ओरानु-बम्माराचे मीठ
मन्डेलस्लो या जर्मन पर्यटकाच्या नोंदीतील ‘ओरानु-बाम्मारा' म्हणजे खरंतर ‘उरण-मुंबई'. त्याने पाहीलेले सोलर टेबल सॉल्टचे कारखाने म्हणजे येथील मीठागरे. या नोंदींचा विचार केल्यास मुंबईच्या किनारपट्टीवरील मीठव्यवसाय किमान चारशे वर्षांपासून असल्याचे म्हणता येईल. आपल्या मीठाची ही चविष्ट परंपरा केवळ इतकीच जुनी नाही, तर त्याच्या काहीशे वर्षे आधीचेही पुरावे आहेत. उरण तालुक्यातील सर्वात जुनी लिखित नोंद असलेल्या ‘पिरकोन-आवरे' ताम्रपटातही मीठ व्यवसायाचे उल्लेख आहेत.
एक जर्मन साहसी पर्यटक सतराव्या शतकात भटकंतीच्या इराद्याने इराण, भारत या देशांत फिरला.‘जोहान अल्ब्रेट डी मन्डेलस्लो' असे भले मोठे नाव असलेल्या या पर्यटकाने आपल्या प्रवास वर्णनाच्या नोंदींमध्ये मुंबई परिसरातल्या लोकांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण नोंद केली. भारतातील ‘ओरानु-बाम्मारा' येथे मीठ तयार होत असल्याचे त्याने लिहिले. या परिसरात सोलर टेबल सॉल्टचे कारखाने असून मीठाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याचेही त्याने म्हटलेय. हे साल होते १६३८. मन्डेलस्लोच्या नोंदीतील ‘ओरानु-बाम्मारा' म्हणजे खरंतर ‘उरण-मुंबई'. त्याने पाहीलेले सोलर टेबल सॉल्टचे कारखाने म्हणजे येथील मीठागरे. या नोंदींचा विचार केल्यास मुंबईच्या किनारपट्टीवरील मीठव्यवसाय किमान चारशे वर्षांपासून असल्याचे म्हणता येईल. पण आपल्या मीठाची ही चविष्ट परंपरा केवळ इतकीच जुनी नाही, तर त्याच्या काहीशे वर्षे आधीचेही पुरावे आहेत. उरण तालुक्यातील सर्वात जुनी लिखित नोंद असलेल्या ‘पिरकोन-आवरे' ताम्रपटातही मीठ व्यवसायाचे उल्लेख आहेत. इसवी सन ११२० च्या शिलाहारांच्या या दानपत्रात पिरकोन आणि आवरे या गावांचे उत्पन्न वेद अध्ययनार्थींना वाटून दिले होते, परंतु यातून दोन्ही गावांच्या हद्दीतील मिठागरातून मिळणारा कर वगळण्यात आला होता. यावरून सुमारे नऊशे वर्षे आधीपासूनही इथे मीठ तयार होत असल्याचे दिसते. इतकेच नव्हे तर त्यावरील कर आकारणीच्या संदर्भावरून उत्तर कोकणात एक व्यवसाय म्हणून मीठ उत्पादन होत असल्याचे स्पष्ट होते. अजूनही या परिसरात पारंपरिक पद्धतीने मीठाचे उत्पादन होत आहे. इतक्या वर्षांची परंपरा असलेले फारच थोडे व्यवसाय शिल्लक आहेत, मीठ उत्पादन हा त्यातलाच एक व्यवसाय.
भलीमोठी किनारपट्टी लाभलेल्या मुंबई, रायगड, ठाणे परिसरात समुद्राच्या पाण्यापासून नैसर्गिक पद्धतीने मीठ तयार करतात. यातल्या एका पद्धतीत कामगार मिठाचा अंश असलेले पाणी समुद्रातून गाळण्यांद्वारे प्रत्यक्ष उपसतात. ही सर्वात जुनी पद्धत आहे. पण यातून अगदीच कमी मीठ मिळते. शिवाय वेळही जास्त लागतो. दुसऱ्या आणि प्रचलित पद्धतीतून मीठ नावाचं पांढरं सोनं मिळवण्यासाठी इथल्या कामगारांना प्रचंड घाम गाळावा लागतो. या कामगारांना खारवे म्हणतात. या खारव्यांचे नेतृत्व मुकादम म्हणजेच मीठागराचा खातेदार करतो. पावसाळी दिवसांत हेच खारवे इतर कामे करतात. अकुशल मानल्या जाणाऱ्या या खारव्यांचे काम खरंतर अधिकच कौशल्यपूर्ण असते.
मीठ बनविण्याच्या प्रक्रीयेची सुरूवात पावसाळ्याच्या समाप्तीनंतर येणाऱ्या मोठ्या उधाणापासून होते. भरतीचे पाणी ये-जा करण्यासाठी बनलेल्या अरूंद वाटांमधून समुद्राचे पाणी खारजमिनीवर येत असते. या पाण्याला अडवणारी एक ‘मोठी बंदी' (मोठा बांध) असते. तिचे दार या दिवसांत उघडतात. या उघड्या दारातून समुद्राचे पाणी आत येते. ‘वळण' नावाच्या मोठ्या मैदानासारख्या भागात हे पाणी साठवले जाते. या साठवलेल्या पाण्यापासून मीठ तयार होण्यापूर्वी त्या रत्नाकरालाही एक प्रकारची अग्नी परीक्षा द्यावी लागते. वळणांतले पाणी मीठागराला अगदी लागून असलेल्या लहान तलावांमध्ये घेतले जाते. पुढे हेच पाणी मीठ तयार करताना उपसले जाणार असल्याने, या तलावांना उपसणी म्हटले जाते. प्रत्यक्षात ज्या भागात मीठ तयार होते त्या लहान आणि नियोजनबद्ध आयताकृती तळ्यांना कोंडी म्हणतात. लहान लहान बांधांनी तयार झालेल्या कित्येक कोंड्यांनी मिळून मिठागर तयार होते. यातील एक एक कोंडी तयार करणे हे कौशल्याचे आणि मेहनतीचे काम असते. साधारणपणे खारजमिनीचा भाग दलदलयुक्त असतो. परंतु कोंड्यांचा तळ मात्र लाकडी ठोकण्याद्वारे ठोकून मातीच्या अंगणासारखा कठीण बनवला जातो. हा भाग जमिनीचा भाग इतका कठीण असतो की त्यात एखादी मोटारसायकल चालवली तरीही परिणाम होणार नाही. ही कोंडी आता मीठाचे उत्पादन घेण्यासाठी तयार झालेली असते.
आता उपसणी नावाच्या तलावातील पाणी आणखी एका लहान तलावात आणले जाते. इथे त्या पाण्याचे जास्तीत जास्त बाष्पीभवन होऊ दिले जाते. परिणामी पाण्यातील मीठाचे प्रमाण वाढून, ते अधिक घन बनते. या पाण्याला तापवणीचे पाणी म्हणतात. अलिबाग, पेण आणि उरण तालुक्यांतील या मीठागरांमध्ये तापवणीच्या पाण्याची स्थिती तिथीप्रमाणे मोजतात. तर ठाणे-पालघर परिसरात हे पाणी शास्त्रीय पद्धतीने तापमापीसारख्या दिसणाऱ्या हायड्रोमीटर नावाच्या घनतामापक उपकरणाद्वारे मोजले जाते. मीठ तयार करण्यासाठी योग्य घनतेचे पाणी पाटांच्या सहाय्याने कोंड्यांपर्यंत पाठवले जाते. नैसर्गिक झडप (व्हॉल्व) तंत्राद्वारे हे काम चालते. कोंडीतल्या पाण्याच्या पातळीचे मापन अंगुली या एककाने करतात. यासाठी प्रत्यक्षात हाताच्या बोटांनी किंवा एका लाकडी अवजारानेही मापन करता येते. विशिष्ट अंगुले पाणी जमा झाले की पुढील जबाबदारी सूर्यनारायणावर सोपवली जाते. बाष्पीभवनामुळे हळूहळू पाण्याचा अंश कमी होत जाऊन मीठाचे थर तयार होऊ लागतात. अखेर या प्रदीर्घ प्रक्रीयेतून पांढऱ्या शुभ्र रंगाचे खड्यासारखे मीठ जमा होते. निवळा नावाच्या लांब लाकडी फावड्याद्वारे ते बांधाकडे ओढले जाते कोंडीचा तळ कठीण असल्याने फावड्यासारखे ओढूनही या मीठामध्ये माती मिसळत नाही. मेहनतीतून तयार झालेले हे नैसर्गिक मीठ ‘नावडतीने' वाढले तरीही ‘अळणी' लागणार नाही इतके सुंदर आणि स्वच्छ असते मीठ तयार होऊनही इथले काम संपत नाही. या मीठाची योग्य साठवणूक करणेही गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसांत उघड्यावर मीठाच्या राशी ठेवल्या जातात. गरजेनुसार हे मीठ वितरकांपर्यंत पोहोचवले जाते.
पावसाळ्याच्या दिवसात मीठाचे उत्पादन थांबलेले असते. खारव्याचे काम करणाऱ्या बऱ्याचशा कामगारांना या वेळी सुट्टी असते. परंतु तयार झालेल्या मीठाचे काय करायचे? एकवेळ पावसापासून बचाव होईल, पण हवेतील आर्द्रतेचे काय?
या समस्येवरही मीठकामगारांकडे चांगलाच उपाय आहे. मीठाची रास जिथे रचायची असेल तो भाग मीठाचा भुसा टाकून चांगलाच चोपला जातो. भोवताली चिखलाचे बांध घातले जातात. रास उभी राहील्यानंतर खालच्या बाजूने कपडे चढवल्यासारखे पेंढ्याने शिवले जाते. हा पेंढादेखील खाऱ्या पाण्यात बुडवून, सुकवून ठेवलेला असतो. खालून वरच्या दिशेने या पेंढ्याचे आवरण चढवले जाते. शेंड्याकडील भागावर अतिरिक्त झाकण देऊन पुन्हा चिखलाने लिंपले जाते. सीमेंटने प्लास्टर केल्यासारखे या मीठाच्या राशींचे आवरण कठीण बनते. या सर्व उठाठेवीतून मीठ हवाबंद होते. पुढे जेव्हा गरज असेल तेव्हा हे आवरण काढता येते.
अस्मानी कृपेवर अवलंबून असलेल्या या व्यवसायाचे भवितव्य मात्र सुलतानी धोरणांवर अवलंबून आहे. शतकानुशतकांची परंपरा असणाऱ्या मीठाचा व्यवसाय आता अळणी होत चाललाय. थोडा मदतीचा हात आणि थोडी नशिबाची साथ मिळाली तर हा व्यवसाय पुन्हा एकदा उजळून निघेल; शुभ्र मीठासारखाच! - तुषार म्हात्रे