‘शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक'वर कारला २५० रुपये टोल

मंत्रिमंडळ बैठकीत ५० % पथकर सवलतीचा निर्णय

मुंबई : ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा (शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक-एमटीएचएल) अटल सेतू'साठी पथकर (टोल) निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय ४ जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

‘एमटीएचएल'वर कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या दीडपट, दैनिक पास एकेरी पथकराच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नास पट अशी सवलत देण्यात आलेली आहे.

अटल सेतू उभारणीकरिता एकूण २१,२०० कोटी इतका खर्च आला असून त्यापैकी १५,१०० कोटी इतके कर्ज घेण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पनवेल पासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी, इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान ५०० रुपये इतकी बचत होईल.

अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजुने शिवडी येथील पलेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या ४ किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजुने ध्वनी संरक्षक, अतिसंवेदनशील अशा भाभा अणू संशोधन केंद्र आणि माहुल येथील तेल शुध्दीकरण केंद्र या ४ ते १० किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसविण्यात आलेले आहे.

दरम्यान, ‘अटल सेतू'साठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचे मा. मुख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ