शहरी भागातील बांधकामांचे हस्तांतरण करताना ‘सिडको'ने पडताळणी करण्याची मागणी

ओटल्यांवर तीन-तीन मजल्यांची इमारत उभी

वाशी :  सिडको तर्फे कोपरखैरणे भागात अल्प उत्पन्न धारकांना ओटले वाटप करण्यात आले होते. या ओटल्यावर तळ मजला बांधण्याची परवानगी होती. मात्र, सदर घर मालकांनी या ठिकाणी तीन-तीन मजल्यांचे इमले उभे केल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसींवरुन दिसून येत आहे. त्यामुळे सदर घरे हस्तांतरण करताना ‘सिडको'ने पडताळणी करुनच हस्तांतरण प्रकिया पार पाडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी केली आहे.

महापालिका कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात अल्प उत्पन्न गटाकरीता लहान क्षेत्रफळाच्या सदनिका कोपरखैरणे सेवटर- १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० तसेच सेवटर-१५, १६,१७, १८ येथे बांधण्यात आलेल्या आहेत. सिडकोद्वारा निर्मित लहान क्षेत्रफळाच्या सदनिकांकरीता विकास आराखड्यामध्ये सिडकोद्वारा अत्यंत लहान म्हणजे ४.५ ते ६ मिटर रुंदीचे रस्ते बनविण्यात आलेले आहेत. सिडकोद्वारा सदनिका वाटप झाल्यानंतर आजपावतो अनेक शेकडो सदनिकाधारकांनी अनधिकृतरित्या सदनिकांची पुनर्बांधणी करुन तळमजला अधिक तीन ते चार मजली इमारती दाटीवाटीने उभारल्या आहेत. सिडको द्वारा वितरीत लहान क्षेत्रफळाच्या सदनिकांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आणि अरुंद रस्ते यामुळे उपरोवत नमूद सर्व सेक्टर दाटीवाटीच्या वस्तीचे झाल्याने अत्यंत धोकादायक बनले आहेत. या सदनिका मधील एकूण ३३ सदनिकांची मे-२०२३ पासून सुरु असलेल्या अनधिकृत पुनर्बांधणीमुळे त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम कलम ५३, ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आल्याचे वेब-साईटवर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. याशिवाय सिडकोद्वारा ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर या नोड मध्ये एसएस टाईप सदनिका विकसित करुन त्या नागरिकांना भाडे तत्वावर देण्यात आलेल्या आहेत. एसएस टाईप सदनिकांचे हस्तांतरण सिडकोच्या माध्यमातून होत असते. हस्तांतरण करीत असताना अनधिकृत बांधकामे असलेल्या एसएस टाईप सदनिकांचे हस्तांतरण सिडकोद्वारा झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसएस टाईप मधील सदनिकांचे हस्तांतरण करताना अनधिकृत बांधकामाबाबत सिडको द्वारे पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी ‘सिडको'कडे दिलेल्या निवेदनात केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवजात बालकांच्या सुदृढ, सुयोग्य वाढीसाठी अभिनव प्रकल्प