ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
कोपरखैरणे, घणसोली विभागातील बेकायदा बांधकामे निष्कासित
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग द्वारे महापालिका क्षेत्रातील विनापरवानगी होत असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याविरोधात धडाकेबाज कारवाई सुरु असून, १० जानेवारी रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे आणि घणसोली विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
महापालिका कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रातील कोपरखैरणे सेवटर-५ मध्ये मे.वैदेश्वर डेव्हलपर्स (वैष्णवी इंटरप्रायजेस) आणि मे.वैदेश्वर डेव्हलपर्स (मोनालीसा पॅलेस) द्वारे भूखंड क्रमांक-७२ वर बांधकाम करण्यात आलेल्या शॉप नंबर-१५ आणि १६ या दुकान चालकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३(१) अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या पोटमाळ्याचे बांधकाम केले होते. तथापि याबाबत संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी-कर्मचारी, पोलीस तसेच १० मजूर, १ पिकअप व्हॅन, २ इलेक्ट्रॉनिक हॅमर, १ गॅस कटर इत्यादींचे सहकार्य घेण्यात आले.
घणसोली विभागातील अतिक्रमणे उध्वस्त
नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रातील ठाणे-बेलापुर रोडवर अवैधरित्या धंदे सुरु होते. सदर धंद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे, या अवैध धंद्यांवर महापालिका घणसोली विभाग तर्फे ९ जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये ४ हातगाडया, १ पान टपरी, १ ऊस रसाचा गाडा, १ लिंबु सरबत चारचाकी गाडी, २ निरा टपरी आणि १ सोडा गाडी यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ हायड्रा मशिन, २ डंपर आणि १ पिक अपव्हॅन यांच्या साहाय्याने सदरचे साहित्य उचलण्यात येवुन कोपरखैरणे डपींग येथे जमा करण्यात आले आहे.
दरम्यान, यापुढील काळातही संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्रतेने राबविली जाणार आहे, असे महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.