‘उरण लोकल'चे १२ जानेवारी रोजी लोकार्पण?

लोकलसाठी उरणकरांच्या आशा पल्लवित

नवी मुंबई : लोकल सेवेसाठी उरणकरांची गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रतिक्षा कधी संपुष्टात येणार? याची अनिश्चितता आजही कायम आहे. तरीही येत्या १२ जानेवारी रोजी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक'च्या उद्‌घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षीत नवी मुंबई-उरण लोकलला ग्रीन सिग्नल देण्यात येणार असल्याची शवयता बळावली आहे.

६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता उरण रेल्वे स्थानकात विशेष तपासणी वाहन दाखल झाले. या तपासणी वाहनातून ‘मध्य रेल्वे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांनी खारकोपर ते उरण मार्गावरील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांच्या या पाहणीमुळे खारकोपर ते उरण या मार्गावर लोकल सेवा सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे लोकल सेवेबद्दल उरणकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दुसरीकडे अंतिम चाचणीनंतर जवळपास दहा महिन्यांपासून उद्‌घाटनाअभावी प्रवासी सेवेत येऊ न शकलेल्या उरण ते नेरुळ-बेलापूर मार्गावर यापूर्वी गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सणाच्या मुहूर्तावर लोकलसेवा सुरु होणार असल्याचे बोलले जात होते. त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासनाने उद्‌घाटनाची वेळोवेळी तयारी देखील केली होती. पण, पंतप्रधान कार्यालयाकडून उद्‌घाटनासाठी ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने उरण-नेरुळ लोकल सेवेला अद्याप रेड सिग्नलच देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक तारखा आणि मुहूर्त टळल्यानंतर वर्षअखेर पर्यंत देखील उरण लोकल सुरु होऊ शकली नाही. परिणामी, उरणकरांना लोकल सुरु होण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागली आहे.

‘मध्य रेल्वे'च्या महत्त्वाच्या प्रकल्पात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत. खारकोपर आणि उरण दरम्यान लोकल सुरु करण्यासाठी ‘रेल्वे बोर्ड'ने आठ महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सदर मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ‘रेल्वे बोर्ड'ने मंजुरी दिली आहे. ‘मध्य रेल्वे'च्या अखत्यारीत उरण मार्गावर लोकल सेवा धावणार आहे. नुकतीच २६ ऑवटोबर रोजी ‘मध्य रेल्वे'च्या उपमहाव्यवस्थापकांनी देखील या मार्गाची अंतिम पाहणी केली आहे.

नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील उरण ते खारकोपर दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील अपूर्ण असलेल्या रेल्वेच्या कामांनाही वेग घेतला आहे. उरणसह मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकामधील विद्युत यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानकांच्या परिसरातील कामे देखील युध्दपातळीवर सुरु आहेत. स्थानकांच्या सफाईची कामे सुरु असून सूचना फलक, टाईम बोर्ड आदिंचीही तपासणी झाली आहे. उरण मार्गावरील नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या तरघर तर खारकोपर ते उरण दरम्यानचे गव्हाण स्थानकातील छताचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे फेब्रुवारी २०२४ मध्ये कामे पूर्ण होणार आहेत, अशी माहिती रेल्वे सुत्रांकडून मिळाली.
दरम्यान, गेल्या दहा महिन्यात अनेक सणांवेळी उरण मधील प्रवासी जनतेच्या लोकल सेवा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या; पण त्या वेळोवेळी फोल ठरत आहेत. रेल्वे मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेरुळ-उरण लोकलला हिरवा झेंडा दाखवायचा आहे. त्यामुळे येत्या १२ जानेवारी रोजी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक (अटल सेतू)'चे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे यावेळी तरी नेरुळ-उरण लोकलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याअनुषंगाने ‘मध्य रेल्वे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांनी केलेली पाहणी उरण लोकल सुरु होणार असल्याचे संकेत देत आहे. तरीही अद्याप रेल्वे प्रशासनाकडून नेरुळ-उरण लोकल सेवेच्या उद्‌घाटनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' उपक्रमाचे दुसरे सत्र संपन्न