‘नवी मुंबई'चा पुन्हा राष्ट्रीय गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्विकारला पुरस्कार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले असून महाराष्ट्र राज्यात सातत्याने पहिले स्थान कायम राखले आहे. यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे.

याशिवाय ‘कचरामुक्त शहर'चे सर्वोच्च सेव्हन स्टार मानांकन नवी मुंबईने प्राप्त केले असून सेव्हन स्टार प्राप्त करणारे राज्यातील एकमेव आणि देशातील अवघ्या २ शहरांमधील एक शहर आहे. त्यासोबतच हागणदारीमुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगरीत ‘नवी मुंबई'ने वॉटरप्लस असे सर्वोच्च मानांकन कायम राखले आहे.

नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम्‌ येथे झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'च्या पारितोषिक वितरण समारंभात देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विकास-गृहनिर्माण मंत्री ना. हरदीपसिंह पुरी, केंद्रीय सचिव मनिष जोशी, आदि उपस्थित होते.

यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत अभियान'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे तसेच अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड उपस्थित होते.

स्वच्छता आता नवी मुंबई शहराची ओळख बनलेली असून शहर स्वच्छतेविषयी जागरुक असणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचा वाढता सक्रिय सहभाग यामुळेच नवी मुंबईचे स्वच्छतेमधील मानांकन सतत उंचावत राहिले असून त्याची फलश्रुती असलेला सदर पुरस्कार स्वच्छताप्रेमी नागरिक आणि स्वच्छताकर्मींच्या योगदानाला समर्पित आहे. सदर राष्ट्रीय पुरस्कार स्वच्छताकर्मी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि प्रसारमाध्यमे अशा सर्वांच्या एकत्रित कामाचे फलित असल्याचे मत व्यक्त करत आयुवत राजेश नार्वेकर यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'च्या सर्वेक्षणांतर्गत ‘स्वच्छ भारत मिशन'च्या केंद्रीय तपासणी पथकाने परीक्षणात कागदपत्रे तपासणीप्रमाणेच शहर स्वच्छतेविषयी नागरिकांचे अभिप्रायही जाणून घ्ोत गुणांकन केले. केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांद्वारे कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिका क्षेत्रातील स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणी करताना ‘परीक्षण समिती'ने तेथे भेटलेल्या नागरिकाशी संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेतले. त्याचप्रमाणे ‘मिशन'मार्फत स्वच्छता ॲप, दूरध्वनी यावरुनही नागरिकांच्या शहर स्वच्छता विषयक प्रतिक्रियांची नोंद घेण्यात आली. एकंदरीतच नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंद आणि स्वच्छताकर्मींनी केलेले काम,  या कामाला नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचा लाभलेला चांगला प्रतिसाद यामुळेच नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छतेमधील राष्ट्रीय मानांकन उंचावले आहे.
शहर सुशोभिकरणात आकर्षक भित्तीचित्रे, लक्षवेधी शिल्पाकृती, उजळलेले उड्डाणपुल, झळाळणारे अंडरपास, आकर्षक विद्युत खांब अशा गोष्टींमुळे शहर अधिक शोभिवंत झाले. यापूर्वी चित्रकविताभिंती सारख्या वेगळ्या संकल्पना राबविल्यामुळे ‘कवितांचे शहर' अशी ओळख झालेल्या नवी मुंबई शहरात यावर्षी चित्रकविता भिंत उभारताना संतांचे प्रबोधन करणारे अभंग, ओव्या पूरक छायाचित्रांसह रेखाटण्यात आल्या. ज्याचे अनेकांकडून कौतुक झाले. या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छन्द काव्य संगीत संध्या' या अभिनव साहित्यिक उपक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर अशा नामांकित कवींसह सुप्रसिध्द संगीतकार कौशल इनामदार यांनी स्वच्छतेचा जागर केला. दूरदर्शन सह्याद्री वरुन या कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण करण्यात आले.

विविध प्रकारे केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छता कामांचे फलित म्हणजे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा पुरस्कार, राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर तसेच कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार रेटींग आणि ओडीएफ कॅटेगरीत वॉटरप्लसचे सर्वोत्तम मानांकन असे विविध बहुमान प्राप्त झाले असून सदरचा सन्मान प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचा असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी म्हटले आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि त्यातही विशेषत्वाने सफाईकर्मी तसेच स्वच्छतेविषयी जागरुक लोकप्रतिनिधी, विविध संस्था-मंडळे आणि विविध वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यमे अशा सर्वच घटकांनी आपला सक्रिय सहभाग देत अनमोल योगदान दिलेले आहे. स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट असल्याने यापुढील काळात अधिक जोमाने ‘निश्चय केला, नंबर पहिला' हाच ध्यास नजरेसमोर ठेवून सर्वजण एकत्र येऊन अधिक उत्साहाने काम करतील, असा विश्वास आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त ‘नवी मुंबई' चकाचक!