गोदाकाठचे रम्य नाशिक !
आपण वयाने मोठे होतो तसे गतकाळातील आठवणी मनात रुंजी घालू लागतात. आपल्या गावा संदर्भात तर अनेक आठवणी जागृत होतात. माझे आठवणीतील गाव म्हणजे १९८० च्या दशकापर्यंतचे गोदाकाठचे रम्य नाशिक!
चाळीस पन्नास वर्षांपूर्वी गोदाकाठचे नासिक सीमित होते. आजच्यासारखे दशदिशानी अफाट विस्तारलेले व विकासाच्या पाउलखुणा उमटलेल नव्हते. समृद्ध निसर्गाचा वरदहस्त असल्याने हिरवाईने वेढलेले निसर्गरम्य, थंड हवेचे अशी त्याची ख्याती होती. नाशिक, पंचवटी, रविवार पेठ व मध्यवर्ती बस स्थानक परिसर एव्हढाच परिसर त्याच्या सीमारेषा होत्या. गावाच्या पंचक्रोशीत वसलेली निसर्गसंपन्न खेडी, समृद्ध शेतमळे, शिवार यांनीच गजबजलेली होती. मात्र त्यांचा कामानिमित्त गोदाघाटाशी संबंध येत असे. गोदावरी व गोदाकाठ हे त्यावेळचे शहरवासीयांचेच नव्हे तर देशातील नागरिकांचे प्रमुख आकर्षण होते. शहरातली लहानमोठ्या वाड्यात सुखनैव राहत असलेले गरीब, मध्यमवर्गीय व श्रीमंत वर्ग शहरातील पुरातन तसेच ऐतिहासिक मंदिर, नदीघाट, वास्तू सण उत्सव, धार्मिक सोहळे याविषयी श्रद्धा, निष्ठा, आत्मीयता व अभिमान बाळगुन होते.
याच कालखंडात गोदातीरी चैतन्य, उल्हासाची प्रचिती येत असे तसेच आनंद, समाधानाची अनुभूतीदेखील येत असे. शहर परिसराचे विस्तारीकरण झाले नसल्याने गावात पाण्याचा सुकाळ होता. बाराही महिने शुद्ध पाण्याने दुथडी भरून वाहणारी नदी मनाला आनंद देत असे. गोदेत निरंतर पाणी असल्याने नैसर्गिक खडकावरून पाण्याचा प्रवाह वेगाने झेपावत, घोंगावत पुढे जात असे. होळकर पुलाखालील एका ओळीत असलेल्या सर्व बंधाऱ्यावरून पाणी पुढे झेप घ्ोताना छोटे धबधबे मनोवेधक वाटत. अथांग पाण्याने नदीपात्र विशाल दिसे. नदीचे ऐतिहासिक पद्धतीचे घाट, नैसर्गिक खडक व नदीतील प्रदूषणविरहित पाणी ही गोदामायेची देणगी अमूल्य अशी होती. खळाळत वाहणाऱ्या पाण्यात सकाळची कोवळी सूर्याकिरण पडली की पाण्याला झळाळी येई, चकाकी चढे! नदीच्या विशाल पात्रात पट्टीचे पोहणारे पोहत असताना ते पाहणे देखील आनंद देउन जाई. नदीच्या काठारील लांबलचक पायऱ्यांवर धुणे धुणाऱ्या बाया,त्यांच्या गप्पा, कधी भांडणे हे दृश्य देखील एक वेगळी अनुभूती देत असे. गोदेच्या खळखळत्या पाण्यात धुणे धुणाऱ्या स्रियांच्या काही पिढया होऊन गेल्यात. ते आता इतिहासजमा झाले. कारण नदीचे पाणी इतके प्रदूषित आहे की कपडे धुणारेच काय पोहोणारे देखील पाण्यात उतरण्यास धजावत नाही. परंतु ते दृश्य गोदेकाठी चैतन्य निर्माण होई हे खरे. नदीकाठी असलेल्या असंख्य मंदिरातून घंटानादात चाललेल्या आरत्या, प्रार्थना, पूजापाठ, ब्रम्हवृंदाचे सुरेल स्वरातील मंत्रजागर, भाविकांची गर्दी ,लगबग भक्तिमय वातावरण निर्माण करीत असे. एका अनामिक समाधानाने चित्त प्रसन्न होई.
एकमुखी दत्ताच्या पटांगणावरून पुढे निघाले की दुतोंडया मारुती ते देवीच्या सांडव्यापर्यंत भरलेला भाजीबाजार तर सारा गोदाघाट गजबजून टाकत असे. आसपासच्या ग्रामीण भागातून शेतकरी ताजा व हरतऱ्हेचा भाजीपाला, धान्य डाळीसाळी, फळफळावळ, रानमेवा या वस्तु विक्रीसाठी बैलगाडीतुन आणत. दलाल, शेतकरी, ग्राहक विक्रेते यांची झुंबड उडे. अनेकांना रोजगार व देऊन संसार प्रपंच फुलवणारा आर्थिक उलाढालीचे केंद्रबिंदु तर होताच; तसेच खरेदीचे आकर्षण व संस्कृती देखील तो होता. आता मात्र वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा भाजी बाजार प्रदूषण, वाहतूक कोंडी, वाहने, वर्दळ, वाहनतळ या सारख्या कारणामुळे कायमस्वरूपी हटविला गेला आहे. त्याच गजबजलेल्या भाजीबाजार पटांगणावर काय दिसते? ठिकठिकाणी उभी करून ठेवलेली वाहने, निराधार, निराश्रित भिकारी यांचे अस्तित्व व प्राबल्य! गोदेच्या पाण्याला सरकरी अवकृपेने ओहोटी लागल्यान पाण्याअभावी तिची गटारगंगा झाली आहे. जुनी सर्व वैशिष्ट्य लोप पावली असून ”गोदाकाठी ते चैतन्य आता उरले नाही” असे खेदाने म्हणावे लागते. तरीही अंतःकरणात वसलेले आठवणीतील गाव आहे तसेच आहे. - विजय रघुनाथ भदाणे