नाती रुजवा! नाती टिकवा!
नाते जुळणे जितकं कठीण तितकंच ते टिकवून ठेवण हे महाकठीण ! विवाह बंधनाने नाती जुळतात, फुलतात, टिकतात. कारण परस्परावर अतुट, निरपेक्ष प्रेम, विश्वासाची घट्ट वीण तसेच सुखदुःखात धावून जाण्याची, मदत करण्याची वृत्ती! यात रक्ताची नाती असली की कुटुंब सलोखा वाढतो. रक्तापलीकडील नाती ही आधार देतात. काहीवेळा रक्ताच्या नात्यांहुन ती सरस श्रेष्ठ ठरतात. कारण केवळ जुळलेला अकृत्रिम स्नेह.
ही झाली नात्याची नाण्याची एक बाजु या नाण्याला दुसरी बाजू आहे ती मात्र नकारात्मक आहे. यात नाती दुरावतात, दुखावतात, भंग पावतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचे खुप दूरगामी परिणाम झाले आहे. हम दो हमारे दो या सुखाचा मूलमंत्रामुळे जुनी एकत्रित कुटुंबसंस्था मोडकळीस आली. आईवडीलांच्या छायाछत्राखाली गुण्या गोविंदाने राहिलेली, वाढलेली मुले मोठेपणी विभक्त होऊन आपापला संसार मांडण्यात धन्यता मानतात. स्वार्थ, संकुचितपणा वाढीस लागुण आदरभाव, प्रेम, माया, विश्वास हा नात्यांचा पायाच ढासळतो.
मुख्यत्वे पैसा, धनदौलत, इस्टेट या गोष्टी नाती तुटण्यास ,दुरावण्यात कारणीभूत होतात. पैसे कमावण्याच्या मोहापायी नाती एकमेकास पुरेसा वेळ देऊ शकत नाही. मग अगदी जन्मदाते आई बापही सूनमुलांना भार, अडगळ,निकामी वाटू लागतात. मग त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते. थोडक्यात पैसा, वेळेचा अभाव, स्वार्थी संधीसाधुपणा यामुळे नाती टिकविणे अवघड होत आहे अस वाटत असलं तरी अशा वेळी आपली परंपरागत एकत्र कुटुंबीपद्धती आठवते. एकत्र कुटुंब पद्धती जरी लुप्त झाली तरी ती अमोल आहे. या एकत्र कुटुंब पध्दतीतुन नाती फुलतात.ताणतणाव, दुरावा, एकलकोंडेपणा, भय, स्वार्थी वृत्ती यासारख्या घातक प्रवृत्ती नात्यातील ओलावा जिव्हाळा यामुळे नाहीशा होतात. मनाची होत असलेली घालमेल, होरपळ, तगमग फुलून आलेल्या नात्यामुळे शांत होते. कारण नात्यात असतो परस्परांशी आदरभाव आत्मीयता, विश्वासाची घट्ट वीण, एकमेकांसाठी संकटात धावून जाण्याची, आधार देण्याची वृत्ती, वेळप्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून स्वार्थीपणाचा त्याग करण्याची रिती किंवा गुण अंगी निर्माण होतो.
या साऱ्या संस्कारामुळे, संवेदनशील स्वभावामुळे कुटुंबासाठी वेळ, आधार देणे, सुखदुःखात सोबत करणे, माया, ममता बाळगणे यांची उपजत बुद्धी मनुष्यात आलेली असते. मात्र जीवनाला अर्थ प्राप्त देणारी ही नातीगोती कोणत्याही किंबहुना सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपुलकीने, समंजसतेने व जबाबदारीने सांभाळली मात्र पाहिजेत. त्याचबरोबर ही नाती, श्रेष्ठता, गर्व, अहंकार, ताठा या दुर्गुणापासून अलिप्त असली पाहिजेत !
-विजय रघुनाथ भदाणे