वाशी, तुर्भे येथे ‘अनधिकृत होर्डिंग'चे पेव
महसूल बुडत असतानाही महापालिका प्रशासनाचा कानाडोळा
तुर्भे : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी आणि तुर्भे विभाग अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे वाशी आणि तुर्भे विभागात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडत आहे. मात्र, महसूल बुडत असतानाही महापालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंगकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, आयसीएल शाळा चौक, सानपाडा हायवे, सानपाडा सेक्टर-३, बधाई मार्ट, तुर्भे विभाग कार्यालय रस्ता, जुईनगर सेक्टर-२३ ते २५, अरेंजा सर्कल, वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर-१५, १६, १०, जैन मंदिर सिग्नल, एमजी कॉम्प्लेक्स, सेवटर-१२, २९ या ठिकाणी नियमितपणे वर्षाचे बाराही महिने हमखास अनधिकृत होर्डिंग लागलेले असतात. सर्वत्र अनधिकृत होर्डिंग राजरोसपणे कोणतीही अनुमती न घेता लावलेले असतात. राजकीय लोकांच्या होर्डिंगवर कारवाई होत नसल्याचे पाहून नोकऱ्या विषयी जाहिरातीचे पोस्टर, वाणिज्य आस्थापना त्यांच्या उत्पादनाची जाहिरातबाजी करताना दिसतात. संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु, अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची तरतूद असतानाही महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका उपायुक्तसह सर्व संबंधितांवर कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य करदाते करत आहेत.