ठाणे महापालिका आयोजित विचारमाला मंथन व्याख्यानमाला

शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे

 ठाणे - आमच्या शांतीवन आश्रमात जेव्हा नुकताच जन्मलेल्या बाळाला घेऊन मुली येतात...आमच्याकडे बाळाला सोपवून पळुन जाण्याचा प्रयत्न करतात.. अंधारात लपून बसतात...कधीकधी बेवारस बाळ सापडतात. तेव्हा वाटतं की, आई वर लिहिलेल्या मराठी साहित्यातील सगळ्या कविता पाण्यात बूडवून टाकाव्यात... असे भावविभोर अनुभव कथन करता- करता बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे हळवे होतात. ते समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

           डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 'विचारमंथन' व्याख्यानमालेचे नववे पुष्प 'वेगवेगळया सामाजिक आणि परिस्थितीमधील विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे अनुभव, सध्याची शिक्षण स्थिती आणि नागरिक घडविण्याच्या प्रवासातील शिक्षकांचे योगदान' या विषयावर मान्यवरांनी गुंफले. या परिसंवात वंचित, निराधार, बेघर लेकारांचे संगोपन शिक्षण यासाठी कार्य करणारे बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक श्री. दीपक नागरगोजे, ठाण्यातील सिग्नल शाळेच्या प्रकल्प्रमुख आरती परब, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या उपप्राचार्या ग्लॅडिज कॉब्राल, बालहक्क, शिक्षण या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पत्रकार यामिनी सप्रे सहभागी झाले होते. या मान्यवरांची मुलाखत आकाशवाणीचे वृत्तनिवेदक राजेंद्र पाटणकर यांनी घेतली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या हस्ते ग्रंथबुके देवून करण्यात आला.

            मराठवाड्यातील अनाथ, वंचित मुलांसाठी तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, रेडलाईट महिलांच्या मुलांसाठी शिक्षण आणि संगोपनाचे कार्य गेली 22 वर्षे दीपक नागरगोजे करीत आहेत. बाबा आमटेच्या विचारधारेने प्रेरित होवून हे समाजकार्य सुरू केल्याचे ते सांगतात. ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न समजून घेतला, ऊसतोडीसाठी मुलांना शिक्षण सोडावे लागते. ऊसतोड मजुरांच्या वेदना असंख्य आहेत, त्या जाणून घेतल्या. ऊसतोडीवर गेलेल्या बाईच्या आणि लेकरांच्या लैंगिक शेषणाच्या कित्येक घटना या दडपून टाकल्‌या जात असल्याचं लक्षात आले. अशा कित्येक घटनांना वाचा फोडण्याचे काम शांतिवनच्या माध्यमातून हाती घेतले. पंधरा वर्षाच्या आत आई होवून विधवा झालेल्या मुली एकटीने जगण्याचा संघर्ष करताना भेटल्या. परिस्थितीमुळे मुलीची जबाबदारी घ्यायला नको म्हणून जन्माला येण्याअगोदारच त्यांना खुडून टाकणाऱ्या हतबल माताही दिसल्या. मुन सुन्न करणारे भयाण वास्तव पाहिले असल्याचे श्री. नागरगोजे यांनी नमूद केले. या शोषित कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारमध्ये बसलेल्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही तर कितीतरी जबाबदार घटकांनी या प्रश्नाला सोईस्कररित्या बाजूला ठेवले असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

           आपली अर्थव्यवस्था 80 टक्के कृषीवर अवलंबून आहे, असे असताना गडचिरोलीपासून मुंबईपर्यत किंवा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यतच्या प्राथमिक शिक्षण विभागात कृषी हा विषय शिकवला जात नाही. शेती करा असे सांगतो आणि शेतीचे शिक्षण देत नाही. शेतीवर शिक्षण देणारी शिक्षणव्यवस्था नसल्याचे त्यांनी नमूद केली. यासाठी शांतीवनमध्ये जैन एरिगेशन यांच्या सहयोगाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेती हा विषय शिकवतो, आज ही मुले चांगल्या पध्दतीने शेती करण्याचे शिक्षण घेतात. 15 वर्षापूर्वी आमचा हा प्रयोग शासनानेही स्वीकारली असून शासनानेही प्रगतीवर्ग सुरु केले असल्याचे दीपक नागरगोजे यांनी नमूद केले. मुलांवर संस्कार करणारे सर्वोत्तम साहित्य सानेगुरूजीचे असून ते मुलांना चांगल्यापध्दतीने समजते.

 ठाणे हा जरी शहरी विभाग असला तरी शहरी आणि ग्रामीण विभागातील वंचित मुलांच्या अडचणी या वेगळ्या नाहीत. मी सिग्नल शाळेसाठी काम करत असताना लक्षात आले की, सिग्नलवर राहणारी ही कुटुंब स्थलांतरीत कुटुंब आहेत. या कुटुंबातील भिक्षेकरी मुलांना बालदशेत, विद्यार्थी दशेत आणण्याचा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या सात वर्षापासून करीत असल्याचे ठाण्यातील सिग्नल शाळेच्या प्रकल्पप्रमुख आरती परब यांनी नमूद केले. यासाठी संपूर्ण ठाणे शहराचा सर्व्हे करुन पुलाखाली राहणाऱ्या या स्थलांतरीत कुटुंबांची माहिती गोळा करताना हे लक्षात आले की, ठाण्यातील तीन हात नाका या पुलाखाली राहणाऱ्या कुटुंबांची संख्या जास्त आहे. या कुटुंबाच्या तीन चार पिढया येथे राहत असल्याचे लक्षात आले. ही कुटुंबे सिग्नलवर विविध वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. या मुलांच्या पालकांशी बोलल्यावर हे लक्षात आले की त्यांना शिक्षणापेक्षा पैसा मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते, शाळा ही त्यांना माहिती नव्हती. या मुलांचे प्रश्न ही वेगवेगळे होते. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या मुलांना शाळेपर्यत नेण्याऐवजी जर शाळाच त्यांच्या दारात आणावी, जेणेकरुन ही मुले पालकांच्या समोर शाळेत जातील या संकल्पनेतून तीन हात नाका येथील पुलाखाली सिग्नल शाळा सुरु झाली असल्याचे आरती परब यांनी नमूद केले. विद्यार्थीदर्शतच अकाली प्रौढ झालेल्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा हेतू असल्यामुळे सुरूवातीला या मुलांची अर्ध्या तासाची शाळा सुरू केली. हळू हळू त्यांच्या कलेने घेत, आरोग्याची काळजी कशी घ्यावी अशा सवयीपासून त्यांची सुरूवात केली. एक दोन वर्षानंतर  या मुलांना पाठ्यपुस्तकाच्या प्रवाहात आणले. गेल्या सात वर्षात सात विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले असून या सिग्नल शाळेची प्रगती होत असून हेच या शाळेचे यश आहे असेही आरती यांनी नमदू केले.

 पुण्यात पत्रकार म्हणून काम करत असतान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बालकामगारांना कामातून मुक्त करुन त्यांचे पुनर्वसन मोहिम सुरू केली होती, आणि या कार्यक्रमाच्या वृत्तांकनासाठी मी गेले होते. त्यावेळी बालकामगार काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेताना मी त्या कामाशी जोडले गेले असल्याचे बालहक्क शिक्षण या विषयाच्या अ्भ्यासक पत्रकार यामिनी सप्रे यांनी नमूद केले. पत्रकार म्हणून आपण काम करत असताना या बालकामगारांचे प्रश्न त्याचा अभ्यास करुन मांडले पाहिजे, यातून काहीतरी सकारात्मक घडेल या हेतूने मी या विषयाच्या अधिक जवळ गेले. मराठवाड्यातील काही मुलीशी बोलले असता लक्षात आले की या 22 वर्षाच्या माता झालेल्या मुलींना घरातून हाकलून दिले आहे, आणि त्या आसरा शोधतायत. शिक्ष्ण नाही आधार नाही आणि जाण्याचा पर्याय नाही. अशा अनेक मुलींना शांतीवनने आधार दिला. जर पिढी घडवायची असेल तर आर्थिक परिस्थिती कुठलीही असू दे, विषमता आपल्याकडे आहे कारण आपली लोकसंख्या जास्त आहे, परिस्थिती मान्य करुन पुढे जायचे असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे शून्य ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अजून कायदेशीर आधार नसला तरी 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मूल शाळेत असावे हा शिक्षण हक्क कायदा आहे. बालकामगार ऊसतोड कामगार असतील या मुलांशी निगडीत जेवढे प्रश्न आहेत ते 6 ते 14 या वयोगटातील मुलांचे आहेत. या वयोगटातील प्रत्येक मूल शाळेत असेल तर त्यांच्याभोवतीच्या 99 टक्के समस्या संपतात असे यामिनी सप्रे यांनी नमूद केले. यासाठी शिक्षक, प्रशासन, सरकार आणि तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी एकत्र यायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

 शिक्षण हे मुलांच्या आयुष्यातील महत्वाचे साधन आहे, यामध्ये शिक्षकांची महत्वाची भूमिका असतो. शिक्षकांनी मुलांमध्ये कधीच भेदभाव करु नये, तसेच शाळेत शिक्षकांनी शिकवताना गंमतीजंमती सांगत हसत खेळत शिक्षणाचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर शिकवताना शारिरिक क्रियांचा सहभाग ठेवून शिकवल्यास मुले ते चांगल्या आत्मसात करतात असे श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या उपप्राचार्या ग्लॅडिज कॉब्राल यांनी सांगितले. मुलांची शिक्षणाची सुरुवात ही A  तसेच अ या मुळाक्षरांपासून होते, परंतु आमच्या शाळेत आम्ही M या अक्षरापासून सुरूवात करतो, कारण M मध्ये Mummy, Maa हे शब्द तयार होतात, आणि हा शब्द मुलांच्या जास्त जवळचा असतो, कारण शाळेत आल्यावर शिक्षकांमध्ये आईला पाहत असतात, व त्यांना आपले शिक्षक अधिक जवळचे वाटू लागतात असेही त्यांनी नमूद केले. पालक मुलांना जेव्हा कोणत्याही माध्यमाच्या शाळेत घालतात, तेव्हा पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे, की त्यांनी आपला पाल्य शाळेत कशा पध्दतीने वर्तणूक करतो याबाबत शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे, परंतु अनेक पालक हे आपल्याला इंग्रजी येईल की नाही याबाबत साशंक असल्याने शाळेत भेटायला येत नाही. परंतु पालकांनी असे न करता शिक्षकांशी आपल्या पाल्याबद्दल संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य मुलांव्यतिरिक्त काही मुले ही विशेष असतात, अशा मुलांना शाळा नाकारतात, अशा मुलांसाठी शाळेत शिक्षक नसल्याचे सांगितले जाते. परंतु या मुलांना जर शिक्षकांनी जास्त वेळ देवून शिकविले तर ती मुलेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मसात करु शकतात असा विश्वासही उपप्राचार्या कॉब्राल यांनी व्यक्त केला.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा. अनधिकृत बांधकामांना पाणी, वीज यांची नवीन जोडणी मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश