अभूतपूर्व अलाइव्ह
मुळ लेखक पीअर्स पॉल रिड लिखित व यांचा मराठीत अनुवाद केला आहे, अशोक पाथरकर यांनी या पुस्तकात विसाव्या शतकातील एक विलक्षण घटना म्हणून १९७२ साली अँडीज पर्वतावर झालेल्या विमान अपघाताची नोंद केली जाते. विमान अपघात ही काही आता अपरिचित वा अनोखी घटना मानली जात नाही. परंतु हा अपघात मात्र विलक्षण ठरला. याचे कारण त्यातील प्रवाशांना अपघातानंतर तब्बल सत्तर दिवस त्या हिमाच्छादित पर्वताच्या भीषण थंडीवा-यात काढावे लागले. अशा विपरीत परिस्थितीत जीवंत राहण्यासाठी त्यांनी आपल्या मृत सहकाऱ्यांचे मांस खाल्ले.
त्या पर्वतावर गवतही उगवत नाही. झाडेझुडपे नाहीत. शंभर फूटांपर्यंत बर्फाचे थर...काही प्रवासी अपघातानंतर लगेच मृत झाले, जे उरले त्यातील काहीजण जखमी...घायाळ...आजूबाजूला वस्ती नाही. गावही पन्नाससाठ मैल दूर. संपर्काचे साधन नाही. फक्त चार तासाच्या प्रवासासाठी निघालेल्या या विमानातील प्रवाशांजवळ खाण्यापिण्याच्या वस्तूही मोजक्याच होत्या. चॉकलेटस, चीज, वाइन, अँपल. सर्व फारच तोटके. या प्रवाशांनी मदतीसाठी वरून जाणाऱ्या विमानांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. सुटकेसाठी प्रयत्न करणा-या हेलिकॉप्टर्सचेही लक्ष आपल्याकडे जावे म्हणून खाणाखुणा केल्या. परंतु बर्फात गाडल्या गेलेल्या विमानाच्या अवशेषांकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पुढले सत्तर दिवस २८ प्रवाशांना त्या भयाण थंडीत, मोडलेल्या छोट्या विमानात काढावे लागले. रॉबिन्सन ब्रूसोला जहाज बुडाल्याने एका निर्जन बेटावर एकाकी राहावे लागले. येथे मैलोगणती केवळ बर्फ बर्फ... एकही झाडझुडुप नाही... दरीकपार नाही... मोडक्या विमानाच्या आत सर्वांना धड झोपता येण्याएवढीही जागा नाही... खायला फारसे काही नाही. प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत काढावे लागते. काहीजण जखमी. हातपाय तुटलेले... काहीजण आजारी... काहीजण मरणासन्न... सत्तर दिवस त्यांनी कसे काढले असतील?
मानवी जीवनातले हे एक अभूतपूर्व असे प्रकरण मानावे लागेल. या प्रवाशांमधले परस्परसंबंध या सत्तर दिवसात कसे राहिले? एकमेकांच्यात संघर्ष कसे झाले? जगण्यासाठी काय व्यूहरचना केली गेली? खाण्यापिण्याचे रेशनिंग कसे अंमलात आणले गेले? परस्परांच्या सोयीसाठी, स्वास्थ्यासाठी स्वेच्छा स्वार्थत्याग करणे कुठवर शक्य झाले? मोजक्या महिला असताना त्यांच्याशी इतरांचे वर्तन कसे राहिले? आलेल्या परिस्थितीला हे सर्वजण कसे सामोरे गेले? आपल्याच मित्रांची प्रेते विमानाशेजारी बर्फात पुरताना भावनांचे कल्लोळ कसे उठले? उपलब्ध मनुष्यबळाचा वापर कसा करण्यात आला?...हे सर्व तपशील वाचताना आपल्या अंगावर काटा येतो. आपल्या मध्यमवर्गीय संवेदनांना धक्का बसावा असे खूप काही घडताना दिसते. माणसाला जगण्यासाठी अशा दुर्धर परिस्थितीत काय काय करावे लागते? माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो? याबाबत आपली कल्पनाशक्तीही थिटी पडते. माणसाची कल्पकता आणि उद्यमशीलता कशा प्रकारे काम करते? एकेक तपशील थक्क करतो.
सत्तर दिवस हे २८ जण वीस फूट बाय आठ फूट एवढ्या मोकळ्या जागेत राहतात. तशात हे विमान तीस अंशांनी कललेले, तिरपे घसरगुंडीसारखे. एकजण जरासा हलला, कूस बदलू लागला तरी सर्वांना हलावे लागे. मुले झोपेत नकळत हात वा पाय झटकत. त्याचा प्रसाद दुसऱ्याला मिळे. काहीजण मानसिक धक्का बसलेले. रात्री उठून मी फ्रीजमधून कोक घेऊन येतो-असे काहीतरी म्हणत इतरांच्या देहावरून चालत जात... भ्रमात असत. पंचेचाळीसपैकी फक्त ३२ प्रवासी जिवंत... त्यातलेही चौघेजण पुढे गतप्राण होतात. विमान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच शोध घेण्याची मोहिम सुरू होते. रेडिओवर बातमी येते. प्रतिकूल हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येतात. प्रचंड ढग आणि बर्फ यामुळे अँडीजचा पृष्ठभाग पूर्ण झाकला गेलेला. सर्वजणच अपुऱ्या आहारामुळे अशक्त झालेले, थकलेले, अंगात शक्ती आणायची कशी? जवळ खाद्यपदार्थ नाहीत. सुटकेची आशा नाही. तेव्हा व्हॅनेसा सुचवतो, ‘आपल्या अंगी शक्ती राहिली पाहिजे. अन्न तर येथे नाही. येथे फक्त हे मृतदेह आहेत. जिवंत राहण्याचा प्रयत्न करणे हे आपले नैतिक उत्तरदायित्व आहे. त्यासाठी कोणतेही मार्ग क्षम्य होत. अखेरीस हे देह म्हणजे तरी काय? मांस आणि हाडे, त्यांचा प्राण स्वर्गात देवापाशी आहे... जे उरले आहे ते बकरीच्या-डुकराच्या मांसासारखेच नव्हे का? काहीजणांना हे पटते. काहीजणांना ते ऐकूनच मळमळते. एकजण एका देहावरील वस्त्रे दूर करून काचेच्या तुकड्याने त्याची त्वचा दूर करतो. गोठून दगडाप्रमाणे कठीण झालेल्या मांसाचे आगपेटीतल्या काडीसारखे लांब तुकडे कापून विमानाच्या छपरावर पसरतो... व्हॅनेसा प्रार्थना करतो, ‘देवा, मी आता जे करणार आहे ते योग्य आहे असा माझा विश्वास आहे. ते करायला मला तू सामर्थ्य दे. तो त्यातील एक काडी घेऊन तोंडात टाकतो. वीस वर्षे वयाचा गुस्टावो निकोलिच आपल्या प्रेयसीला पत्र लिहितो. ‘तुझा विश्वास बसणार नाही. माझाही बसणार नाही अशी एक गोष्ट आज घडली. ती म्हणजे आहारासाठी आम्ही मृतदेह कापणे सुरू केले... दुसरा पर्यायच नाही. देवाची इच्छा हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगाला धैर्याने आणि श्रद्धेने तोंड देणे आम्हाला भाग आहे...आपण पाप करीत आहोत असे मला वाटत नाही. ‘आपल्या देहाचा वापर होऊन दुसऱ्याचा प्राण वाचणार असेल तर त्याला मी आनंदाने तयार होईन...
सत्तर दिवसांनी या प्रवाशांकडे बाह्य जगाचे लक्ष जाते. त्यांची सुटका होते... १२ डिसेंबरला तिघेजण सांतियागोला पोहोचतात. २० डिसेंबरला उर्वारित चौदा जणांना घेण्यासाठी हवाईदलाचे विमान येते. सांतियागोला ते पोहोचते. दहा आठवडे केवळ बर्फावर हे तरूण जिवंत राहणे शक्य नाही हे तेथील डॉक्टरांचे मत...ते चौकशी करतात, ‘शेवटी तुम्ही काय खाल्ले? इन्शियाटें उत्तर देतो, ‘माणसाचे मांस. एक फारदर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाखती टेप करतात. एका दैवी चमत्काराचे प्रतीक म्हणून त्यांचे कौतुक होते.
वृत्तपत्रात याबद्दलच्या बातम्या झळकतात. जगभर टीव्ही-रेडिओद्वारे त्या जातात. उरुग्वेमध्ये मात्र या बातम्या कोणी छापत नाही. पत्रकार परिषदेत एक निवेदन देण्यात येते. ‘उंच बर्फाच्छादित शिखरांवर भव्यदिव्य सृष्टीच्या सान्निध्यात असताना आपण एकाकी आहोत याची जाणीव होते... आपण आणि परमेश्वर असे दोघेच आहोत असे वाटते. आपण परमेश्वराच्या जवळ आहोत, तो आपल्या प्रत्येकात आहे अशी जाणीव होते... जे घडणार आहे, जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेनुसार... आमच्याकडे खाण्यासाठी काही उरले नाही तेव्हा आम्हाला येशूचे स्मरण झाले. येशूने आपले मांस आणि रक्त लोकांना दिले तसे आपण का करू नये असे वाटले. त्या दृष्टांतामुळेच आज आम्ही आपल्यापुढे दिसत आहोत... त्याबद्दल काही विचारवंताना आमच्या या भावनांची आपण कदर करावी एवढीच प्रार्थना आहे. त्या ४५ प्रवाशांपैकी फक्त १६ जण उरले होते. जिवंत परतले होते. अर्तुरो नोगिराचे वडील वृत्तपत्रांना पत्र पाठवतात. ‘या सोळा वीर मुलांचे कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली एकजूट, श्रद्धा, धारिष्ट्य यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी अपघातानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या केलेल्या सेवेसाठी प्रत्येकाने त्यांच्यापासून धडा घ्यायला हवा. आपला अहंपणा, आपली स्वार्थी आणि संकुचित विचारसरणी बदलायला हवी. ‘अलाइव्ह द्वारे एक विलक्षण अनुभवमालिका आपल्यापुढे उभी राहते.
मूळ पुस्तकाचे नाव ALIVE अलाईव्ह
अनुवादकः अशोक पाथरकर ISBN : ९७८८१७७६६८३३९
आवृत्ती : १ली प्रकाशन वर्ष : सप्टेंबर २००७
पृष्ठे : १७६ भाषा : इंग्रजीतून मराठीत अनुवादित श्रेणी : चरित्र आणि सत्य कथा
-सौ मनिषा कडव