‘आयुष्मान भव' मोहिमेचा शुभारंभ

‘आयुष्मान भव'मध्ये महाराष्ट्र उत्कृष्ट काम करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : देशात ‘आयुष्मान भव' मोहिमेस १३ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्याच्या मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते.

आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी 'आयुष्मान भव' असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव' मोहिमेची सुरुवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘आयुष्मान कार्ड'च्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी ‘आयुष्मान भव' अशी महत्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करुन त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या निक्षय मित्र आणि जिल्ह्यांना देखील गौरविण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्यात या योजनेचे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे.

सदर समारंभात आरोग्य आधार ॲप, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप तसेच राज्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांसाठीचे समुदाय आरोग्य अधिकारी ॲप यांचा शुभारंभ करण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्यमान भव मोहीमेचा शुभारंभ