मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘सखोल स्वच्छता मोहीम'ची लवकरच अंमलबजावणी

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका प्रमाणे इतरही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Campaign) राबविण्यास सुरुवात होत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वेबप्रणाली द्वारे थेट संवाद साधत याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

यामध्ये आयुक्त नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची या मोहिमेमागील भूमिका स्पष्ट करत नवी मुंबईसारख्या राज्यातील स्वच्छतेत सर्वात अग्रणी असलेल्या शहराबद्दल त्यांच्या मनात निश्चितच अधिक अपेक्षा असतील, त्यादृष्टीने आपण अधिक जोमाने आणि प्रभावीपणे सदरे मोहीम राबवायला हवी आणि झोकून देऊन काम करायला हवे, असे सूचित केले.
आपल्या शहरात नियमितपणे चांगल्या प्रकारे स्वच्छता होत असते. मात्र, कोणत्याही गोष्टीत अधिक सुधारणेला वाव असतोच. त्यानुसार स्वच्छता अधिक उत्तम रितीने होण्याकडे अधिक बारकाईने लक्ष द्यावे. यामध्ये मुख्य रस्त्यांची स्वच्छता यांत्रिकी वाहनांद्वारे करणे, रस्ते स्वच्छतेमध्ये मलप्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर करणे, रस्त्यांप्रमाणेच पदपथ स्वच्छ करणे अशा विविध बाबींकडे लक्ष देण्याची सूचना आयुवत नार्वेकर यांनी केली. मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेप्रमाणेच अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेवरही बारकाईने लक्ष देऊन स्वच्छ करण्यात यावी. रस्ते, पदपथ स्वच्छता म्हणजे केवळ कचरा नसणे इतकेच नसून त्यासोबतच रस्त्याकडेच्या जागा, मधल्या दुभाजकांमधील जागा यांचे सुशोभिकरण, कर्बस्टोनची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त पदपथ याकडेही लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

कोणत्याही सामाजिक उपक्रमात आणि त्यातही तो स्वच्छता विषयक असेल तर अधिक मोठया प्रमाणात नागरिकांचा, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांचा आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळतो, हेच नवी मुंबईचे वैशिष्ट्य असून त्यादृष्टीने सदर मोहिमेत लोकसहभागावर भर द्यावा. या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये महापालिका क्षेत्रात कार्यरत सिडको, एमआयडीसी, एपीएमसी, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, रेल्वे, पोलीस, प्रादेशिक वाहतूक विभाग अशा विविध प्राधिकरणांनीही आपापल्या क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडून सहभागी व्हावे. याकरिता त्यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुख आणि विभाग अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
दरम्यान, १ जानेवारी पासून ‘माझी शाळा-सुंदर शाळा' असा विशेष स्वच्छता उपक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेनुसार सर्वत्र राबविला जात आहे. यामध्ये शिक्षण विभागामार्फत कार्यवाही होत असली तरी त्यामध्ये परिमंडळ आणि संबंधित विभाग कार्यालय, अभियांत्रिकी, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान या विभागांनीही लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी सखोल स्वच्छता मोहीम शहराचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात, पर्यावरण संरक्षण-संवर्धनात तसेच प्रदुषणाला आळा बसण्यात आणि शहर टापटीप, स्वच्छ-सुंदर दिसण्यात लाभदायी असल्याने सर्व संबंधित विभागप्रमुखांनी आणि विभाग अधिकाऱ्यांनी तसेच क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांनी सदर मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.

सदर व्हिडिओ कॉन्फरन्सींगमध्ये आयुक्त नार्वेकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२ चे उपायुक्त डॉ.श्रीराम पवार, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड आणि कार्यकारी अभियंता असे अधिकारी प्रत्यक्ष तसेच सर्व विभाग अधिकारी आणि काही कार्यकारी अभियंता वेबसंवाद द्वारे उपस्थित होते.

रस्त्यांप्रमाणेच बाग-बगीचे, मैदाने, चौक, बाजारपेठा अशा सार्वजनिक ठिकाणांचीही स्वच्छता मनाला प्रसन्नता आणते. त्याचप्रमाणे शहर सुशोभिकरणाच्या विविध गोष्टींनीही शहराची प्रतिमा बदलते. त्यादृष्टीनेही ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'ला सामोरे जाताना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सखोल स्वच्छता मोहीम अत्यंत उपयोगी असल्याने तिचा प्रभावी उपयोग शहराचे स्वच्छता मानांकन उंचावण्यासाठी होईल. सदर मोहिमेची जनजागृती करण्यासाठी जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापालका क्षेत्रातील मंदिरांसह विविध प्रार्थना स्थळांची अंतर्गत आणि बाह्य परिसर स्वच्छता हाती घ्यावी. तसेच २१ आणि २२ जानेवारी रोजी मंदिरांवर विद्युत रोषणाई मंदीर व्यवस्थापनांकडून करवून घ्यावी. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत नवी मुंबईत मंदिर स्वच्छता