विवाह तडजोडींचा खेळ आहे
तडजोड आयुष्याचा दार्शनिक गुरु आहे! सर्वच अपेक्षित मिळत नसतं! वधू-वर संशोधन करताना अपूर्णतेला थोडीफार जागा असू द्यावी! अपूर्णतः जीवन परिपूर्णतेकडे नेणारी लाईफ लाईन असते! आपल्याच अटी शर्तींवर अडून बसल्यास लग्नाचे वय निघून जाते. मुलीचे नाक चाफेकळी असावे, मुलीने पगार कमवावाच असंही काही नाही, मुलगा माझ्यापेक्षा दोन इयत्ता जास्त शिकलेला असावा अशा अटी शिथिल होत जातात. तसे न घेल्यास असलेली स्थळेदेखील निघून जातात!
पावसाळा संपला! दसरा अन दिवाळीदेखील मागे निघून गेली! शेताचा निम्मा हंगाम संपला! तरीही उरसूर शिल्लकीतला कापूस वेचणी अजून चालूच आहे! गहू-हरभरा पीक थंडीत मातीतून डोक वर काढत आहे! गुलाबी थंडी कुणाला नको असते हो? हंगाम शारीरिक, मानसिक परिवर्तन घडवीत असतो! बदल घडवीत असतो! पश्चिम महाराष्ट्रात देखील कारखान्यातील ऊस गाळप सुरु झालेलं आहे! हंगाम प्रत्येकाच्या अंगात संचारतो! गुलाबी स्वप्न दाखवत असतो! आपापली कार्य सुरु होत असतात! हंगाम संधी असतें नावीन्यपूर्ण बदलासाठी!..
हंगाम सुरु होतो लग्नकार्याचा! हंगाम सुरु होतो उपवरांच्या शोधाचा! हंगाम दोन जीवांना एकत्र आणण्यासाठी साद घालत असतो! दिवाळी नंतर घरात नवीन धन-धान्य आलेलं असतं! घरातलां उत्साह आनंद देत असतो! उपवर मुलं-मुलींसाठी योग्य स्थळ शोधणे सुरु होत! हंगाम योग्य स्थळ पाहण्यासाठीचा असतो!
आज घडीला नागरीकरण खूप मोठया प्रमाणात वाढते आहे! औद्योगिकरण वाढते आहे! खेड्यातील माणूस शहरात येऊन पैसा कमावू लागला! खिशात पैसा खेळू लागला! आपल्या गावापासून शरीराने हळूहळू दूर जाऊ लागला! गती व्यापात मनाने देखील दूर जाऊ लागला! गावाशी बांधलेले घट्ट नाते हळूहळू सैल होऊ लागले! पैशाने सुबत्ता आली! श्रीमंती आली! शहरात स्थिरावल्यामुळे माणूस शहरातील गर्तेत एकजीव होऊ लागला! स्थानिक माणसांशी जोडला जाऊ लागला! पोटाच्या खळगीसाठी शहरांत एकजीव होऊ लागला! काळानुरूप गावाकडील नाते संबंध दुरावू लागले! मुलं मोठी झाली! नोकरी-व्यवसायाला लागली! मुलांचं विवाह योग्य वय झालं! मुलं-मुली शोधणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसली.
...आई-वडील आपल्या विवाह योग्य मुलां-मुलींसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात करतात! गावाकडे नातेसंबंधात चौकशी होते! माहिती काढली जाते! अपेक्षाचं भलं मोठं ओझं घेऊन पालक गावोगावी स्थळ शोधू लागतात! पंधरा-वीस ठिकाणी शोधल्यावर कुठेतरी एखादे स्थळ पसंत पडतं असतं! फिरफीर आणि भटकंतीमुळे कधी कधी उपवर मुला मुलींचं वय वाढत रहातं! उपवर भावी नवरदेव-नवरीच्या शिक्षणात तफावत दिसू लागते! मुलाच्या संपत्तीचं तुलनात्मक मोजमाप होऊ लागतं! अपेक्षा वाढू लागतात की मुलगा हंँडसम असावा! मुलगी सुंदर असावी! मुलाकडे चांगल्या पगाराची नोकरी आणि घर-शेती असावी अशा अनेक अपेक्षा दोन्ही बाजूकडून होऊ लागतात! मुलगी शिकली आहे, पण तिने नोकरी करू नये किंवा मुलीने हातभार लावण्यासाठी नोकरी करावी अशी अपेक्षा करू लागतात! विवाह स्वप्न पाहणाऱ्या भावी वधू-वरांचं वय वाढत जातं! वय हळूचकन निसटून जातं! मार्केट पॉलिसीप्रमाणे हळूहळू जुना माल मागे पडतो! नवीन माल बाजारात येतो! वय वाढलेले मागे पडत जातात! नवीन पिढी विवाहसाठी उमेदवारी करू लागते!
पालक मेटाकुटीला येऊन मग तडजोड सुरु होते!....मुलगी गोरीपान चाफेकळी असावी!....शेती नसली तरी चालेल!..घरदार नसलं तरी चालेल!....हँडसम नसला तरी चालेल!...सुंदर नसली तरी चालेल!...फक्त पगार कमावतो, मुलीला सुखी ठेवण्यासाठी ग्यारंटी देतोय तरी चालेल!...मुलींने पगार कमवावाचं असंही काही नाही तरी चालेल!....मुलगा माझ्यापेक्षा दोन इयत्ता जास्त शिकलेला असावा!... ही अट शिथिल होत तडजोड सुरु होते! शेवटी काळानुरूप वय पळत असतं! वाढत असतं! असलेली स्थळ देखील निघून जातात!
तडजोड आयुष्याचा दार्शनिक गुरु आहे! सर्वच अपेक्षित मिळत नसतं! वधू-वर संशोधन करताना अपूर्णतेला थोडीफार जागा असू द्यावी! परिपूर्णतः म्हणजे....पाण्याची तहान भागल्यावर पूर्ण ग्लास समोर ठेवला तरी पाणी प्यावेसे वाटतं नाही!..अपूर्णतः जीवन परिपूर्णतेकडे नेणारी लाईफ लाईन असते! तडजोड त्यालाच म्हणतात! सर्वच अपेक्षित मिळत नसतं!
विवाहेच्छु तरुण-तरुणीनीं तडजोडचां सुदृढ मार्ग अवलंबित आपल्या विवाहची स्वप्न साकार करावीत! एकमेकांची पसंती करावी! मुलींनी देखील अति अपेक्षा ठेऊ नये! काही वेळेस असं होत की मुलाकडे सर्व काही आहे! पैसा, नोकरी, संपत्ती...सर्व काही आहे!... स्वभाव चांगला नसेल तर मुलीचं आयुष्य नरकातं पडल्यागत होतं! असं लग्न काय कामाचं?
मुलं मुली खूप शिकताहेत! शिक्षणातील, व्यवसायातील अति उंच पातळी गाठीत आहेत! असो, चांगली बाब आहे; पण सामाजिक आणि व्यवहारिक अल्पज्ञानामुळे संसारात भांडणे सुरु होतात! शिक्षण ज्ञान देत असतं ! शिक्षण तडजोड करायला शिकवीत असतं! भांडणातून घटस्फोट शिकवीत नसतं ! जगणं सुंदर होण्यासाठी मिथ्याभिमान बाजूला ठेवणं खूप गरजेचे असतं! माझंचं खरं... असं घोडं दामटलं तर तें एकटेच पळत रहात! सर्व मागे राहून जातात! आपण अंधारातं एकटेच जोडीदाराला शोधित बसतो! ते टाळायचं असेल तर तडजोड ही संजीवनी घुटी घेत वैवाहिक जीवनाची नाव पलीकडच्या किनाऱ्यावर योग्य वेळी, योग्य क्षणी पोहचत राहिल!
भावी वधू-वर संशोधन असं करावं ज्यातून मुला-मुलींमध्ये समन्वय साधला जाईल! माफक अपेक्षा असतील! एकमेकांचां आदर राखला जाईल! कुटुंबातील जेष्ठांचां मानसन्मान राखला जाईल! मुलाने मुलीला तळहाताच्या फोडासारखे जपावं! मुलीने आई-वडिलांचे, माहेरचे उत्तम संस्कार सासरी रुजवावेत! पेरत राहावे! सासर आपलेसे करावे! मुलाने सासरचा सन्मान राखावा! तडजोड करून कुटुंबाची मान उंचवणाऱ्या घरात मुलगी आनंदी, समाधानी संसार करू शकणाऱ्या ठिकाणी जरूर द्यावी!
अलीकडे नागरिकरणाच्या रेट्यात लोकांचा संपर्क कमी होऊ लागला आहे! विवाहसाठी स्थळ मिळत नाहीत! अनेक जाती, जमातीनीं आता विवाह मंडळ स्थापन करून वधू-वर मेळावा आयोजित करीत आहेत! महाराष्ट्रात अनेक सामूहिक विवाह मंडळ कार्यरत आहेत! एकाच ठिकाणी वधू-वरांची ओळख आणि तत्संबधित अत्याधुनिक माहिती वधू-वर मेळाव्यातून प्राप्त होऊ लागली आहे! अनेक वधू -वर मंडळे दूरावलेल्या उपवर मुलं-मुलींसाठी माध्यम म्हणून कार्यरत आहेत! समाजोद्धारासाठी मेळावे आयोजित करीत आहेत! महाराष्ट्रातील अनेक शहरात अनेक जातीवार मंडळे उपवर तरुण-तरुणीसाठी विवाहाचें सुंदर स्वप्न साकार करीत आहेत!
अलीकडे प्रत्येक समाजातील मंडळे वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित करीत असतात! भावी वधू -वरांना एकाच व्यासपीठावर आणून ओळखीतून विवाह जमविण्यातील सेतू म्हणून ही मंडळं कार्यरत आहेत! सामाजिक बांधिलकी जपून समाज वेलीची वाढ अन विस्तार होण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण कार्य हे मंडळं करीत आहेत! जन्मासाठी आई-वडील पाहिजे असतात! संसाररुपी भावी सुंदर स्वप्न साकारण्यासाठी जोडीदार हवा असतो! विश्वासु जोडीदार हवा असतो! आयुष्य दोघांचं असतं! संसार दोघे मिळून एक होत असतो! एकजीव होत असतो! एकमेकांचं समर्पण असतं! घरात पुन्हा नवीन जन्म होत राहतो! नवीन पालवी फुटत राहते! पुन्हा पुन्हा हा खेळ सुरु रहात असतो! एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा चालू राहतो! काळासोबत स्वप्न रंगवत विवाह होत असतो! विवाह समाजाने दिलेली मान्यता असतें! त्या गुरुकिल्लीचा उपयोग करून सुंदर स्वप्न पाहणाऱ्या भावी नव वधू-वरांसाठी अनेक स्वप्नाळू शुभेच्छा व्यक्त करतो. - नानाभाऊ माळी