८ वाहनांवर आरटीओ तर्फे धडक कारवाई

 वाशी मध्ये नियमबाह्य पध्दतीने डेब्रिज वाहतूक

वाशी : नवी मुंबई शहरातील वाशी उपनगरात डेब्रिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांकडून नियमबाह्य पध्दतीने डेब्रिज वाहतूक केली जात आहे. याबाबत ‘दैनिक आपलं नवे शहर' मध्ये १३ ऑवटोबर रोजी वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. याची वृत्ताची दखल नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतली आहे.

नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या भरारी पथकाने वाशी मध्ये नियमबाह्य पध्दतीने डेब्रिज वाहतूक करणाऱ्या ८ अवजड करणाऱ्यावाहनांवर १३ ऑवटोबर रोजी कारवाई केली आहे, अशी माहिती नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.

वाशी उपनगरात सध्या इमारत पुनर्विकास कामांनी जोर धरला आहे. त्यामुळे जुन्या इमारती तोडताना आणि नवीन खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात राडारोडा (डेब्रिज) निघत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जर डेब्रिज (राडारोडा) वाहतूक करायची असेल तर त्याबाबत हद्द, रस्ता वापरण्यासाठी डेब्रिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकाची यादी देऊन परिमंडळ निहाय परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगीची एक प्रत डेब्रिज वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या काचेवर दिसेल अशा तऱ्हेने लावावी लागते. तसेच रस्त्यात डेब्रिज पडू नये म्हणून त्यावर आच्छादन टाकण्याची अट आहे. नवी मुंबई शहरांतर्गत भागात डेब्रिज वाहतूक करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते पहाटे ६ अशा निर्धारित वेळा आखून दिल्या आहेत. मात्र, डेब्रिज वाहतूक करण्यासाठी नियम असून देखील डेब्रिज वाहतूक करणाऱ्या चालकांकडून नियम खुंटीला टांगून वाशी उपनगरात राजरोसपणे डेब्रिज वाहतूक सुरु आहे.

याबाबत ‘दैनिक आपलं नवे शहर' मध्ये १३ ऑवटोबर रोजी वृत्त प्रसिध्द करताच नवी मुंबई आरटीओ भरारी पथकाद्वारे नियमबाह्य पध्दतीने डेब्रिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नियमबाह्यरित्या डेब्रिज वाहतूक करणाऱ्या एकूण ८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, या वाहनांच्या चालकांना मेमो देण्यात आला आहे. नियमांना हरताळ फासून वाशी मध्ये डेब्रिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. - हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी - नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बालई काळाधोंडा गांवठाणवासियांना हवे प्रॉपर्टी कार्ड