नवजात बालकांच्या सुदृढ, सुयोग्य वाढीसाठी अभिनव प्रकल्प
ठाणे महापालिका आणि आयआयटी-मुंबई यांच्यात लवकरच होणार सामंजस्य करार
ठाणे : ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा' योजना अंतर्गत ठाणे महापालिका आणि आयआयटी-मुंबई संयुक्तपणे नवजात बालकांच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीसाठी उपक्रम सुरु करणार आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार लवकरच केला जाणार असून ठाणे महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची अमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
सदर उपक्रमात बाळाच्या जन्मापासून ते १० महिन्यापर्यंत बाळाचे पोषण आणि मातेची काळजी याकडे विशेष लक्ष दिले जाईल. या सोबतच बाळाला स्तनपान देण्याची विशिष्ट पध्दत यावर भर दिला जाणार आहे. आयआयटी-मुंबई सोबत कार्यरत असलेल्या ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव फॉर रुरल एरिया'च्या डॉ. रुपल दलाल यांची सदर संकल्पना असून राज्यातील इतर काही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
बाळाच्या जन्मापासून सहा महिने बाळाला इतर कोणताही आहार ना देता फक्त आईचे दूध देणे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, केवळ स्तनपान देवून बाळाच्या सर्वांगीण वाढीचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य होत नाही. स्तनपान जर योग्य पध्दतीने झाले तरच ते आई आणि बाळाच्या दृष्टीने उपयोगी ठरते. तसेच बाळाला आईच्या दुधाचा संपूर्ण क्षमतेने लाभ होऊन बाळाचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागतो. यापूर्वी ज्या जिल्ह्यात सदर पध्दतीचा अवलंब झाला आहे, त्या ठिकाणी त्या बाळाच्या वाढीच्या आलेखात लक्षणीय बदल दिसला आहे. जर गरोदर मातांना याचे प्रशिक्षण बाळाच्या जन्मापूर्वी दिले तर मातांना त्याचा वापर करणे शक्य होईल. शिवाय संपूर्ण सहा महिने योग्य पध्दतीने स्तनपानाचा लाभ घ्णाऱ्या बाळाची अपेक्षित वाढ साध्य करणे शक्य होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी ठाण्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्यातून ५० मास्टर ट्रेनर निवडले जातील. त्यांना आयआयटी मुंबईच्या तज्ञ टीम मार्फत प्रशिक्षण दिले जाईल. या मास्टर ट्रेनर इतर सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना प्रशिक्षण देतील. शेवटी त्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता यांना सदरउपक्रमाची माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यात येईल, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
सदर उपक्रम मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार असून त्यासाठी मोबाईल ॲप वापरले जाईल. मातांना सदर तंत्र चांगल्या प्रकारे समजावून देण्यासाठी बोली भाषेतील व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एखादी स्तनदा माता तिच्या बालकास योग्य पध्दतीने स्तनपान देत नसेल तर आरोग्य सेविका तिला स्तनपानाच्या योग्य पध्दती समजावून सांगेल. तज्ञांनी तयार केलेल्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून त्याबद्दल माहिती दिली जाईल. तसेच वैयक्तिक समुपदेशन आणि प्रतिसाद घेण्यावरही भर दिला जाणार आहे. स्तनपान पध्दती शिवाय सदर उपक्रमात माता आणि बालकांना पूरक पोषण आहार काय असावा याचीही माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी स्थानिक परिसरात उपलब्ध असलेली धान्ये, भाज्या यांच्या पाक कृती बाबतीतही माहिती दिली जाईल.
‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा' योजना अंतर्गत माता-बालक यांच्या पोषणासाठी आणि त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. आयआयटी, मुंबईच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे स्तनपानासारखी मुलभूत बाब जी बाळाच्या सर्वांगिण वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे, तसेच स्तनपानाच्या योग्य पध्दती या शहरातील मातांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, तेे उद्दीष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसोबतच त्यामुळे होणारा परिणाम निश्चित करुन आणि मातांकडून येणारा प्रतिसाद लक्षात घेऊन सदर उपक्रमाच्या अमलबजावणीत आवश्यक बदल केले जातील. सदरचा कार्यक्रम कालबध्द पध्दतीने राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा दुवा असणाऱ्या आशा आणि अंगणवाडी सेविका यांचे काम महत्वाचे ठरणार आहे. सदर उपक्रम संस्थात्मकदृष्या आरोग्य विभागाकडून स्वीकारला जाईल आणि भविष्यातही त्यांची अमलबजावणी होईल. - अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका.