दिसामाजी काहीतरी ते करावे
मध्ये काही दिवस गंमत म्हणून एक प्रयोग केला. माझ्याच रोजच्या रोज वागण्याचा पेपर रात्री तपासून पाहिला. बोलण्याच्या स्तराला सगळ्यात जास्ती मार्ग ठरवले. कुणाशी, काय, कसं बोलले, किती वेळ, याचा नीट अभ्यास केला... कुठे कशा चुका होतात हे हळुहळु समजते आहे...
एका वाक्यातली उत्तरं वरवर सोपी पण कस बघणारी होती. कारण अगदी कमी शब्दात एका वाक्यात उत्तर देणं काही प्रश्नांना फार अवघड गेलं. मोठी प्रश्नोत्तरे सविस्तर लिहायची होती. कधी कधी त्यांची उत्तरे बरी आली कधी थोडक्यात चुकली.तरी तिथे चांगले मार्क देता आले.
ऊघड न बोलता मनातल्या मनात बोललेल्या...गाळलेल्या जागा भरा हा पण पेपरातला भाग होता. त्याचेही गुण तपासले. मौन राहण्याचा प्रश्न सगळ्यात कठीण गेला. हळूहळू अभ्यासाने ते पण साध्य होईल. काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी न आठवता नंतर आठवली. कोण कोणास म्हणाले...हे उमगायला बराच वेळ गेला. त्यांची ऊत्तर नंतर कळल्याने त्याचा ऊपयोग होत नाही.
संदर्भात सहित स्पष्टीकरण..तर ऑप्शनलाच टाकायचे ठरवले. त्यासाठी दुसरा अभ्यास फार करावा लागतो हे समजले आणि ईतकं करूनही ऊत्तर समाधानकारक देता येत नाही हे समजले. गणिताचा पेपर फारच अवघड... हातचे धरले ते धरायला नको होते... त्यामुळे गणित चुकले हे नंतर समजले. बेरीज कशाची करायची आणि वजा काय करायचे हळूहळू आता कळत आहे. त्यातही बरीच गडबड होते आहे. गुणाकार कशाचा करायचा हा संभ्रम आहेच.
अध्यात्माचा अभ्यास करण्यात समाधान आहे... हे उमगले आहे. तिथे मार्कांची भानगडच नाही.आत्मानंद मात्र अपार आहे. त्यामुळे त्यात आनंद वाटतो आहे.नुसते पाठांतर न करता अर्थ समजून...उमजून... कशाचे करायचे हे आता समजले आहे.यामुळे ते आता जरा जरा जमायला लागले आहे. हल्लीच नविन सुरू झालेला विषय मूल्य शिक्षण तो पेपर संस्कारांमुळे त्या मनाने सोपा गेला .मोबाईलचे आधुनिक तंत्रज्ञान यासाठी जाणत्यांची म्हणजे नातवंडांची शिकवणी लावली आहे. वेळ त्यांच्या सोयीनुसार ..त्यामुळे त्या विषयाचा आनंद आहे. भीती नाही.
असं सगळं चालू असताना...कधी जेमतेम पस्तीस मार्कांनी काठावर पास झाले. कधी फर्स्ट क्लास तर कधी डिस्टिंक्शन पण मिळाली...बरं ही कायमची नाही हे लक्षात आलं आहे. अभ्यास कमी पडला तर परत आपण मागे पडणार हे पण समजले आहे.गुणवत्ता यादीत यायचं तर अजून अभ्यास हवा आहे हे ऊमगले आहे.ही जगण्याची गुणवत्ता आपली आपण काढून त्याला मार्क द्यायचे. इथे कॉपी करता येत नाही हे लक्षात आले .आपला पेपर आपणच तपासायचा...प्रत्येकाने मनाने सिलॅबस ठरवायचे..आपला पेपर आणि आपणच परीक्षक...कठोरपणे पेपर तपासायचा हे ठरवले आहे. तरच चुका सुधारून प्रगती होईल हे आता नीट समजले आहे. नुसती प्रगती नको तर त्याबरोबर अंतरिम मनःशांती हवी आहे. त्याच्या अभ्यासासाठी संत साहित्याची पुस्तकं हातात आहेत.
एक मजा मात्र झाली आहे. रात्री रिझल्ट चांगला येण्यासाठी दिवसभर सतर्क राहावं लागत आहे. अजून एक म्हणजे..काही दिवस परीक्षांचेच असतात. तेव्हा अभ्यास कसून करावा लागतो.वय वाढत जाईल तसे...पुढे पुढे पेपर अजून अवघड असणार आहेत हे पण माहित आहे..आता कसून सराव चालु आहे...बघु काय होते..
तुम्हीपण बघा ना हा प्रयोग करून....
फार अवघड नाहीये ते...
आता लेख पूर्ण करते.
आजचा माझा होमवर्क संपला.
-नीता चंद्रकांत कुलकर्णी