ऐरोली परिसरात चेन स्नॅचिंग; २ लुटारु जेरबंद

नवी मुंबई : रिक्षामधून तसेच मोटारसायकलवरुन चेन स्नॅचींग करणाऱ्या दोघा लुटारुंना रबाले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन अटक केली आहे. किसन तेजबहादुर थलारी (४०) आणि मोसिन मसुद खान (३८) अशी या दोघांची नावे असून त्यांनी रबाले आणि रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचींगचे एकूण ६ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या लुटारुंकडून दागिने आणि चे स्नॅचींग करण्यासाठी वापलेली रिक्षा तसेच मोटारसायकल असा सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, इन्स्टाग्राम वरील रिल्स बघून या दोन्ही आरोपींना चेन स्नॅचींग करण्याची कल्पना सुचल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऐरोली परिसरात राहणाऱ्या शिक्षिका सीमा मिश्रा (५७) या ९ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी सहकारी शिक्षकाच्या वाहनाची वाट पाहत उभ्या असताना रिक्षामधून आलेल्या दोघा लुटारुंनी सीमा मिश्रा यांना गणेश मंदिर कुठे असल्याची विचारण्या करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रबाले पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन रिक्षामधून आलेल्या दोघा लुटारुंचा शोध सुरु केला होता.

 सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीवरुन सदर लुटारु रबाले एमआयडीसी परिसरातून आल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयानंद वणवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार, पोलीस हवालदार प्रसाद वायंगणकर आदिंच्या पथकाने सतत ३ दिवस-रात्र दिघा, चिंचपाडा, यादवनगर, साठेनगर, भीमनगर या भागात पायी तसेच दुचाकीवरुन संशयित रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रबाले येथील भूषण बार जवळ संशयित रिक्षामधून आरोपी किसन थलारी आणि मोसिन खान दोघेही जात असताना, पोलिसांनी त्यांना रिक्षासह ताब्यात घेतले.  

त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी रबालेच्या हद्दीत ५ तर रबाले एमआयडीसीच्या हद्दीत १ असे ६ चेन स्नॅचींगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोटारसायकल जप्त करुन लुटलेल्या दागिन्यांपैकी २१.५ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.  

रिक्षाच्या गर्डरवरील लाल रंगाच्या रेडियममुळे सापडले आरोपी...
सदर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेल्या रिक्षाचा नंबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास येत नव्हता. मात्र, या रिक्षाच्या पाठीमागील डाव्या गर्डवर लाल रंगाचा रेडीयमचा पट्टा असल्याचे सीसीटीव्हीच्या तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकाराचा लाल रंगाचा पट्टा असलेल्या रिक्षाचा रबाले एमआयडीसी हद्दीत शोध सुरु केला होता. त्यानंतर लाल रंगाचा पट्टा असलेल्या रिक्षातून २ आरोपी रबाले एमआयडीसीत फिरत असताना भूषण हॉटेलजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  

सदर प्रकरणात अटक केलेले दोन्ही आरोपी शिक्षीत असून ते रिक्षा चालक आहेत. त्यांनी आपल्या रिक्षातून आणि मोटारसायकल वरुन रबालेच्या हद्दीत ५ तर रबाले एमआयडीसीच्या हद्दीत १ असे चेन स्नॅचींगचे ६ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. इन्स्टाग्राम वरील रिल्स बघून या दोन्ही आरोपींना चेन स्नॅचींग करण्याची कल्पना सुचल्याचे तपासात आढळून आले आहे. -योगेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुवत-वाशी विभाग. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मायक्रोप्रोसेसरच्या डिझाईन-डेव्हलप क्षेत्रातील सैनी यांचा अपघाती मृत्यू