‘सी-लिंक'च्या उद्‌घाटनावेळी चिर्ले ग्रामस्थांचा ‘जन आंदोलन'चा इशारा

‘एमएमआरडीए'ने फसवणूक केल्याचा आरोप; लेखी आश्वासनाशिवाय मागे न हटण्याचा निर्धार

उरण : ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक' प्रकल्प राबविताना ‘एमएमआरडीए'ने आणि महाराष्ट्र शासनाने चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एमएमआरडीए आणि महाराष्ट्र शासनाने दिलेले वचन न पाळल्याने तसेच ग्रुप ग्रामपंचायत  चिर्लेसह चिर्ले ग्रामस्थांची मोठी फसवणूक केल्याने एमएमआरडीए आणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी चिर्ले ग्रामस्थांतर्फे येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी ‘अटल सेतू'चा जिथे मार्ग संपतो त्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मार्गालगत जन आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, जन आंदोलन करण्यासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले आणि ग्रामस्थांतर्फे कोकण विभागीय आयुवत, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा विभाग, तहसिलदार-उरण, उरण पोलीस ठाणे, आदिंकडे पत्रव्यवहार करणात आला आहे.
‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक'चे (अटल सेतू) काम पूर्ण झाले असून या ‘अटल सेतू'चे उदघाटन येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे २१,२०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीचा ‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक' गेल्या अनेक महिन्यांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, अटल सेतू मुंबई येथून सुरु होऊन उरण तालुक्यातील चिर्ले गांव येथे संपणार आहे. चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत या मार्गाचा समारोप होणार आहे.

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत चिर्ले बाकावली तलावाचे सुशोभिकरण करणे, मौजे गांवठाण, चिर्ले जिल्हा परिषद रस्ता ते ऱ्प्-४ँ हायवे पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण-आरसीसी नाला बांधणे, एमएमआरडीए मधील प्रकल्पांमध्ये स्थानिकांची नोकरभरती करणे,  गांवठाण स्मशान भूमी ते जांभूळपाडा बसस्टॉप पर्यंत काँक्रीटीकरण करणे, ग्रामपंचायत अंतर्गत गटारे-काँक्रीट रस्ते बनविणे आदि मागण्यांबाबत ग्रामपंचायत चिर्ले मार्फत एमएमआरडीए आणि महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा, पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाने चिर्ले ग्रामस्थांच्या मागणीची साधी दखल घेतली नाही. एमएमआरडीए किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणतेही लेखी आश्वासन मिळाले नाही. कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, चिर्ले ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची घोर फसवणूक आहे. त्यामुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही १२ जानेवारी २०२४ रोजी ‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक-अटल सेतू' येथे मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘चिर्ले ग्रामपंचायत'चे सरपंच सुधाकर भाऊ पाटील यांनी दिली.

या आंदोलनात जमीन बचाव संघर्ष समिती तसेच अनेक विविध सामाजिक संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. आतापर्यंत कोणत्याही शासकीय विभागाने किंवा शासकीय अधिकाऱ्याने लेखी आश्वासन दिलेले नाही. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही सरपंच सुधाकर पाटील यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सायन्स पार्क'