नवी मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सायन्स पार्क'

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच अत्याधुनिक प्रकल्प आणि कामांमुळे नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणारा सायन्स पार्क प्रकल्प नेरुळ, सेक्टर-१९ मधील वंडर्स पार्क नजिक उभारला जात आहे. सायन्स पार्क प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा आणि या माध्यमातून नवी मुंबई शहराची ओळख देशपातळीवर अधोरेखित व्हावी, असा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रकल्प स्थळाची पाहणी करुन कामाची सद्यस्थिती जाणून घेत नियोजनबध्दरित्या विहीत वेळेत काम पूर्ण करुन घ्यावेत, असे निर्देश दिले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता संजय देसाई, वास्तुविशारद हितेन सेठी तसेच संबंधित अभियंता उपस्थित होते.

वंडर्स पार्क नागरिकांचे आणि पर्यटकांचे नवी मुंबईतील विशेष आकर्षण केंद्र असून त्या शेजारी १९,५०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या बांधकाम क्षेत्रात उभारला जाणारा सायन्स पार्क सारखा प्रकल्प नाविन्यपूर्ण होण्यासाठी बांधकाम रचनेपासून त्याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या विज्ञान विषयक सुविधांपर्यंत सर्वच बाबींमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाईल असे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने देशातील अशा प्रकारच्या वैशिष्टयपूर्ण ‘सायन्स पार्क'ना भेट देऊ त्यांची पाहणी करावी. त्यापेक्षा अधिक अद्ययावत आणि आधुनिक सुविधांनी युक्त सायन्स पार्क निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देशित केले.

नुकत्याच नवी मुंबईत पार पडलेल्या ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद'च्या अधिवेशनात उपस्थित देशभरातील अनेक नामांकित शास्त्रज्ञांनी नवी मुंबई महापालिकेच्या सायन्स पार्क प्रकल्पाविषयी उत्सुकता दाखविली होती. त्याचप्रमाणे अनेक शास्त्रज्ञांनी यामध्ये वैचारिक योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने राज्यातील आणि देशातील नामांकित शास्त्रज्ञांचे वैचारिक मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने यापुढील काळात सकारात्म्क कार्यवाही केली जाईल. एकंदरीतच   सायन्स पार्क अनुभवसंपन्न शास्त्रज्ञांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा होण्यासाठी मदतच लाभणार आहे, असे आयुवत नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

‘सायन्स पार्क'च्या आराखड्याचे बांधकाम ९० टक्के हून अधिक पूर्ण झाले असून बांधकाम पूर्णत्वासोबतच समांतरपणे अंतर्गत भागातील सजावट आणि त्याठिकाणी प्रदर्शित करण्यात येणारे विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत मॉडेल्स, थ्री डी इमेजेस, ऑडियो व्हिज्युअल फिल्म्स यांचेही काम समांतरपणे सुरु ठेवावे, असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. येथे जीवशास्त्राशी संबंधित विभाग, पर्यावरणाशी संबंधित विभाग, ऊर्जेशी संबंधित विभाग, यांत्रिकीकरणाशी संबंधित विभाग, अंतराळाशी सबंधित विभाग अशा विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळया विभागांतून सहजसोप्या पध्दतीने विज्ञानाची मांडणी केली जाणार आहे. या सर्व विभागांची मांडणी, रचना आणि तेथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा या उपस्थितांशी जास्तीत जास्त संवादी असतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. मांडणी केलेल्या प्रत्येक साहित्याच्या ठिकाणी ते साहित्य कोणत्या वयोगटाकरिता सुयोग्य आहे याचेही फलक ठळकपणे प्रदर्शित करण्यात यावेत, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

सायन्स पार्क येथील प्रत्येक विभागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने तो विषय सहजपणे समजू शकेल अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल्स, एक्झिबिटस्‌, ऑडिओ व्हिज्युअल फिल्म्स यांची रचना केली जाणार आहे. त्या दृष्टीने साहित्य निवड करुन त्याचे पुन्हा एकवार सादरीकरण करावे. ‘सायन्स पार्क'सारखा अभिनव प्रकल्प उभारला जात असताना शेजारील वंडर्स पार्क परिसरालाही त्याच गुणात्मक रितीने सुशोभित करावे. ‘सायन्स पार्क'मधील प्रत्येक गोष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि इतरांपेक्षा नाविन्यपूर्ण असण्याकडे विशेष लक्ष द्यावे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२१ अनधिकृत झोपड्या निष्कासित