‘दर्पण'कारांना अभिवादन!

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये ‘पत्रकार दिन'निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते.

यावेळी अतिरिवत आयुवत सुजाता ढोले यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी सुसंवाद साधला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या लोकोपयोगी कामांना जनतेपर्यत पोहोचविण्याचे आणि जनतेच्या विविध अडीअडचणी, सुचनांना महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम पत्रकारांमार्फत होत असल्याबद्दल आभार व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त ढोले यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी रूजविलेला पत्रकारितेचा वसा लिखित वर्तमानपत्रांपासून आजच्या डिजीटल माध्यमांच्या युगात समर्थपणे जपणाऱ्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सर्व पत्रकारांकडून नियमितपणे प्रसिध्दीसाठी मिळणाऱ्या संपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानत बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनपट उलगडला.

महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्रकार तथा संपादक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण' सुरु केले. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण' आवर्जुन मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी ब्रिटीश सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण'मध्ये मराठी भाषेतील उभ्या स्तंभाच्या शेजारी त्याच मजकूराचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण'कारांनी पदरमोड करुन आणि कुठलेही नपयाचे तत्व न स्वीकारता अत्यंत निष्ठेने आणि निस्पृह वृत्तीने आपले वृत्तपत्र चालवले.

अशा ‘दर्पण'च्या प्रकाशनदिनी अर्थात पत्रकार दिनी आचार्यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘उरण लोकल'चे १२ जानेवारी रोजी लोकार्पण?