तलाव संवर्धनाच्या कामांनंतर ठाणे शहराची ओळख कायम
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन
ठाणे : ठाणे शहराची ओळख ‘तलावांचे शहर' अशी अभिमानाने सांगता यावी, या दृष्टीने ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तलाव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तलाव संवर्धनाच्या कामांनंतर ठाणे शहराची ‘तलावांचे शहर' अशी असलेली ओळख कायम राहील, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘तलावांचे शाश्वत संवर्धन' या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन करताना केले.
ठाणे महापालिका तर्फे आयआयटी-मुंबई, सीएसआयआर, आसीसीएसए आणि बेग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी रोजी माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे ‘तलाव आणि पाणवठे यांचे शाश्वत संवर्धन' या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ‘सीएसआयआर'चे संचालक राकेश कुमार, मुंबई महापालिका शहर नियोजन विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख, उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम, महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दीप प्रज्वलन करुन या कार्यशाळेचे उद्घाटन केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन करताना, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका द्वारे तलाव संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तलाव संवर्धनासाठी जास्तीचा निधी आवश्यक नसून संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करणाऱ्यांची गरज आहे. महापालिका सोबत ग्रीनयात्रासारखी स्वयंसेवी संस्था एकत्र काम करीत असून, ७ तलावांच्या संवर्धनाची जबाबदारी ‘ग्रीनयात्रा'ने घेतली आहे. तलाव संवर्धन सोपे काम नसले तरी ते अशक्य नाही. ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन करुन त्याचे अभिमानाने सांगता येईल असे ब्रॅडिंग करण्यात येणार आहे, असे यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
जगाच्या प्राधान्यक्रमात उर्जेपाठोपाठ पाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यादृष्टीने पाण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ब्राझील आणि सौदी अरेबिया यांनी त्याबाबत आघाडी घेतली आहे. आपणही पाणी, सांडपाणी यांचे नियोजन याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याशी संलग्नता, पाण्याचे लेखापरिक्षण, पाणी व्यवस्थापक या तीन सूत्रांभोवती विचार होण्याची आवश्यकता आहे. तसेच, तलाव संवर्धनाच्या कामात भांडवली गुतंवणुकीपेक्षा तलावांचे व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा आहे, असेही राकेश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत, श्रीकांत देशमुख यांनी विकास आराखड्यातील कायदेशीर तरतुदींबद्दल विवेचन केले. तर, तलावांच्या शाश्वत संवर्धनासाठी उपयोगी ठरणारी नाविन्यपूर्ण साधने, नैसर्गिक भूरचना यांच्याविषयीचे सादरीकरण वास्तू रचनाकार आकाश हिंगोराणी आणि युसुफ आरसीवाला यांनी केले. सांडपाण्यावर प्रक्रिया, त्याचा पुर्नवापर, तंत्रज्ञानातील नवीन पर्याय, त्याचा प्रभावी वापर याबद्दल आयआयटी, मुंबईतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रदीप कलबार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तुहीन बॅनर्जी यांनी तलाव संवर्धनाबाबतच्या तांत्रिक बाबींचा उहापोह केला. शेवटच्या सत्रात, डॉ. प्रियंका जमवाल, डॉ. हेमंत भेरवाणी, डॉ. अजय ओझा यांनी तलाव संवर्धनाबाबतेच विविध पर्याय मांडले. या कार्यशाळेचा समारोप हेमा रमाणी, नवीन वर्मा, राजेश पंडित यांच्या चर्चासत्राने झाला. या चर्चासत्राचे संचालन ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले.
कार्यशाळेत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार आणि पनवेल महापालिकांचे प्रतिनिधी तसेच ग्रीन यात्रा, एन्व्हारो व्हिजिल, ठाणे तलाव संवर्धन समिती आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.