परदेशी पाहुण्यांची नवी मुंबई मधील पक्षी प्रेमींना प्रतीक्षा

वाशी : दरवर्षी हिवाळा ऋतू सुरु असताना ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये नवी मुंबई मधील खाडी किनाऱ्यावर परदेशी पाहुणे ‘पलेमिंगों'चे आगमन होऊन खाडी किनारी एक गुलाबी चादर दिसते. मात्र, यंदा जानेवारी महिना अर्धा उलटत आला तरी नवी मुंबई मधील खाडी किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात पलेमिंगो दाखल झाले नसल्याने या परदेशी पाहुण्यांची नवी मुंबई मधील पक्षी प्रेमींना प्रतीक्षा लागली आहे.

पलेमिंगो म्हणजे रोहित पक्षी इराण, अफगाणिस्तान आणि इस्त्रायलमधून भारतातील विविध पाणथळ क्षेत्रात हिवाळा दरम्यान येत असतात. गुजरात राज्यातील कच्छ मधून हजारो किमी अंतराचा प्रवास करुन परदेशी पलेमिंगो पक्षी समुद्रकिनारी किंवा पाणथळ भागात येत असतात. तसेच नोव्हेंबर ते जास्तीत जास्त जून महिन्यापर्यत पलेमिंगो पक्षी वास्तव्यास असतात. त्यांचा मुक्काम कच्छ व्यतिरिक्त माहूल-शिवडी, नवी मुंबई मध्ये असतो. ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पलेमिंगो पक्षी आगमनाची सुरुवात होते. नवी मुंबई शहरातील नेरुळ, उरण, ऐरोली, ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पलेमिंगो पक्ष्यांचे दर्शन होत असते.त्यामुळे ‘पलेमिंगों'च्या आगमनाची चाहूल लागताच पर्यटक, पक्षीप्रेमी यांची पलेमिंगो पाहण्यासाठी पाऊले वळतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये वातावरणात उष्ण दमट हवामान होते. त्यामुळे थंडीची सुरुवात उशिराने झाल्याने रोहित पक्षांसाठी असलेली पोषक वातावरण निर्मिती सुरु झाली आहे. परिणामी नवी मुंबई शहरात तुरळक पलेमिंगो दाखल होण्यास सुरुवात झाली असली तरी सरासरी पलेमिंगो अजून दाखल झाले नसल्याने या परदेशी पाहुण्यांची नवी मुंबई मधील पक्षी प्रेमी प्रतीक्षा करीत आहेत.

पाणथळ क्षेत्र वाचवण्याची गरज ?
नवी मुंबई शहराला मोठा खाडी किनारा लाभला असून, अनेक पाणथळ क्षेत्र आहेत. या पाणथळ क्षेत्रात परदेशी पलेमिंगो पक्ष्यांचे आगमन होत असते. नवी मुंबई शहरात आणि शहरालगत सुरु असलेल्या प्रकल्पात जैव विविधता वाचवण्यासाठी लेखी हमी दिली जाते. मात्र, ती फक्त कागदावरच राहते. त्यामुळे नवी मुंबई मधील पाणथळ क्षेत्र अबाधित राहावे, याकरिता बीएचएनएस द्वारे मोहीम उभारण्यात आली असून, दर रविवारी सर्व सदस्य आणि पक्षी प्रेमींमध्ये करावे, चाणक्य येथे जनजागृती करण्याचे काम सुरु आहे.


सध्या गुजरात मध्ये ‘पलेमिंगों'चा मुक्काम
‘बीएचएनएस' तर्फे मुंबई मध्ये हिवाळा दरम्यान स्थलांतरीत होणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना जीपीएस सॅटेलाईट-टॅग केले आहे. गुजरात मध्ये पाऊस चांगला झाल्याने ‘पलेमिंगों'ना पोषक वातावरण तयार झाले असून, चांगले खाद्य मिळत आहे. सध्या गुजरात मधील कच्छ मध्ये ‘पलेमिंगों'चे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून, नवी मुंबई मध्ये पलेमिंगो पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ते सरासरी पेक्षा कमी असून, लवकरच पलेमिंगो पक्ष्यांची संख्या वाढणार आहे. - सुनील अग्रवाल, पक्षी अभ्यासक - नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खैरणे बोनकोडे मधील ‘वाहतुक कोंडी'ची समस्या लवकरच मार्गी