प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष ; महापालिका कामगारांचे ‘आमरण उपोषण' आंदोलन

समस्या निकाली काढल्या नाहीत तर आंदोलनाचे दुष्परिणाम

वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील कामगारांच्या समस्या आणि मागण्यांबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनास तीन वेळा लेखी निवेदनाद्वारे सूचित करुनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे वारंवार मागणी करुन देखील तोडगा निघत नसल्याने ४ ऑवटोबर पासून महापालिकेच्या सर्व विभागातील कामगारांनी सामूहिक आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे.

नवी मुंबई महापालिका कामगारांच्या विविध समस्यांबाबत नवी मुंबई महापालिकेने त्वरित निर्णय घ्यावा, यासाठी ४ ऑवटोबर पासून बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाची दखल घेऊन कामगारांच्या समस्या निकाली काढल्या नाहीत तर आंदोलनाचे दुष्परिणाम स्वच्छ भारत अभियानावर होऊ शकतात. त्यानंतर उद्‌भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ‘समाज समता कामगार संघ'चे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिला आहे.

कामगारांच्या मागण्या
- घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व सुपरवायझर यांना अटी शर्ती प्रमाणे त्यांच्या मुळ पदावर म्हणजेच सफाई कामगार म्हणून नेमावे.
- सर्व कामगारांची हजेरी आधारकार्ड वरुन बायोमॅट्रिक हजेरी मशीनवर घेण्यात यावी.
- सेवा निवृत झालेल्या कामगारांची सेवा उपदानाची रक्कम (ग्रॉच्युटी) त्वरित अदा करण्यात यावी. भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना त्यांची सेवा उपदानाची रक्कम निवृत्तीच्या दिवशी अदा करणे सुलभ होण्यासाठी कार्यरत सर्व कामगारांना युनिवर्सल कोड नंबर देऊन त्यावर प्रत्येक कामगाराची सेवा उपदानाची रक्कमवर जमा करण्यात यावी.
- सेवानिवृत कामगारांच्या जागी त्यांच्या वारसांनाच नियुक्ती  देण्यात यावी.
- उद्यान विभागातील कामगारांची २०२० पासूनची विशेष राहणीमान भत्त्यातील थकबाकी कामगारांना त्वरित अदा करण्यात यावी.
- उद्यान विभागातील कामगारांची बोनस, रजेचा पगार, भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजनाची थकीत रक्कम कामगारांना अदा करण्यात यावी. तसेच गणवेश, पावसाळी गणवेश त्वरित देण्यात यावेत.
-  मागील दोन वर्षात उद्यान विभागात साधारण १७ कोटी रुपयांचा अपहार झाला असून, उद्यान विभागात नाका कामगार पध्दत राबवून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या सर्व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच पूर्ण किमान वेतन देण्यात आले नसलेल्या कामगारांची थकबाकी अदा करण्यात यावी.
- मालमत्ता विभागातील परिमंडळ-१ आणि २ मधील सर्व नागरी आरोग्य केंद्र, तुर्भे माता बाल रुग्णालय, ग्रंथालय, निवासस्थान आणि दिघा येथील दुकान गाळे या ठिकाणी कार्यरत सफाई कामगारांची विशेष राहणीमान भत्त्यातील थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी.
- कचरा वाहतुक गाड्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
- कचरा वाहतुक कामगारांना गणवेश मिळावा.
- महापालिका रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे बोनस आणि रजा रोखीकरणाची रक्कम दिवाळी पूर्वी अदा करण्यात यावी.
- कामगारांचा भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजना तथाकथित ठेकेदाराने अद्ययावत केले नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजनेचे लाभ घेता येत नाहीत. त्यामुळे कामगारांचा भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजना तथाकथित ठेकेदाराने अद्ययावत करावेत.
- कोंडवाडा कामगारांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी करावी.
- शिक्षण विभागातील सफाई कामगारांना मे महिना, दिवाळी, गणेश उत्सव कालावधीत देण्यात येणाऱ्या सुट्टीमध्ये काम देऊन त्याकाळातील वेतन देण्यात यावे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका लोकशाही दिन ०६ नोव्हेंबर रोजी