धनाचा मान
इलेक्शन म्हटलं की मला पहिल्यापासूनच वेळेच्या अगोदर तयार व्हायला आवडतं. देशाचे पहिलं कर्तव्य रक्षण व दुसरं लोकशाही बळकट करणे म्हणजेच निवडणुका पार पाडणे. आता आपण पत्करलेला इकडचा नोकरी पेशा म्हणून देशाचं सीमेवर जाऊन रक्षण तर करू शकत नाही; परंतु या क्रमांक दोनच्या देशहितासाठी नक्कीच काम करू शकतो असे विचार माझ्या मनात वारंवार आपोआप कसे काय बिंबतात हे मलाही अजून उमगलेलं नाही! काही का असेना, आतापर्यंत पार पाडलेले निवडणुकीचे कर्तव्य अगदी मनापासून केल्याचं समाधानपण मिळालं ह्याला मी व माझ्यासोबत काम केलेल्या टीमचे यश आहे हे नक्की.
विधानसभा २०२४ साठी निवडणूक निर्णय अधिकारी १०६ फुलंब्री श्री ब्रिजेश पाटील सर, सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर कृष्णा कानगुले सर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री परेश चौधरी सर, अन् माझे कार्यालय प्रमुख श्री भारत कासार सर पोस्टल नोडल ऑफिसर तसेच सर्व निवडणूक कर्तव्यावर कार्यरत यंत्रणेचं झोनल ऑफिसर ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन. हे झालं प्रत्यक्षात कार्यरत टीमचं कौतुक. सरकारी कामकाज करताना प्रत्येकाच्या आयुष्यात घरी आपला/ली खंबीरपणे मागे उभे असणारा/री जीवन साथीदार अप्रत्यक्ष आपल्या कर्तव्याची अर्धी हिस्सेदार आहे असं मला वाटतं. त्यांनी आपल्याला वेळेवर साथ नाही दिली, घरात वेगवेगळ्या कारणांवरून किरकिरी झाल्या, उगाच बोलण्या-बोलण्यातून भांड्यांचे आवाज यायला लागले, अबोलता दुजाभाव घरात संचारू लागला म्हणजे नक्कीच आपल्या घरात आपल्यालाच नकोसं वाटायला लागतं. अन् बऱ्याचदा आपण आपल्या घराबाहेरच्या मित्र-मैत्रिणींचा सहारा येतो. दोघंही अबोल्याच्या काळात जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्याला / तिला आपल्या बाबतीतील वागण्या-बोलण्यातला फरक तात्काळ समजतो अन् मग आपण आपलं मन तिथं हलकं करून टाकतो.
पुन्हा घरी आल्यावर वातावरण हळूहळू पूर्वपदावर येणं सुरू होतं अन् मग आत्मक्लेष कमी कमी होत पुन्हा संसाराची गाडी मुलाबाळांकडे बघत ‘जाऊ द्या, झालं गेलं ते सोडून देवू' असं म्हणत रुळावर येते. घर म्हणलं की रुसवा-फुगवा, तात्पुरता भांड्यांचा आवाज, सामानाची आदळापट असं झाल्याशिवाय संसारी घराला घरपणच नाही म्हणायचं. घरात अगदी निरव शांतता.. तीपण काय कामाची? म्हणून नवरा बायको या एकाच नाण्याच्या दोन बाजू कधी एकरूप होतात हे कळतसुद्धा नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत रोज घरून डबा करून देणारी धर्मपत्नी खरंच वेळेच्या अगोदर कमीत कमी पंधरा मिनिटे तरी तयार असायची ! तिला काय माहित, मीटिंगची वेळ मी एक तास अगोदरचीच सांगून टाकली आहे म्हणून? काल सांगितलेली निघण्याची वेळ दहा-पंधरा मिनिटांवर येऊन ठेपली तरी मी पठ्या काहीतरी लिहितोय वाचतोय असं लक्षात आल्यावर, ”अहो, साडेनऊ वाजलेत; निघायचं नाही का तुम्हाला मिटींगला? डब्बा भरून ठेवलाय केंव्हाच!”
"हा निघायचंय..थांब थोडं.”
"मग मला कशाला सांगितलं काल दहा वाजेला मीटिंग म्हणून?”
"अगं, आताच मेसेज आला अकरा वाजता मीटिंग आहे.” मी उगाच काहीतरी कारण सांगून खरी वेळ बोलल्यावर तिचा त्रागा सुरू व्हायचा अन् मी ठरलेल्या वेळेच्या अगोदरच सभेला पोहोचायचो. तिथं पोहोचल्यावर सभा वेळेवर कधीच झाली नाही तरी अगोदर जाऊन मित्रांसोबत गप्पागोष्टी करण्याचं भाग्य नक्कीच मिळायचं. असं बऱ्याचदा मागे घडलंय. निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या खात्यातले अधिकारी एकत्र येऊन काम करताना मित्र होतात, हा एक या ड्युटीवरील महत्त्वाचा फायदा! अर्थात ज्याला घेता आला तो चांगला येतो अन् ज्याला कळला नाही तो शेवटपर्यंत आत्मक्लेष करत करत घरी जातो.
मी मात्र निवडणुकीची पूर्वतयारी म्हणजेच दोन महिने अगोदरपासून तर मतदानाच्या दिवसापर्यंत एकेक क्षण माझा व माझ्या सहकाऱ्यांचा आनंदात घेतला. आपल्याला जर समोर आलेलं काम करायचंच आहे तर मग आळस किंवा तोंड सोडून देऊन त्या केलेल्या कामात अर्थच काय? पहाटे चार वाजता राखीव मतपेट्या (मशीन) ताब्यात मिळाल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत साहित्य जमा करेपर्यंत झोनल ऑफिसर म्हणून कर्तव्याची वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे यथासांग पूर्तता केली अन् शेवटी माईकवरून सूचना आली "आपलं सर्वांचं यशस्वी काम केल्याबद्दल अभिनंदन! शासनानं आपणास निवडणूक कार्यात कर्तव्यपूर्तीची देऊ केलेली मानधनाची रक्कम स्वीकारावी अन् आपण निवडणूक निर्णय अधिकारी, फुलंब्री १०६ परिसर सोडला तरी हरकत नाही.” स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील व मी सात वर्ष र्वगमित्र असूनही "ही ड्युटी नको ती ड्युटी नको.” असं कधीच केलं नाही. अर्थात "मी साहेबांचा वर्गमित्र आहे” असं मी सांगण्यापेक्षा साहेबांनीच बऱ्याच जणांना सांगितलं "निवृत्तीनाथ माझे मित्र आहेत.” डॉ.कृष्णा कानगुले, तहसीलदार फुलंब्री हेसुद्धा जिवलग मित्रच! त्यांनीही वेळोवेळी कामादरम्यान थोपटलेली पाठ कायमच प्रेरणा देत गेली अन् मी उत्स्फूर्तपणे काम करत आलो.
सोबतच्या ५ राखीव कर्मचाऱ्यांना केंव्हाच त्यांचं मानधन देऊन मी कार्यमुक्त केलेलं होतं. काम करत दिवस कसा काय गेला हेसुद्धा आम्हाला समजलं नव्हतं. माझं मानधनाचं पाकीट हातात घेऊन सरळ गाडीत बसलो. रात्रीचे दोन वाजून गेले असतील अंदाजे. तिथून घराचं अंतर पंधरा किलोमीटर असावं. मनातल्या मनात विचार करण्याशिवाय पर्याय नव्हता. अधिकारी म्हणल्यावर इलेक्शनमध्ये कोण निवडून येणार हे त्या दिवशी तरी विचार करायला त्याला उसंत नसतेच ! म्हणून मी माझ्याच भूतकाळात रममाण झालो. मला जशी निवडणूक ड्युटी लागली तसं धर्मपत्नीला सांगायचो, "काय जो भत्ता मिळेल तो तुझा; कारण मला सरकार कामाचा पगार देतेय, पुढं येईल ते मानधन तुझं.!” सकाळी उठलो पहिलं पाकीट तिच्या हातात सुपूर्द केलं. त्यात पैसे किती होते ते माहित नाही; पण तिच्या चेहऱ्यावर नांदत असलेलं समाधान बघत त्या धनाला खरंच मान मिळाला असं वाटलं अन् त्यावर थोडं लिहू म्हणलं...!
-निवृत्ती सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, जि. छ. संभाजीनगर