पनवेल महानगरपालिका तर्फे मिशन इंद्रधनुष्य 5.0

महापालिका क्षेत्रात बालकांच्या आरोग्यासाठी मिशन इंद्रधनुष्यच्या कार्यकारी समितीची बैठक

पनवेल: पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येत आहे. मिशन इंद्रधनुष्य 5.0 ,अतिसार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाची कार्यकारी समितीची बैठक आज उपायुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थित मुख्यालयात घेण्यात आली.

प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य् केंद्रांतील अधिकारी व परिचारीकांनी आपल्या आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या करण्याबाबतच्या सचूना उपायुक्त सचिन पवार यावेळी दिल्या.

यावेळी कार्यकारी समितीचे सर्व सदस्य, यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, जागतिक आरोग्य संस्थेचे डॉ. काटकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्याबरोबर 12 नागरी प्राथमिक आरोग्य विभागचे सर्व वैद्यकिय अधिकारी, प्रसिध्दी प्रमुख अधिकारी डॉ. प्रियांका माळी, परिचारीका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर, रूबेला आजाराच्या दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यापासून तीन टप्प्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. याची पहिली फेरी महापालिका कार्यक्षेत्रात 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान पूर्ण झाली असून यामध्ये पनवेल महानगपालिकेने  सुमारे 110 टक्के काम पूर्ण केले आहे

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या मोहिमेंतर्गत शून्य ते दोन वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभाथ्याचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेची दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे .

ही मोहीम महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नियमित लसीकरण व  मिशन इंद्रधनुष्य  5.0 अंतर्गत पालिका क्षेत्रातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी बारा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीमध्ये 228  ठिकाणी  लसीकरण सत्रे सुरू करण्यात येणार आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एनएमएमटी'च्या बसेस वारंवार नादुरुस्त; प्रवासी त्रस्त