मायक्रोप्रोसेसरच्या डिझाईन-डेव्हलप क्षेत्रातील सैनी यांचा अपघाती मृत्यू  

नवी मुंबई : सायकलिंग ग्रुपसोबत चेंबूर येथून पनवेल येथे जाणाऱ्या सायकलस्वाराला भरधाव टॅक्सीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलिंग करणारे अवतार सैनी (६८) यांचा मृत्यू झाल्याची घटना पामबीच मार्गावर सीवुडस्‌ येथे घडली. या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टॅक्सी चालकाला इतर वाहन चालकांनी पकडून एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  

सदर अपघातात मृत झालेले अवतार सैनी अमेरिका मधील असून सध्या ते चेंबूर येथे राहण्यास होते. अवतार सैनी मायक्रोप्रोसेसरच्या डिझाईन आणि डेव्हलप क्षेत्रात सक्रिय होते. सैनी यांना सायकलिंगची आवड असल्याने ते मुंबई सायकलिंग ॲन्थेसिएसटस्‌ या सायकलिंगच्या ग्रुपसोबत जोडले गेले होते. सायकलिंग करणारा सदर ग्रुप नियमित मुंबईतून पनवेल, खारघर, ऐरोली आणि इतर भागात जात होता.

२८ फेब्रुवारी रोजी पहाटे देखील या सायकलिंग ग्रुप मधील ७ ते ८ सायकलस्वार चेंबूर येथून पनवेल येथे निघाले होते. यात अवतार सैनी देखील सहभागी झाले होते. यावेळी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अवतार सैनी सायकलिंग करत पामबीच मार्गावर एकटेच पुढे आले होते. यानंतर सीवुडस्‌ जवळ भरधाव टॅक्सीने त्यांच्या सायकलला धडक दिली. या अपघातात अवतार सैनी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. त्यानंतर टॅक्सी चालकाने त्यांना मदत न करता, तेथून पलायन केले. सदर प्रकार पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जखमी अवतार सैनी यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टॅक्सी चालकाचा इतर वाहन चालकांनी पाठलाग करुन किल्ले जंक्शन जवळ पकडून त्याला एनआरआय पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.  

सदर अपघातातील मृत अवतार सैनी अमेरिका येथे राहणारे होते. ते अधून मधून भारतात येत होते. अमेरिका मध्ये त्यांचा मुलगा आणि मुलगी राहण्यास आहेत. अवतार सैनी मायक्रोप्रोसेसरचे डिझाईन आणि डेव्हलपच्या कामात सक्रिय होते. त्यांच्याकडे मायक्रोप्रोसेसर डिझाईनशी संबंधित काही पेटंट देखील होते. तसेच ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाचे माजी संचालक देखील होते. सैनी यांना सायकलिंगची आवड असल्याने ते नियमीत सायकलिंग करणाऱ्या ग्रुप सोबत जोडले गेले होते. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

परदेशातील नोकरीसाठी गमावले ११ लाख