गिका क्र.३१,५०,८१,७१,१२५ वरील बसेस पुष्कळ प्रमाणात अनियमित धावतात असे प्रवाशांनी सांगितले. दोन बसमधील अंतर २० ते ३० मिनिटे असताना, पुरेशा बस न मिळणे तसेच मिळालेल्या बस ब्रेकडाऊन होणे यामुळे दोन बसमधील अंतर कधी कधी एक ते दीड तासापर्यंत जाते. त्यामुळे प्रवाशी रिक्षा किंवा अन्य उपक्रमाच्या बसने प्रवास करतात. त्यामुळे उपक्रमाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.