अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुल रद्द

३९० झाडांची कत्तल वाचली; ३५० कोटी रुपयांची बचत

नवी मुंबई : ‘भारतीय जनता पार्टी'च्या माध्यमातून काढण्यात आलेल्या ‘जन आक्रोश मोर्चा'मुळे पामबीच मार्गावरील अरेंजा कॉर्नर ते कोपरी पर्यंतचा प्रस्तावित अनावश्यक उड्डाणपूल प्रकल्प महापालिकेने अखेर रद्द केला आहे. त्यामुळे उड्डाणपुलामुळे ३९० झाडांची होणारी कत्तल थांबणार आहे. तसेच उड्डाणपुलासाठी जवळपास खर्च होणारा ३५० कोटी रुपयांचा निधी देखील बचत होणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात पामबीच मार्गावर अरेंजा कॉर्नर ते कोपरी पर्यंत तीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला होता. पामबीच मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली या उड्डाणपुलासाठी जनतेच्या ३५० कोटी रुपयांचा चुराडा करण्यात येणार होता. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे सदर उड्डाणलपुल बांधण्यासाठी या मार्गावरील तब्बल ३९० झाडांची कत्तल करण्यात येणार होती. स्थानिक आमदारांनी या अनावश्यक उड्डाणपुलाविरोधात लढा सुरू केला. सदरचा उड्डाणपुल होऊ नये अशीच तीव्र भावना नवी मुंबईकरांची होती. पर्यावरण प्रेमींच्या मनामध्ये या उड्डाणपुलासाठी ३९० झाडांचा बळी जाणार असल्याने प्रचंड संताप घुमसत होता. जनभावना लक्षात सदरचा उड्डाणपुल प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पर्यावरण सचिव, नगरविकास सचिव, नगरविकास मंत्री, नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, तरीही सदर उड्डाणपुल प्रकल्प रद्द करण्यात येत नव्हता.

अखेर या उड्डाणपुलाविरोधात ‘भाजपा'च्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या झाडांना वाचविण्यासाठी यावेळी चिपको आंदोलन करण्यात आले. उपस्थित हजाराेंच्या जनसमुदाय या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी महापालिकाप्रशासनाने उड्डाणपुल रद्द केला नाही तर याहून तीव्र आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने सदरचा उड्डाणपुल रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्याअनुषंगाने अलिकडेच सदरचा उड्डाणपुल रद्द करण्याचा अंतिम निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहरी भागातील बांधकामांचे हस्तांतरण करताना ‘सिडको'ने पडताळणी करण्याची मागणी