प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा. अनधिकृत बांधकामांना पाणी, वीज यांची नवीन जोडणी मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश

ठाणे शहरासाठी अनधिकृत बांधकामे भूषणावह नाहीत -आयुवत बांगर

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या स्थितीतील अनधिकृत बांधकामे प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपल्यासाठी भूषणावह नाही. या अनधिकृत बांधकामांकडे यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे ठरवले आहे का? अशा शब्दांत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अनधिकृत बांधकामे पूर्ण होऊन तेथे नागरिकांनी वास्तव्य केल्यावर दुर्घटना होण्याची आपण वाट पाहतो आहोत का? अशी विचारणाही आयुक्तांनी सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या बैठकीत केली.

दुसरीकडे प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे. अनधिकृत बांधकामांना पाणी, वीज यांची नवीन जोडणी मिळणार नाही, याची खबरदारी घतली जावी. अशा बांधकामांना नवीन पाणी जोडणी मिळाली तर संबंधित कार्यकारी अभियंता यांना निलंबित केले जाईल, असा इशारा देखील आयुक्त बांगर यांनी यावेळी दिला.

...तर कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई
प्रत्येक अनधिकृत बांधकामावर तातडीने फलक लावण्यात यावा. सदर बांधकाम अनधिकृत असून इथे कोणी घर घेवू नये, असा पक्क्या स्वरुपाचा फलक लावावा. तात्पुरत्या स्वरुपाचा पलेक्स लावू नये. फलकाचा खर्च अनधिकृत बांधकामाच्या मालमत्ता करास जोडून वसूल करावा. तसेच सदरचा फलक कोणी काढल्यास त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा. त्याचवेळी संबंधित बांधकामास चोरुन पाणी जोडणी घेतल्याचे उघड झाले तर कार्यकारी अभियंत्यांवर थेट कारवाई केली जाईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा केला जावू नये यासाठी महावितरण आणि टोरंट यांना सूचित करावे. तरीही वीज पुरवठा केला गेला तर जबाबदारी त्यांची राहील, असे त्यांना लेखी कळविण्यास आयुक्तांनी सूचविले. महापालिकेच्या नगरनियोजन विभागाचा ना-हरकत परवाना असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत पाणी आणि वीज पुरवठा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केवळ स्लॅब नव्हे, पूर्ण बांधकाम तोडावे...
अनधिकृत पक्क्या बांधकामावर कारवाई करताना फक्त स्लॅब तोडला जातो. बांधकामाचा मूळ ढाचा तसाच राहतो. पुढे त्यावर पुन्हा बांधकाम होऊन ते आणखी  धोकादायक असते. त्यामुळे पूर्ण बांधकाम पाडून टाकावे. तसे करणे शक्य नसल्यास नेमके काय कारण आहे ते लेखी कळवावे. अनधिकृत बांधकाम तोडण्याचा खर्च संबंधित व्यक्तीकडून मालमत्ता कराची थकबाकी म्हणून वसूल केला जावा. तसेच वारंवार तोडकाम करुनही इमारत उभी राहिली तर त्या तोडकामाचा खर्च संबंधित सहायक आयुक्तांकडून वसूल केला जाईल, असा इशारा आयुक्त बांगर यांनी यावेळी दिला.

बीट मुकादम, बीट निरीक्षक यांचे काम व्यवस्थित सुरु असावे. सर्व अनधिकृत बांधकांमांच्या नोंदी रजिस्टर मध्ये ताबडतोब केल्या जाव्यात. त्यावर सहाय्यक आयुक्त यांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी. सदर नोंदी कारवाईसाठी उपयोगी पडतात, असे नमूद करत सहाय्यक आयुक्तांकडून कारवाईत विलंब झाल्यास थेट जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही आयुवत बांगर यांनी स्पष्ट केले.

सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर नोटीस न देता कारवाई...
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांची माहिती दोन दिवसात संबंधित सहायक आयुक्तांनी द्यावी. ती बांधकामे पाडण्यासाठी तातडीने कारवाई करावी. अनधिकृत संरक्षक भिंतीसह सगळे बांधकाम जमीनदोस्त करावे. तसेच विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेतली जावी. यापुढे शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निर्दशनास आले तर कोणतीही नोटीस न देता कारवाई केली जाणार आहे.

डॅशबोर्ड १५ दिवसात तयार करा...
अनधिकृत बांधकामांची तक्रार, सर्वेक्षण, यादी, नोटीस आणि कारवाई यांची दैनंदिन माहिती देणारी संगणकीय प्रणाली (डॅशबोर्ड) १५ दिवसात तयार करावा. त्याचा दर पंधरवड्याचा आढावा घेणार आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होण्यासाठी याचा उपयोग होईल. त्यातून व्यवस्थात्मक बदल होतील आणि संपूर्ण यंत्रणा त्याप्रमाणे काम करेल, त्यासाठी याची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.


कळवा, दिवा, मुंब्रा परिसरातील तक्रारी...
कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी येतात. मात्र, सदर तक्रारींची पडताळणी करुन त्यात तथ्य असल्यास यंत्रणा कारवाईत कमी पडते, याबद्दलही आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. जानेवारी २०२३ मध्ये एका परिपत्रकाद्वारे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्र सामुग्री प्रत्येक सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे. त्यांना आणखी मदत असल्यास तत्काळ तीही देण्यात येईल. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. असे असूनही अपेक्षित कारवाई होत नसेल तर सहाय्यक आयुक्त त्याला जबाबदार राहतील, असेही आयुक्त बांगर म्हणाले.

राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरु असून आपण बघ्याची भूमिका घेवू, असे चालणार नाही. अनधिकृत बांधकामे सुरुच राहिली तर तुम्ही सगळे अडचणीत याल ते लक्षात ठेवा. लकी कंपाऊंड, साईराज इमारत या दुर्घटना आपण पाहिल्या आहेत. आपल्या निष्काळजीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचणार नाही, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी. अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करु नये. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिका तर्फे मिशन इंद्रधनुष्य 5.0