मुशाफिरी : कौटुंबिक पर्यावरण निकोप हवे !

कौटुंबिक पर्यावरण निकोप हवे !

   एके काळी आर्थिक स्थिती नीटशी नसताना पैशांच्या चणचणीवरुन कुटुंबातील घटकांत वादविवाद झडत. मुलांना हवे ते पालक देत नसल्याने मुले नाराज असत. तर म्हाताऱ्या पालकांना उतारवयात पैशांअभावी योग्य त्या आरोग्यसुविधा पुरवण्यात मुले कमी पडल्याने पालक कष्टी होत. आता अनेकांकडे पैसा बऱ्यापैकी असल्याने केवळ आर्थिक कारणांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडत नाही. याच्या जोडीला आता अनेक नव्या गोष्टी घरातले पर्यावरण बिघडवण्यासाठी पुढे आल्या आहेत.

   अवतीभवती श्रावण महिन्याचे पवित्र, निसर्गरम्य वातावरण आहे. तरीही काही भागात नेमवया वेळी पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय अशी भितीही दाटून राहीली आहे. देशाच्या काही भागात अति पावसाने महापूर आणले आहेत, राहती घरे त्यातील रहिवाशांसह वाहुन गेली आहेत, इमारती कोसळल्या आहेत, रेल्वेमार्ग-रस्ते वाहून गेले आहेत. काही जनसामान्यांच्या स्थावर मालमत्तेची पार दैना उडाली आहे, मनाली, मंडी, सोलन, तसेच उत्तराखंड मधील काही तीर्थक्षेत्रांचेही गेली काही वर्षे सततचा पाऊस नुकसान करीत आहेच! ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे सूत्र तो पाऊस जणू धुडकावूनच लावत असतो.  

   हा अति पाऊस किंवा दाहक उन्हाळा जसा निसर्गासाठी नुकसानदायक असतो तसेच कौटुंबिक पर्यावरणासाठी विचित्र, अतिरेकी वागणूकीचे सदस्य त्या घरातील लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी तोट्याचेच ठरतात. ‘घरासारखे घर असावे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती' अशा ओळी या निकोप वाढीचे महत्व ठसवून जातात. पण त्या चार भिंतीच्या आड मुलांसोबत कशा प्रकारचे वर्तन होत असते? अनेक जण याबद्दल अनभिज्ञ असतात. काही घरांमधून कुटुंबप्रमुख हा व्यसनी, दारुड्या, कर्जबाजारी असतो. त्या घरातल्या मुलांचे, त्याच्या पत्नीचे जीवन एक भीषण प्रवास बनून जाते. मिळणारे वेतन दारुबाजीत उडवल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उरत नाही. मग उधारउसनवारीला सुरुवात होते. एक-दोन वेळा मित्र, सहकारी, नातेवाईक मंडळी मदत करतीलही..करतही असतात. पण ‘रोज मरे त्याला कोण रडे' या वृत्तीमुळे तेही लोक मग अंतर ठेवून वागतात. त्यानंतर नवे सहकारी शोधले जातात. त्यांना नवे वायदे, नवे भरवसे देऊन त्यांच्याकडून पैसा उचलला जातो. घरातली स्त्री या साऱ्याला विटून गेलेली असते. ती सुशिक्षित असेल तरी भंडावून जाते. चांगली नोकरी करणारी असेल तर तिच्या नवऱ्याच्या या व्यसनाधीनतेची चर्चा कार्यालयात पोहचल्याने तिथे तिला अवमानित होण्याचे प्रसंग येतात. अर्धशिक्षित असेल तर कुटुंब चालवण्यासाठी तिला चार घरची धुणीभांडी, झाडलोट करण्याची वेळ येते. माझ्या पाहण्यातील अशाच एका कुटुंबातील मुलांचे बालपण यामुळे करपून गेल्याचे मी पाहिले आहे. घरातील मुलगी गुणी, अभ्यासप्रेमी निघाली तर तिच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पैशांची चणचण भासते. बाप दारु पिऊन कुठे पडेल, कोणत्या प्रकारचे शेजारी त्याला उचलून घरी आणतील, बाप आपल्या कॉलेजमध्ये, वलासमध्ये येऊन कशा प्रकारचा तमाशा करील यातून आणखी कोणत्या मानहानीला तोंड द्यावे लागेल याच्या सतत चिंतेत असणारी मुले-मुली मी पाहिल्या आहेत. ‘दारु पिणे हा आजार आहे, दारुडी माणसे मुळची वाईट नसतात, दारुच त्यांना खराब करते' वगैरे डायलॉग बाकीच्यांनी मारणे सोप्पे! याबाबत एका सहकाऱ्याने नोंदवलेले निरीक्षण मला अंतर्मुख करते. तो म्हणे...‘आधी हे लोक दारु पिऊ लागतात. त्यानंतर दारुच यांना पिऊन टाकत असते.' यातून बाहेर येणे कठीण नाही. पण दारुड्याने मनाशी प्रथम ठरवले पाहिजे की मला सुधारायचेय. बरे व्हायचेय. ते जोवर तो ठरवत नाही तोवर त्याचा गटाराकडे, जिकडेतिकडे झोकांड्या देऊन जखमी झाल्याने दवाखान्याकडे आणि मग तरीही सुधारला नाही तर चार जणांच्या खांद्यावरुन स्मशानाकडे अवकाळी प्रवास हा निश्चित ठरलेलाच!

   केवळ दारुच कौटुंबिक पर्यावरण बिघडवते असे समजण्याचे काही एक कारण नाही. वर्तन, चारित्र्य, पूर्वेतिहास, भलतेसलते छंद, संगत याही गोष्टी कुटुंबाच्या मानसिकतेस जबाबदार असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नटाच्या मातापित्यांचा आंतरधर्मीय विवाह झालेला. पण विवाहापूर्वी त्याच्या अभिनेत्री असलेल्या मातेचे नाव दुसऱ्या एका नटाबरोबर जोडले गेलेले. त्यांचे ‘मधुर' संबंधही प्रसारमाध्यमांतून गाजलेले! त्यामुळे शालेय जीवनात सोबतच्या विद्यार्थ्याकडून शेरेबाजी या नटाला लहानपणापासून ऐकावी लागली. त्यातून पुढे वाईट लोकांच्या संगतीत गेल्याने त्याला नशिल्या पदार्थांचे व्यसन लागले. घरातील परवानाधारी पिस्तुलाने हवेत गोळीबारही करुन झाला. देशद्रोही लोकांसोबत संबंध ठेवल्याने पुढे सजाही भोगावी लागली. या साऱ्या गडबडीत कौटुंबिक पर्यावरण बिघडून गेले होतेच;  याच्या नालायकपणामुळे याने विविध लग्ने केली आणि मोडली. आता सांगा...अशांच्या घरात मोठी होणारी मुले कशी बरे सुसंस्कारी, गुणवान, नितीवान, देशप्रेमी निपजावी? मुलांचा यात काहीच दोष नसतानाही अनुवांशिकता आणि पर्यावरण त्यांना बिघडवण्यात हातभार लावीत असते ते असे! पत्रकार म्हणून वावरताना अनेकदा अनेक व्यवती, संस्था, संस्थाचालक, स्ट्रीट चिल्ड्रेन, वीटभट्टीवर मजूरी करणारे-बांधकाम मजूर म्हणून वावरणारे पालक, काही दुर्दैवी पालक, दुदैवी बालके यांच्या भेटी घेण्याचा, संवाद साधण्याचा योग येतो. त्यांच्याशी बोलताना कधीच समोर न आलेले कठोर वास्तव समजते. विविध सिग्नलवर भिका मागणाऱ्या धडधाकट तरुण महिला, पुरुष यांना मी नेहमी पाहात असतो. हल्ली वाशी स्टेशन परिसरात बऱ्यापैकी वेषभूषेत अनेक मध्यमवयीन तसेच वृध्द जोडपी ‘काही मदत करा, गावी दुष्काळ पडला आहे' असे सांगून आर्थिक मदतीची याचना येणा-जाणाऱ्या पादचाऱ्यांकडे करताना मी पाहतो. खरोखरच्या संकटांत असणाऱ्यांना जरुर मदत करावी. शक्य होईल ते सहकार्य अवश्य केलेच पाहिजे. पण खरोखरचे संकटग्रस्त आणि डुप्लिकेट संकटवाले कसे ओळखावे? आता तर श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे. त्यामुळे भिक मागणाऱ्यांना चटकन पन्नास-शंभराची नोट काढून दानाचे पुण्य पदराला बांधणारे भोळे भाविक दाते पाहायला मिळतातच! पण एरवीही त्यांना मदत करणारे लोक दिसून येतात. या याचकांपैकी अनेकांना तुम्हाला अनाथाश्रमात नेतो, एखाद्या सोसायटीत रखवालदार म्हणून नोकरी देतो, धुणीभांडी करण्याचे काम मिळवून देतो असे सांगताच, यातील अनेक लोक त्यासाठी होकार न देता तेथून पळ काढताना दिसतात. याचा अर्थ  काय काढायचा?

   चांगली मुलं निपजणं हे जसं जन्मदात्यांच्या हाती नसतं; तसंच चांगले जन्मदाते लाभणं हेही त्या घरात जन्म घेणाऱ्यांच्या हाती नसावं! अनेकदा खूप चांगले वातावरण, चांगल्या सुविधा, चांगले शिक्षण, संस्कार देऊनही काही घरातील मुले पुढे नालायक निघाल्याचे पाहायला मिळते व त्या मातापित्यांच्या नशिबी घोर निराशा येते. तर सद्‌गुणी बालके घरात आहेत, पण मातापित्यांनाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, त्यांच्यावर करायच्या सुसंस्कारासाठी सवडच नसते असेही घडते. मग बातम्या येतात..अल्पवयीन मुलाने केला जन्मदात्या मातेचा खून!, मुलीनेच पित्याचा खून भाडोत्री गुंडाद्वारे करवला, पोटच्या मुलीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या मदतीने आईनेच केले ठार वगैरे वगैरे! चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या तुलनेत अलिकडच्या काळात विविध कुटुंबांकडे बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आल्याचे दिसते. त्यामुळे निव्वळ पैशांवरुन घरातले वातावरण बिघडते, वाद होताहेत असे फारसे पाहायला मिळत नाही. मग काय पाहायला मिळते? तर नोकरी-व्यवसाय-अभ्यासातले ताणतणाव, गळेकापू स्पर्धा, व्यवितगत हेवेदावे, अहंकारी वृत्ती, ईर्षा, छुप्या स्पर्धेपोटी कुटुंबाकुटुंबांमध्ये लागलेली अहमहमिका, आई-वडिलांच्या मुलांकडून आणि मुलांच्या आईवडिलांकडून वाढलेल्या अवाजवी अपेक्षा यामुळे घरातले वातावरण बिघडतेय. वरवर सारे काही चांगले चाललेले दिसत असूनही थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या एका उच्चशिक्षित नातीने स्वतःला संपवून घेतले. म्हैसकर या उच्च अधिकारी जोडप्याच्या मुलाने आत्मघात करुन घेला. स्व. प्रमोद महाजन परिवारातील एकाला नशिल्या पदार्थांचे व्यसन लागले. वगैरे वगैरे! म्हणजेच  केवळ पैशांच्या अभावामुळेच कौटुंबिक पर्यावरणाला नख लागते असे नाही. जॅकी श्रॉफ या नामांकित हिंदी चित्रपट अभिनेत्याबद्दल सांगितले जाते ते असे की.. एकेकाळी त्याचा परिवार गरीब होता, चाळीत राहायचा..जॅकीचे आई-वडील, बाकी सारी भावंडे एकाच अंथरुणात झोपायची आणि त्यांना चांगली झोपही लागत असे. पुढे जाऊन जॅकी मोठा अभिनेता झाला, अमाप पैसा त्याच्याकडे आला. अनेक खोल्यांच्या मोठ्या बंगल्यात हे कुटुंब राहायला गेले. जॅकीच्या  जॅकीच्या म्हाताऱ्या झालेल्या आईला सुंदरशी अटॅच टॉयलेट-बाथरुम असलेली वातानुकुलित खोली देण्यात आली. एके रात्री ती माता त्या सुरेख अशा खोलीत सुंदरशा बिछान्यावर एकटी झोपली असता तिला त्रास होऊ लागला. मातेला अस्वस्थ वाटू लागले. बिछान्यावरुन उठण्याचे त्राण तिच्यात नव्हते. तिने मुलाच्या, सूनेच्या, नातवांच्या नावाने खूप हाका मारुन पाहिल्या. पण प्रत्येकजण आपापल्या खोल्यांमध्ये पहुडले होते. हाका मारुन मातोश्री दमली आणि एका क्षणी तिने प्राण सोडला. देवा... गरीब होतो तेच बरे होतो...निदान जन्मदात्या आईच्या सोबत, तिच्या मायेच्या प्रेमळ उबेत तरी होतो..अशीच भावना मग जॅकी श्रॉफची झाली असणार!

- राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याची मागणी