असंही घडतं

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा आम्ही सांताक्रुजला राहत होतो. चर्चगेटला जायचं असेल तर अकरा वाजताच्या लोकलने जात असू. तीअंधेरीवरून सुटत असल्याने तिला( त्याकाळी) फार गर्दी नसे. त्या दिवशी मी व माझी मैत्रिण निघालो. गाडीत उजव्या बाकाजवळची सीट  मिळाली.

समोर एक बाई होती. तिने गुजराती पद्धतीने साडी नेसली होती आणि घुंगट अगदी खालपर्यंत घेतलेला होता. तिचा चेहरा दिसत नव्हता. शेजारी सुमारे पाच व तीन वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यांच्या अंगावर स्वस्तातले पण नवीन फ्रॉक होते. दोन्ही मुलींच्या हातात  कॅडबरी होती. शेजारी प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किटं होती. गाडी सुटली आणि त्या बाईने दोन्ही मुलींना जवळ घेतले. त्यांचे पापे घेतले. मुलींना कुरवाळले.....आणि जोरजोरात रडायला लागली अगदी तारस्वरात ती रडत होती.

दोन्ही पोरी मात्र अगदी खुशीत होत्या. मोठीनं क्रीमच बिस्कीट काढलं. त्याचे दोन तुकडे केले. घाकटीला दिले. दोघी क्रीम चाटत हसत होत्या. आईच्या रडण्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं.

"झालं का परत सुरु ...गप्प बैस.. काय झालं ग ईतकं रडायला....” एक बाई तिला रागवायला लागली. आम्हाला काही कळेना..
"अहो, मगापासून सारखी रडते आहे. काय झालंय काही सांगत पण नाहीये. नुसती गळे काढुन रडतीय.”
सगळ्या नुसत्या तर्क करायला लागल्या..
"कोणी घरी वारलं असेल.”
"नवरा मारत असेल..”
"भांडण झालं असेल...”
"नवऱ्याने सोडलं का काय...”
 प्रत्येक जण कारण हुडकत होतो. ती बाई अवाक्षर बोलत नव्हती. खार स्टेशन येईपर्यंत तिचं रडणं चालूच होतं...मुलींना प्रथमच इतकी मोठी कॅडबरी मिळालेली असावी. त्या मजेत खात होत्या. गाडी बांद्राकडे निघाली. थोडावेळ ती गप्प होती. आता परत रडणं सुरू झालं ...मुलींना सारखी मिठीत घेत होती. जवळ घेत होती..कोणी किती रागवलं तरी ती रडायची थांबतच नव्हती. सांगून सांगून बायका दमल्या..तरी तिचं रडणं सुरूच होतं. एकजण म्हणाली,
"पोरींना नवे कपडे, खाऊ दिलाय; मग ही का रडतीय कोण जाणे...”
बांद्रा गेलं तशी ती गप्प झाली. शांत झाली. प्रत्येक जण आपापल्या नादात...काही वेळानंतर आम्ही पण दोघी तिला विसरून गप्पा मारायला लागलो. आम्ही नंतर तिच्याकडे पाहिलंही नाही...माहीम येईपर्यंत तिचा आवाज बंद होता.माहीम आले..उतरणाऱ्या बायका उतरल्या चढणाऱ्या चढल्या...मध्ये चार-पाच सेकंद शांत होते....आणि अचानक ती बाई उठली..प्लॅटफॉर्मवर उतरली. आणि सरळ पळत पळत निघूनच गेली....त्याच क्षणी लोकलपण सुरू झाली..... क्षणभर काय झालं आम्हाला कळलच नाही..
"बाई पळाली बाई पळाली.” एकच गडबड झाली...
"पोलिसांना फोन करा.”
"दादरला गाडी गेली की बघू.”
"साखळी ओढायची का ?”
"अशी कशी गेली?”
एकच आरडाओरडा गोंधळ  सुरू झाला....
 तेवढ्यातून कोपऱ्यातून एक आवाज आला ...
"ती बाई काळी का गोरी कोणी बघितलेली नाही आपण तिला ओळखणारही नाही..”
 अरे बापरे खरंच की ..
शांतपणे ती बाई म्हणाली
"पोरींना टाकून ती बाई पळून गेली आहे ...आणि मध्ये आपल्याला काही करता येणार नाही. गाडी चर्चगेटला गेल्यावर बघू.”
अरे देवा...हो की...पुढच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी जेमतेम दोन मिनिटं थांबणार तेवढ्यात काय करणार? सगळ्यांना ते पटले....प्रचंड भीती कणव....दोन्ही पोरी तर जोरात रडायला लागल्या...
 विचारलं ”कुठे राहता?”
"तिकडे लांब.” एवढेच सांगत होत्या.
 काय करावं कुणालाच कळेना. दादर आलं गेलं. आम्ही सगळ्यांनी मुलींना सांगितलं.  ”रडु नका थोड्या वेळाने आई येणार आहे हं..”
 तरी त्या रडतच होत्या. काही वेळाने मुली दमल्या.. गप्प बसल्या. धाकटीला आता झोप यायला लागली होती.  ती मोठीच्या मांडीवर झोपली. मोठी रडून रडून शांत झाली होती. बहिणीच्या अंगावर हात टाकून बसली होती. विलक्षण करूण असं दृश्य होतं. अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.

"अशी कशी ही आई” ...एवढंच म्हणत होतो..
स्टेशन येत होती जात होती..एक बाई म्हणाली..
"मी वकील आहे. मुलींना मी पोलिसांच्या ताब्यात देईन. माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणीतरी चला.”
"पोलीस” ...म्हटल्यावर आधी सगळ्यांचे चेहरे घाबरले. नंतर आम्ही बऱ्याच जणी तयार झालो. चर्चगेट जवळ आलं तसं त्या छोटीला उठवलं.
दोघींनी त्यांचे हात धरले. त्या सारख्या म्हणत होत्या
"मला आई पाहिजे. मला आईकडे जायचंय. आईकडे नेणार ना..”
"हो हो....” असं सांगितलं ... त्या दोघींना खाली उतरवलं.
 पोलिसांशी त्या वकीलीण बाई बोलत होत्या. मुलींना बाकावर बसवलं होतं...इतरही आम्ही बऱ्याच जणी ऊभ्या होतो मुलींना वाटत होतं ..आई येणार आहे...
 बिचाऱ्या ....आईची वाट पहात  होत्या...
"आई कधी येणार? आई कुठे आहे ?” असं सारखं विचारत होत्या.
 कितीतरी वेळ आम्ही तिथे होतो. आता या मुलींचं काय होणार...या विचाराची सुद्धा भीती वाटत होती. डोळे अक्षरशः  आपोआप वाहत होते...आम्ही मूकपणे उभ्या होतो. या मुलींना परत आई कधीही भेटणार नव्हती....याचे आम्हाला प्रचंड दुःख वाटत होते. काही वेळानंतर दोन महिला पोलीस आल्या. त्यांच्याशी आम्ही बोललो त्या म्हणाल्या, ”पुढचं प्रोसिजरप्रमाणे करतो आम्ही. सरकारने अशा मुलींची सोय केलेली आहे; पण असल्या आयांचा भयंकर राग येतो.  फोडून काढावंसं वाटतं..  बघा ना आज ही लेकरं पोरकी झाली.” त्यांचेही डोळे भरून आले होते....त्यांनी मुलींना जवळ घेतलं. त्या निघाल्या.
लांब जाईपर्यंत आम्ही बघत होतो.या मुलींचे भवितव्य काय असेल..मुलींचा काय दोष... मुली म्हणून सोडून दिल्या का...मुलं झाली असती तर सांभाळली असती का ? मग मुलींना का टाकलं? अनेक अनुत्तरीत प्रश्न मनात उमटत होते....
ईतके दिवस आई म्हणजे मायाळु, प्रेमळ, त्यागमूर्ती, असेच मनात होते...पण एखादी आई अशीही असते....हे आम्ही  प्रत्यक्ष पाहीलं...या घटनेला इतकी वर्ष झाली तरी त्या मुली आठवल्या की माझे डोळे अजूनही भरून येतात.

 आज कुठे असतील त्या मुली? कधीतरी अशीच त्यांची आठवण येते.. मग देवाला हात जोडून सांगते.... कुठे असतील तिथं त्यांना सुखी ठेव बाबा.... - नीता चंद्रकांत कुलकर्णी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अभूतपूर्व अलाइव्ह